Sarkarnama Analysis : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र ठरणार 'किंगमेकर'

BJP Narendra Modi Strategy for Maharashtra Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात जवळपास 19 जाहीर सभा घेतल्या, मुंबईत रोड शोही केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र किंगमेकर ठरणार हे निश्चित आहे.
BJP Narendra Modi Strategy for Maharashtra Election
BJP Narendra Modi Strategy for Maharashtra Election Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र कुणाला हिसका दाखवणार आहे, महायुतीला की महाविकास आघाडीला? याबाबत देशभरात उत्सुकता निर्माण झाली आहे. तुलनेने कमकुवत दिसत असलेल्या पण सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता असलेल्या महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपला जंगजंग पछाडावे लागत आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या राज्यात जवळपास 19 जाहीर प्रचारसभा झाल्या आहेत. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी राज्यात एखाद्या निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतलेल्या नसतील.

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांपाठोपाठ सर्वाधिक 48 जागा महाराष्ट्रात आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) युतीने 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. राज्यात महायुतीची सत्ता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत. या दोन्ही पक्षांचे बहुसंख्य आमदार, खासदार महायुतीसोबत आहेत. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असलेल्या आमदार, खासदारांची संख्या कमी आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने राज्यात 'मिशन 45' ची घोषणा केली होती, म्हणजे भाजपला राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती, मात्र निवडणूक येता येता भाजपची दमछाक सुरू झाली. त्याला कारणीभूत आहे पक्ष, आमदार, चिन्ह गेल्यानंतरही वयाच्या 84 व्या वर्षात असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि जिद्द.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळे बहुतांश लोकसभा मतदारसंघांतील चित्र बदलले. अनेक मतदारसंघांत भाजपची प्रचंड शक्ती आहे. मतदारसंघातील सर्व आमदार महायुतीचे असतानाही बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीने महायुतीला घाम फोडल्याचे चित्र दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झालेल्याही काही मतदारसंघांत याचा समावेश आहे. असे का झाले असेल? राज्यात महायुतीची इतकी प्रचंड ताकद असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतक्या मोठ्या संख्येने जाहीर सभा का घ्याव्या लागल्या? माढा, सोलापूर, धाराशिव, लातूर अशा लागून असलेल्या मतदारसंघांतही त्यांना स्वतंत्र जाहीर सभा घ्याव्या लागल्या आहेत. राज्यातील भाजपच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास नाही, हे एक उत्तर असू शकते. दुसरे उत्तर असे, की भाजप (BJP) कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही. विरोधक कमकुवत असला तरी भाजप संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरत असतो. यापैकी महाराष्ट्रासाठी कोणते कारण लागू होईल, यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते.

BJP Narendra Modi Strategy for Maharashtra Election
Vinod Tawde News : 'चारशे पार'साठी भाजपचा असा आहे 'मेगा प्लॅन', विनोद तावडेंनी सगळचं सांगितलं

मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे नावाचा ब्रँड चालतो. हे हेरूनच भाजपने शिवसेनेसोबत युती केली होती. ती 25 वर्षे टिकली. 2019 मध्ये ही युती संपुष्टात आली. भाजपपासून दूर झालेले उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले. भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, मात्र ठाकरे नावाची उणीव त्यांना भासत होती. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भाजपने सोबत घेतले. त्यांचा भाजपला किती फायदा होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. भाजपने राज्यातील दोन प्रादेशिक पक्ष फोडल्याचे नागरिकांना आवडलेले नाही, असे सांगितले जाते. मात्र ते खरे की खोटे हे पाहण्यासाठी निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मुंबईत 17 मे रोजी महायुतीची सभा झाली. त्यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. त्याच दिवशी मुंबईतच महाविकास आघाडीचीही जाहीर सभा झाली.

मुंबईतील 17 मे रोजीच्या दोन्ही आघाड्यांच्या सभा आणि ही निवडणूकही राज्यातील लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील. महाराष्ट्रातून जे काही निकाल लागतील ते देशाच्या राजकारणावर परिणाम करणारे ठरतील. महायुतीची मोठी यंत्रणा, प्रचंड शक्ती आणि पक्षांतरे, पक्षफुटीची लागण झालेल्या महाविकास आघाडीची जिद्द या निवडणुकीत महाराष्ट्राने पाहिली आहे. 17 मे रोजीच्या दोन्ही सभांतील भाषणेही लोकांनी ऐकली आहेत. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात केला नाही, हे मनसेच्या कार्यकर्त्यांना खटकल्याचेही लोकांनी पाहिले आहे. राज ठाकरे गेल्या काही वर्षांपासून हिंदू-मुस्लिम करत आहेत. या सभेतही त्यांनी ते केले. तिकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचे इशारे दिले. या दोन्ही सभा पाहिल्या तर राज्यातील 48 जागांना अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाल्याचे लक्षात येईल.

महाविकास आघाडी इतकी कमकुवत झालेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात इतका जोर का लावावा लागला असेल? पक्ष गेले, आमदार -खासदार गेले आणि चिन्हही गेले... यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना लोकांमध्ये मोठी सहानुभूती असल्याचे वारंवार सांगितले जायचे. भाजपकडून वेळोवेळी सर्वेक्षणे केली जातात. एखाद्या मतदारसंघातून उमेदवार कोण असावा, यासाठी अनेकवेळा सर्वेक्षण करण्यात आले होते. राज्यातील परिस्थिती काय आहे, जाणून घेण्यासाठीही भाजपने नक्कीच सर्वेक्षण केले असणार. त्यातून त्यांना जमिनीवरील परिस्थितीचा अंदाज आला असेल. भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर जनता नाराज आहे, अशीही चर्चा ग्राउंड लेवलवर सुरू होती. याचा अंदाज आल्यामुळेच पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागला असेल. या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी चार जूनची वाट पाहावी लागणार आहे. मात्र कमकुमत वाटणाऱ्या महाविकास आघाडीने महायुतीला घाम फोडल्यामुळे या लोकसभा निवडणुकी महाराष्ट्राला महत्व प्राप्त झाले आहे, हे नाकारता येणार नाही.

BJP Narendra Modi Strategy for Maharashtra Election
George Fernandes Political Journey : कामगार नेते ते देशाचे संरक्षणमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com