मुंबई : शिवेसनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून आज विधानसभेत (Assembly Winter Session) मोठा गदारोळ झाला. जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केल्याचे सांगत विरोधकांनी त्यांच्या माफीची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवारही (Sudhir Mungantiwar) आक्रमक झाले होते. यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी जाधव यांच्यावर निशाणा साधला.
जाधव यांना उद्देशून बोलताना मुनगंटीवार म्हणाले, हा लोकशाहीचा फड असून त्याला तमाशाचा फड होऊ देऊ नका. आज ठेचलं नाही तर पवित्र सभागृह अडचणीत येईल. हा कोणत्याही पक्षाचा मुद्दा नाही. हे इथंच थांबवलं नाही तर प्रत्येक सदस्य असे बोलेल. प्रत्येक नेता परिश्रमाने मोठा होतो. त्यांच्याबद्दल अंगविक्षेप केले तर माफी मागायलाच हवी, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
ही प्रथा अतिशय वाईट आहे. जाधव यांच्याबाबत पहिल्यांदा अशी घटना नाही. विधानसभेबाहेर नक्कल केली तरीही ते योग्य नाही. असं सतत केल्यास ते पराभूत होतील. सभागृहापेक्षा हे मोठे आहेत का? अध्यक्षमहोदय, मी तुम्हाला शब्द देतो, हे रेकॉर्डवरून काढले नाहीत, तर त्यांच्यापेक्षा चांगल्या नकला मी करू शकतो. आमच्यावर संस्कार आहेत. आम्ही पुस्तके दाखवतो. काहीतरी बोल पण रेटून बोल, हे असं होत नाही. तुम्ही तर्कावर तर्क द्या, असा आक्रमक पवित्रा मुनगंटीवार यांनी घेतला.
दरम्यान, जाधव यांनी आपल्या वक्तव्याबाबत सभागृहात बिनशर्त माफी मागितली आहे. जाधव म्हणाले, सभागृहात मी माफी मागावी, असा आग्रह विरोधक करत आहेत. अशाप्रकारच्या प्रसंग या सभागृहात अनेकदा आले. माफी मागणं किंवा दिलगिरी व्यक्त केल्यानं माणूस लहान होत नाही. पण विरोधी पक्षनेत्यांनी शब्दच्छल केला. मी नेहमी बोलत असताना कळत न कळत हातवारे होतात. तरीही मी बोलण्याच्या ओघात पंतप्रधानांविषयी नक्कल केली असेल तर मी सभगृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असं जाधव यांनी स्पष्ट केलं.
वीजबिलाच्या मुद्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विधानसभेत उत्तर देत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 लाख रुपयांच्या घोषणाचा उल्लेख केला. त्यावर फडणवीस यांनी आक्षेप घेतला. राऊत यांनी याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, असं खुलं आव्हान फडणवीस यांनी दिलं. फडणवीस आक्रमक झाल्यानंतर भास्कर जाधव राऊतांच्या मदतीसाठी धावून आले. जाधव म्हणाले होते की, विरोधी पक्षनेते शब्दखेळ करत आहेत. 2014 पूर्वी पंतप्रधान हे बोलले आहेत. 'काला धन लाने का की नही लाने की, कहा रखने का,' असं मोदी म्हणाल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर फडणवीस पुन्हा आक्रमक झाले आणि पंतप्रधानांची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना निलंबित करा. बहुमताच्या भरवशावर अशी नक्कल करत असाल तर त्याची लाज वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.