
Ravindra Chavan News : भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच सुत्रे स्वीकारली. आता संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर असणार आहे. नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते पक्षाला कशी दिशा देतात? हे बघणे आता महत्वाचे असणार आहे. पण महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यापूर्वी चव्हाण यांच्यापुढचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते त्यांचा स्वतःचाच सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद दिसत असली तरी ती प्रत्यक्षात ती राणे कुटुंबियांची ताकद आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढविण्यासाठी चव्हाण यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे एक आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. तर भाजपचेच नारायण राणे खासदार आहेत. आज जिल्ह्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तोंडी लावायला उरला आहे. आता आगामी काळातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिनी मंत्रालयावर ताबा घेण्याचं टार्गेट महायुतीचे असणार आहे. पण खासदार नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र सध्या वेगळ्या विचारात दिसत आहेत. ते भाजपऐवजी स्वत:चाचं नेटवर्क स्ट्राँग करताना दिसत आहेत. त्यामुळे चव्हाण यांना आधी भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधील वादही कमी करण्यासाठी रविंद्र चव्हाण यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
तळ कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेतील बंडानंतर ही ताकद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटली. राणे भाजपमध्ये गेल्यानंतर इथे भाजपचीही ताकद असल्याचे दिसून येऊ लागले. पण प्रत्यक्षात नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश राणे हे स्वतःचीच ताकद वाढवत असल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्हा नारायण राणेंचा हक्काचा जिल्हा. त्यांच्या मुलांना येथे सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवायच्या आहेत. कणकवली आधीच भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या ताब्यात असून त्यांनी मतदारसंघावर पकड मजबूत केली आहे.
ही स्वत:ची ताकद वाढवण्यावरूनच चव्हाण आणि राणे यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाल्याचे बोलले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप कधीच एका नेत्याला मोठं करत नाही, त्याच्या हातात जिल्ह्याची सुत्रे जातील अशा वाटा उघड्या ठेवत नाही. कुठे ना कुठे स्पीड ब्रेकर लावलेच जातात. आता असाच स्पीड ब्रेकर चव्हाण यांच्या रुपाने राणेंच्या वाटेत लावण्यात आल्याची चर्चा आहे. चव्हाण यांना आता मूळ भाजप पक्ष वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे कुठे तरी राणे यांच्याही इराद्यांना धक्का लागल्याचे बोलले जाते.
दरम्यान जिल्ह्यात सुरू असणाऱ्या चव्हाण विरुद्ध आणि राणे या वादावर देखील तोडगा काढावा लागेल. चव्हाण भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी असताना राणेंनी त्यांना थेट अंगावर घेतलं होतं. चिपळूण येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत राणेंनी चव्हाणांना थेट इशारा दिला होता. तर जोपर्यंत आपण येथील खासदार आहोत. तो पर्यंत स्थानिकच्या राजकारणात ढवळाढवळ खपवून घेणार नाही, असाच दम भरला होता. तसेच कोणाला याबाबत तक्रार करायची असेल तर करा असेही त्यांनी म्हटलं होते.
त्यामुळे चव्हाण आणि राणेंमध्ये वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता तर चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले असून त्यांना त्यांच्याविरोधातील जिल्ह्यातील विरोधाची धार कमी करावी लागणार आहे. त्यामुळे चव्हाण हे भाजप म्हणून महायुतीतील वादासह त्यांच्या आणि राणेंमधील वाद कसा कमी करतात? त्यासाठी ते कोणता मार्ग अवलंबतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याशिवाय चव्हाण यांना शिवसेनेसह मित्र पक्षांच्या नेत्यांमधील वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.