

Bihar political news : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाले आहे. यंदा रेकॉर्डब्रेक मतदान झाल्याने कुणाच्या पारड्यात वाढीव मते पडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सर्वच एक्झिट पोलने एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. तर महाआघाडीला १०० जागांपर्यंतही पोहचता येणार नाही, असे पोलचे आकडे सांगत आहेत. पण यंदा बिहारचा निकाल सगळ्यांचा ‘जोर का झटका’ देण्याची शक्यता आहे.
बिहारच्या निकालात महाराष्ट्र पॅटर्न दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याला कारणीभूत मतदानाचा टक्का आहे. बिहारमध्ये यावेळी एकूण मतदानात वाढ झाली असली तरी त्यामध्ये महिलांचे मतदान लक्षणीय वाढले आहे. मागील निवडणुकीत बिहारमध्ये एकूण मतदान ५७.२९ टक्के झाले होते. यावेळी हा आकडा ६६.९१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मतदानाची टक्केवारी तब्बल ९.६ ने वाढली आहे. विशेष म्हणजे यामध्य महिलांचा आकडा पुरूषांपेक्षा अधिक आहे.
बिहारमधील महिलांच्या मतदानाची टक्केवारी ७१ हून अधिक आहे. यंदा महिलांची वाढलेली ही मतेच निर्णायक ठरू शकतात, असे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. अनेकांना यामध्ये महाराष्ट्र पॅटर्न दिसत आहे. महाराष्ट्रातही लोकसभेतील दारूण पराभवानंतर महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. अवघ्या दोन-तीन महिन्यांत ही योजना लोकप्रिय ठरली अन् मतदानातील महिलांचा टक्का वाढल्याचे दिसले.
महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाचा टक्का ५.९५ नी वाढला होता. गेल्या निवडणुकीत ५९.२६ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर पुरुष मतदारांच्या मतांचा टक्काही ४.०७ ने वाढला होता. पण महिलांची वाढलेली मते महाराष्ट्रात निर्णायक ठरली होती. निकालानंतर महायुतीतील सर्वच नेत्यांनी लाडक्या बहिणींमुळे सत्ता मिळाल्याची कबुली दिली होती. मात्र, त्याचवेळी भाजप आणि महायुतीला मिळालेल्या विक्रमी जागांमुळे या नेत्यांना सुखद धक्काही बसला होता.
महाराष्ट्रातील हाच पॅटर्न बिहारमध्येही दिसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महिलांच्या वाढलेल्या मतांच्या टक्केवारीचा थेट फायदा एनडीएला होऊ शकते. निवडणुकीआधी एनडीए सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या, काही योजना अजूनही पाईपलाईनमध्ये आहेत. जीविका समूहशी संबंधित महिलांसाठी मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत १० हजार रुपये, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणेच बिहारमध्येही सुरू करण्यात आलेली योजना तसेच जवळपास दोन कोटी कुटुंबांना दरमहा १२५ यूनिट वीज मोफत आदी योजनांचा थेट परिणाम मतदानावर झालेला दिसतो, असे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.
महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनांमुळे त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. ते मतदान थेट एनडीएच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीला त्याचाच मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे एक्झिट पोलचे आकडेही फेल ठरू शकता. एक्झिट पोलपेक्षा अधिक जागा एनडीएला मिळण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही एक्झिट पोल फेल ठरले होते. एक्झिट पोलपेक्षा अधिक जागा महायुतीला मिळाल्या होत्या. तर महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला होता. महाराष्ट्रातील निकालानंतर युतीतील नेत्यांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. असाच धक्का बिहारमध्येही बसल्यास आश्चर्य वाटायला नको.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.