Shrikant Shinde News : महायुतीच्या गाडीत सगळे प्रवासी एकाच दिशेने निघाले असले, तरी प्रत्येक स्थानकावर त्यांचे गंतव्य एकच असेलच असे नाही. उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील संघर्षाने आता टोक गाठले असून, त्याचे राजकीय पडसाद कल्याण-डोंबिवलीत उमटू लागले आहेत. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सुरू झालेल्या वादानंतर भाजपने उल्हासनगर महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली.
एवढेच नव्हे, तर आगामी निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम करणार नसल्याचेही भाजपकडून जाहीर करण्यात आले.
या निर्णयानंतर आरोप-प्रत्यारोपांना धार आली. उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाच्या वाटपाचा वाद आता थेट महायुतीच्या राजकीय संबंधांपर्यंत पोहोचला आहे.
आता या वादाची ठिणगी कल्याण-डोंबिवलीतही पडताना दिसत आहे. केडीएमसीतील भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी कमलेश निकम यांच्यावर टीका करत, “अडीच वर्षे तुझी बायको महापौरपदाची टर्म पूर्ण करणार नाही,” अशी राजकीय भविष्यवाणीच केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे उल्हासनगरचा वाद केवळ दोन पक्षांतील संघर्ष राहिलेला नसून, महायुतीतील स्थानिक सत्तासमीकरणांचा प्रश्न किती खोलवर गेला आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
यामागे कल्याण-डोंबिवलीची जुनी राजकीय पार्श्वभूमीही दुर्लक्षित करता येणार नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी कल्याणची जागा भाजपला मिळावी, अशी स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी होती. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास काम करणार नसल्याची भूमिकाही काही भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती. मात्र अखेरीस देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा केली आणि त्यानंतर हा विरोध मागे पडला.
म्हणजेच, उल्हासनगरमध्ये आज उफाळून आलेला संघर्ष हा केवळ स्थानिक पदाच्या वाटपाचा वाद आहे की महायुतीतील जुन्या राजकीय हिशेबांची नवी बेरीज, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतही या वादाची भाषा सोशल मीडियावर उतरू लागल्याने पुढील काळात त्याचे पडसाद किती दूरपर्यंत उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापौर अश्विनी निकम अडीच वर्षांची मुदत पूर्ण करणार की मंदार टावरे यांची ‘भविष्यवाणी’ खरी ठरणार, हा प्रश्न सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महायुतीतील हा ‘घरचा वाद’ निवडणुकीच्या मैदानातही कायम राहणार की पुन्हा एकदा वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून समीकरण सुरळीत करणार? याची जोरदार चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.