George Fernandes Political Journey : कामगार नेते ते देशाचे संरक्षणमंत्री

Sarkarnama Podcast : जॉर्ज फर्नांडीस विद्रोही होते. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय होता. विपरित परिस्थितीवर मात करत त्यांनी कामगार नेता ते देशाचे संरक्षणमंत्री असा प्रवास केला होता. एका हाकेवर त्यांनी मुंबई थांबवली होती.
George Fernandes
George FernandesSarkarnama

George Fernandes Profile : कामाच्या शोधात एक तरुण मुंबईत येतो. काम मिळवण्यासाठी, मुंबईत निवारा मिळवण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागतो. रस्त्याकडेला जमिनीवर झोपून अनेक रात्री काढाव्या लागतात. मिळेत ते खावे लागते. हाच तरुण पुढे चालून कामागारांचा नेता बनतो, त्यांचा आवाज बनतो. आपल्या एका आवाजावर मुंबईला थांबवण्याइतका शक्तिशाली बनतो. त्यानंतर नगरसेवकपदापासून सुरू झालेला त्याचा प्रवास देशाच्या संरक्षणमंत्रिपदावर जाऊन थांबतो.

मुंबईला मायानागरी म्हटलं जातं. आपली स्वप्नं साकार करण्यासाठी अनेकांची पावलं मुंबईकडे आजही वळत असतात. अशा या मुंबईवर राज्य करण्याचा, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट बनण्याचा अनेकांनी विविध मार्गांनी प्रयत्न केला. त्यात काही जणांना यश आलं. त्यात कामगारांच्या हक्कांसाठी झडगणाऱ्या, एका आवाजावर मुंबई जागेवरच थांबवणाऱ्या जॉर्ज फर्नांडीस (George Fernandes) यांचा समावेश आहे! कामगारांचे नेते, नगरसेवक ते देशाचे संरक्षणमंत्री... असा डोळे दीपवून टाकणारा त्यांचा प्रवास आहे.

सडपातळ शरीरयष्टी आणि त्यावर खादीचा पायजमा आणि कुर्ता असा पेहेराव. मोडकीतोडकी चप्पल, डोळ्यांवर चष्मा... अशा काही फाटक्या नेत्यांनाही लोकांनी भरभरून प्रेम दिलं. सर्वसामान्य नागरिक, कामगारांसाठी रस्त्यावर उतरून अनेक वर्षे संघर्ष केलेले काही नेते पुढे राजकारणात सहभागी झाले आणि स्थिरावलेही. अशा नेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडीस यांचं नाव पहिल्या क्रमांकावर असावं.

आपल्या एका हाकेवर मुंबईला (Mumbai) थांबायला लावणारे जॉर्ज पहिलेच नेते असावेत. जॉर्ज जसे कामगारांचे नेते होते, तसे ते पत्रकारही होते. नगरसेवक ते देशाचे संरक्षणमंत्री (1998 - 2004) असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. मूळतः समाजवादी विचारसरणीचे असणारे जॉर्ज फर्नांडीस शेवटी उजव्या विचारसणीच्या एनडीएमध्ये सहभागी झाले आणि सरंक्षणमंत्री बनले होते. हा पल्ला गाठण्यापूर्वी जॉर्ज यांनी केलेला प्रवास थक्क करणारा आहे, रंजक आहे. कामगारांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. झोपडपट्ट्यांत दारिद्र्याचे जीवन कंठणाऱ्या कामगारांसाठी ते नायक होते. George Fernandes Political Journey

जॉर्ज फर्नांडीस यांचा जन्म 3 जून 1930 रोजी कर्नाटकमधील मंगळूर येथे एका कॅथॉलिक ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचं प्राथमिक आणि नंतर 12 वी पर्यंतचं शिक्षण मंगळूर येथेच झालं. ते आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. कुटुंबातील सदस्य त्यांना गॅरी या टोपणनावानं हाक मारायचे. कुटुंबातील पारंपरिक प्रथेनुसार जॉर्ज यांना वयाच्या सोळाव्या वर्षी धार्मिक शिक्षणासाठी बंगळुरू येथील सेंट पीट सेमिनरीमध्ये पाठवण्यात आलं. 1949 मध्ये मंगळूर सोडून जॉर्ज यांनी कामाच्या शोधात मुंबई गाठली. मुंबईत त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. ते दररोज फूटपाथवरील बाकड्यांवर झोपायचे. न चुकता पोलिस रात्री येऊन त्यांना बाकड्यावरून उठवायचे. त्यामुळे त्यांना जमिनीवर झोपावं लागायचं. असे दिवस जात असताना त्यांना एका दैनिकात प्रूफरीडर म्हणून नोकरी मिळाली.

George Fernandes
Sarkarnama Podcast : ...अन् काळाने काँग्रेसचा चकाकता तारा हिरावला

1950 मध्ये जॉर्ज हे राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात आले. ही भेट त्यांच्या आय़ुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. त्यांच्यावर लोहिया यांचा मोठा प्रभाव पडला. त्यानंतर ते सोशालिस्ट ट्रेड युनियनच्या (कामगार संघटना) आंदोलनात सहभागी झाले. त्या काळात मजूर, कामगारांची अवस्था दयनीय होती. कंपन्या, हॉटेलमधील कामगारांना कमी पैशांत काम करावं लागत होतं. या मजूर, कामगारांच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय जॉर्ज यांनी घेतला. त्यानुसार त्या आंदोलनात त्यांनी कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आवाज उठवला आणि त्यामुळं ते कामगारांचा आवाज बनले. त्या आंदोलनापासून कामगार नेते अशी ओळख त्यांना मिळाली. कामगारांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय झाले.

त्यानंतर जॉर्ज यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1967 मध्ये त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या उमेदवारीवर लोकसभेची निवडणूक लढवली. दक्षिण मुंबई मतदारसंघातून (Mumbai Constituency) त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते स. का. पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे पहिल्याच निवडणुकीत त्यांची जायंट किलर अशी ओळख निर्माण झाली. त्यांनी नऊ वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली. एकवेळा ते राज्यसभेवरही गेले होते. लोकसभा निवडणूक लढवण्यापूर्वी ते मुंबईचे नगरसेवकही झाले होते. नगरसेवकपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सातत्यानं गरीब मजूर, कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. कामगारांसाठी सतत आंदोलनं केल्यामुळं जॉर्ज यांनी राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं होतं. आंदोलनांमुळं ते प्रचंड लोकप्रिय बनले होते. ते 1969 मध्ये समाजवादी पक्षाचे सरचिटणीस, 1973 मध्ये अध्यक्ष बनले. George Fernandes Political Journey from Labor Leader to Defense Minister of the country

George Fernandes
KesharKaku kshirsagar : मातब्बर,धाडसी नेत्या; मराठवाड्यातील पहिल्या महिला खासदार केशरकाकू क्षीरसागर

वेतन आयोग लागू करावा, ही रेल्वे कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती, मात्र तत्कालीन केंद्र सरकारनं त्याकडं लक्ष दिलं नव्हतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वेतन आयोग लागू झाले होते, मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेतनात फारशी वाढ झाली नव्हती. त्यामुळे तिसरा वेतन आयोग लागू करावा, घरभाडे भत्ता वाढवावा, या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. 1974 मध्ये जॉर्ज रेल्वे फेडरेशनचे अध्यक्ष बनले आणि त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे हे प्रश्न हाती घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 8 मे 1974 रोजी मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला. मुंबईसह देशभरातील 15 लाख जणांनी संपात सहभाग घेतला. या संपामुळे केवळ मुंबईच नव्हे, तर देशही थांबला होता, ठप्प झाला होता. नंतर विविध कामगार संघटनाही या संपात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळं केंद्र सरकारचा पारा चढला होता.

जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात टॅक्सी चालक संघटना, वीज कर्मचारी संघटना, वाहतूकदारांची संघटनाही सहभागी झाली होती. चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथील रेल्वे कोच कारखान्यातील जवळपास 10 हजार कर्मचारी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. रेल्वे कर्मचार्‍यांनी आपल्या कुटुंबियांसह रेल्वे रूळांचा ताबा घेतला. या आंदोलनाचा परिणाम देशभर जाणवू लागला होता. देश ठप्प होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं आता केंद्र सरकारची चिंता वाढू लागली होती. सरकारनं कठोर भूमिका घेतली. रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना रूळांवरून बाजूला सारण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली. रेल्वे रूळांवर लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आलं. George Fernandes Political Journey

George Fernandes
Narendra Dhabholkar Case : दाभोलकर निकालामुळे पानसरे, लंकेश, कलबुर्गी प्रकरणांची चर्चा; न्याय कधी मिळणार?

हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने 30 हजार लोकांना कारागृहात डांबलं होतं, असं अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालात म्हटलं होतं. तीन आठवडे हे आंदोलन सुरू होतं. त्यानंतर समन्वय समितीने आंदोलन मागं घेतलं. त्यासाठी कोणतंही कारण देण्यात आलं नव्हतं. अशा पद्धतीने देशातील सर्वात मोठं आंदोलन संपलं होतं. आंदोलन सर्वात मोठं, ऐतिहासिक असलं तरी त्यातून निष्पन्न मात्र काही झालेलं नव्हतं. या आंदोलनामुळे जॉर्ज यांना आक्रमक कामगार नेते म्हणून देशव्यापी ओळख मिळाली. 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यासाठी या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचाही आधार घेण्यात आला होता, असे सांगितलं जातं. आणीबाणी लागू केल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं होतं. इंदिरा हटाओ अशी जणू लाटच निर्माण झाली होती. त्या लाटेचं नेते म्हणून जॉर्ज समोर आले होते.

आणीबाणी लागू झाल्यामुळे जॉर्ज यांना भूमिगत व्हावं लागलं. त्यावेळी ते ओडिशामध्ये होते. सरकारच्या निशाण्यावर आपण आहोत, याची चांगलीच कल्पना त्यांना होती. त्यामुळे जॉर्ज यांनी भूमिगत होऊन आणीबाणीच्या विरोधात आंदोलन उभं केलं. त्यांची राहणी आधीच साधी होती. आणीबाणीत त्यांनी दाढी, केस वाढवले. कधी साधू तर कधी मच्छिमाराच्या वेशात ते फिरत राहिले. अखेर बडोदा डायनामाइट प्रकरणात सरकारनं त्यांना अटक केली. इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या सभा उधळून लावण्यासाठी जॉर्ज फर्नांडीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बडोदा येथून डायनामाइट मागवल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. जॉर्ज आणि त्यांच्या 24 सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. रेल्वे रूळ, सरकारी कार्यालये उडवून देण्यासाठी या डायनामाइटचा वापर केला जाणार होता, असे निष्कर्ष नंतर सीबीआय़ने काढले होते. सरकार पाडण्यासाठी देशाच्या विरोधात युद्ध छेडल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला. संशयित आरोपींना जून 1976 मध्ये अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली.

George Fernandes
Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभेला कधी मिळणार दुसऱ्या महिला खासदार?

1977 ची लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जाहीर झाली, त्यावेळी जॉर्ज फर्नांडीस तिहार कारागृहात होते. कारागृहातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी बिहारमधील मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कारागृहात जॉर्ज यांना साखळदंडांना बांधून ठेवण्यात आलं होतं. प्रचारासाठी त्यांनी स्वत: आणि सहकारी तुरूंगाच्या गजांआड असलेल्या फोटोचा वापर केला. ते विक्रमी मताधिक्यानी विजयी झाले. आणीबाणी लागू केल्यामुळे इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्याविषयी देशभरात प्रचंड रोष निर्माण झाला होता. 1977 च्या निवडणुकीत त्यांचं सरकार कोसळलं. केंद्रात जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं. या सरकारनं बडोदा डायनामाइट केस मागे घेतली. सर्व आरोपींची सुटका करण्यात आली. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात जॉर्ज यांचा समावेश झाला. त्यांना उद्योग खातं मिळालं.

1980 च्या निवडणुकीत मुजफ्फरपूर मतदारसंघातून जॉर्ज पुन्हा विजयी झाले. 1984 मध्ये बंगळुरू उत्तर मतदारसंघातून काँग्रेस (Congress) उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यामुळं ते 1989 मध्ये पुन्हा मुजफ्फरपूरमधून लढले आणि विजयी झाले. त्यावेळी व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये काही वर्षे ते रेल्वेमंत्री होते. 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर एनडीएची स्थापना झाली. समाजवादी विचारसरणीचे जॉर्ज एनडीएचे संयोजक बनले. त्यांचा हा निर्णय धक्कादायक होता. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना हा निर्णय आवडला नव्हता. त्यानंतर 1999 मध्ये जनता पार्टीत फूट पडून जनता दल (युनायटेड) आणि जनता दल (सेक्युलर) असे दोन पक्ष अस्तित्वात आले. जॉर्ज यांनी त्यांची समता पार्टी जनता दल यूनायटेडमध्ये विलीन केली. असं असलं तरी एक गट समता पार्टीतच राहिला.

एनडीए सरकारमध्ये जॉर्ज दोन्हीवेळा संरक्षणमंत्री होते. त्यांच्या काळातच पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला होता. भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय राबवून पाकिस्तानी लष्कराला पळवून लावलं होतं. गुप्तचर संस्थांच्या अपयशामुळे हे युद्ध झाल्याची टीका विरोधक आणि माध्यमांनी केली होती. जॉर्ज यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तहलकाने शवपेटी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. नंतर पुन्हा ते संरक्षणमंत्री बनले होते. काश्मिरमधील सियाचीनला 18 वेळा भेट देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या काळातच पोखरण अणुचाचणी झाली होती. त्यांच्यावर अनेक आरोपही लागले. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांना विरोध करण्यासाठी विदेशी संस्थांकडून पेसे घेणे, संरक्षणमंत्री असताना शवपेटी घोटाळा, इस्त्रायलकडून बरॅक 1 च्या खरेदीत घोटाळा, पोखरण अणुचाचणीनंतर चीनला युद्धासाठी चिथावणी देणे आदी आरोपांचा त्यात समावेश आहे.

एका विमान प्रवासादरम्यान जॉर्ज यांची माजी केंद्रीय मंत्री हुमायूँ कबीर यांच्या कन्या लैला कबीर यांच्यासोबत ओळख झाली. पहिल्या भेटीतच त्यांचं प्रेम जुळलं होतं. काही दिवसांनंतर त्यांनी लग्न केलं. जॉर्ज यांच्या कट्टर विरोधक असलेल्या इंदिरा गांधी यांनीही त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. जॉर्ज यांना सीन फर्नांडीस नावाचा मुलगा आहे. जया जेटली यांचाही जॉर्ज यांच्या आयुष्यात प्रवेश झाला होता. मात्र त्यावर दोघांनीही कधीही भाष्य केलं नाही. जया जेटली यांच्यामुळेच लैला कबीर या जॉर्ज यांना सोडून गेल्या होत्या, असं सांगितलं जातं. काँग्रेसचा विरोध जॉर्ज यांनी अखेर पर्यंत कायम ठेवला. त्यातूनच ते भाजपच्या (BJP) नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी झाले होते. ते 2010 पासून पार्किन्सन आणि अल्झायमरनं त्रस्त होते. 29 जानेवारी 2019 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचं दिल्लीत निधन झाले. त्यावेळी त्यांना स्वाइन फ्लूचीही लागण झाली होती.

George Fernandes
Maharashtra Politics : प्रचंड घडामोडी, उलथापालथी, धक्क्यांवर धक्के...

जॉर्ज यांची साधी राहणी अखेर पर्यंत कायम होती. असं सांगितलं जातं की, त्यांनी स्वतःसाठी कोणतीही वस्तू खरेदी केली नव्हती. कुटुंबातील रिवाजाप्रमाणे तरुण जॉर्ज पाद्री बनण्यासाठी मंगळूर येथून बंगळरुला आले होते. मात्र कामाच्या शोधात ते मुंबईला आले आणि एक बंडखोर नेते बनले. त्यांच्यातील बंडखोरपणा अखेरपर्यंत कायम होता. आणीबाणीच्या काळात त्यांनी प्रचंड यातना सहन केल्या. आणीबाणी लागू करणे आणि त्या काळात झालेल्या त्रासामुळे त्यांचा काँग्रेसविरोध अखेरपर्यंत कमी झाला नाही, असं सांगितलं जातं.

George Fernandes
Lok Sabha Election : 1984 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव, नंतर मिळाला पंतप्रधानाचा मान; कोण होते 'हे' तीन नेते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.