Bjp News : भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर अनेकदा डावलले. विशेषतः प्रत्येक विधानपरिषद व राज्यसभा निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत राहत होते. दोनवेळा तर त्यांना फॉर्म भरण्याची तयारी करायला सांगितली होती. मात्र, ऐनवेळी त्यांना डावलत इतरांना उमेदवारी देण्यात आली. या सर्व प्रकारनंतर पुन्हा खंबीरपणे उभा राहत त्यांनी कधीच पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली नाही. भाजपसोडून कुठेही जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगत त्यांनी संघर्षांचा वारसा जपला.
बीडच्या लोकसभा निवडणूक रिंगणात कोण उतरणार याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. प्रीतम मुंडे यांनी बीडमधून दोन टर्म पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्या हॅट्ट्रिक करतील अशी चर्चा असताना अचानक त्या जागेसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे लढवणार का ? यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे बीडची लोकसभा नेमके कोण लढवणार ? असा प्रश्न सतावत असताना पंकजा मुंडे यांना दिल्लीत काम करायला आवडेल का ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पंकजा मुंडे या २००२ पासून राजकारणात सक्रिय आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चचे काम प्रभावीपणे करीत संघटना वाढीसाठी सदैव त्या प्रयत्नशील होत्या.पंकजा मुंडे यांनी २०१२ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहिले. २००९ मध्ये त्या परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात अनेक विकासकामे करीत वडील गोपीनाथ मुंडे यांच्याकडून संघर्षाचा वारसा घेतला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या आठ दिवसातच केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्या धक्यातून सावरत त्यांनी सर्व प्रचाराची सूत्रे हातात घेतली.
2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, महाराष्ट्र भाजपने 1995 मध्ये त्यांच्या वडिलांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या धर्तीवर भाजपने पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दोन आठवड्यांची "पुन्हा संघर्ष यात्रा" काढली. ज्यानंतर शिवसेना - भाजप सत्तेवर आले. राज्यात 27 ऑगस्ट 2014 पासून 14 दिवसांच्या यात्रेला सुरुवात झाली. अमित शाह, स्मृती इराणी, राजीव प्रताप रुडी यांसारखे राजकारणी या यात्रेत सहभागी झाले होते. पंकजा मुंडे यांनी 600 रॅली आणि 3500 किलोमीटरचा रस्ता प्रवास करून 79 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुन्हा 'संघर्ष यात्रे' ला उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहांनी देखील समारोपाला हजेरी लावली होती. त्यानंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास व महिला व बालकल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून त्यांना बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र संपूर्ण चित्रच पालटले. पंकजा मुंडे (Pankaja Munde) या काळात सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर गेल्या होत्या. त्याचा फटका त्यांना बसला.
सुरुवातीला अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यांना शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात येऊनही त्यांच्या हाती फारसे काहीच लागले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबतचे संबंध ताणले गेल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागला.
त्यामुळे प्रत्येक विधानपरिषद व राज्यसभा निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत राहत होते. दोनवेळा तर त्यांना फॉर्म भरण्याची तयारी करायला सांगितली. मात्र, ऐनवेळी त्यांना डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली. गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडवणीस, पंकजा मुंडे यांच्यातील संबंध काहीसे सुरळीत झाल्याचे चित्र आहे. दोघातील ताणलेले संबंध सुरळीत करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली होती.
माजी मंत्री पंकजा मुंडे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील अबोला आता संपला आहे. त्यामुळेच येत्या काळी पंकजा मुंडेंना भाजपकडून केंद्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे.
ही ऑफर स्वीकारून त्या बीड लोकसभेच्या रिंगणात येत्या काळात उतरतील, असे दिसते. येत्या काळात दिल्लीत काम करण्याचे त्यांनी मनोमनी ठरवल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांची भाजपचे निवडणूक निरीक्षक म्हणून त्यांच्यावर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निवडण्याची जबाबदारी दिली आहे. नेमणूक करण्यात आलेले हे निरीक्षक त्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडेंनी दिल्लीत काम करण्याची तयारी केल्याचे दिसते.