
Pune News : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण हेलकावे खात आहे. नेते परस्परविरोधी टोक गाठत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच भाजपचे मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात रान पेटवले होते. परिस्थिती चिंताजनक बनण्याची भीती निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय अत्यंत पद्धतशीरपणे हातावेगळा करत वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांना गुंडाळून टाकले आहे.
महायुती सरकारकडे प्रचंड बहुमत आहे. असे असले तरी सत्तेत आल्यापासून महायुतीतील पक्षांतील अंतर्विरोध सतत समोर येत आहेत. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर दुष्कर्म आदी घटनांमुळे सरकारची कोंडी झाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सरकार आणखी बॅकफूटवर गेले होते. अशातच घटनात्मक पदांवरील व्यक्तींची वादग्रस्त विधाने सुरू होती.
सरकार सर्वार्थाने स्थिर असताना राजकीय, सामाजिक वातावरण मात्र अस्थिर झाले होते. मंत्री नितेश राणे यांनी हलाल आणि झटका मटणाचा विषय उचलून धरत हलाल मटणाला विरोध करण्याचे आवाहन केले. हिंदू खाटिक समाजातूनही त्याला मोठा विरोध झाला. हे सगळे सुरू असतानाच औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण तापले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात दंगल झाली. औरंगजेबाची कबर हटवा, या महायुतीतील काही नेत्यांच्या, पक्षांच्या भूमिकेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःला बाजूला केले. एकंदरित, राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
तिकडे, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. सपकाळ यांनी दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना मदत करणाऱ्यांचे पुतळे काढून टाकणार का, असा प्रश्न त्यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि सरकारला वारंवार केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारभाराची तुलना सपकाळ यांनी औरंगजेबाच्या कारभाराशी केली. फडणवीस हेही औरंगजेबाइतकेच क्रूर आहेत, असा आरोप त्यांनी केला. तो भाजपच्या जिव्हारी लागला. भाजपपेक्षा अधिक तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागला.
हे जे प्रकार सुरू होते, ते मुस्लिम समाजालाच नव्हे तर बहुसंख्य हिंदू समाजालाही आवडलेले नव्हते. घटनात्मक पदांवरील नेत्यांच्या वादग्रस्त विधानांना लोक कंटाळले होते. लोकांच्या मनात काय चालले आहे किंवा समाजात वारे कोणत्या दिशेने वाहते आहे, हे जाणून घेण्याची सरकारची एक यंत्रणा असते. ही यंत्रणा सरकारला वेळोवेळी 'फीडबॅक' देत असते. सध्याच्या परिस्थितीतही सरकारला 'फीडबॅक' नक्कीच मिळाला असणार. अपवाद वगळता लोकांना शांततामय सहजीवन हवे आहे.
प्रचंड बहुमताच्या बळावर स्थिर असलेल्या सरकारची डोकेदुखी वाढली होती. मंत्री राणे, आमदार जगताप यांना ढिल देणे अंगलट येणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लक्षात आले असणार. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. यानिमित्त मुंबईत आयोजित इफ्तार पार्टीला अजितदादांनी हजेरी लावली. ''मुस्लिमांना जो डोळे दाखवणार त्याला सोडणार नाही,'' असा इशारा त्यांनी दिला. तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे, असेही ते मुस्लिम समाजाला उद्देशून म्हणाले.
अजितदादांच्या या भूमिकेमुळे महायुतीत अतंर्गत संघर्ष निर्माण होईल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजितदादांच्या विधानाचे समर्थन केले. मुस्लिम समाजाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर आपणही त्याला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. नागपूरच्या दंगलीत ज्या कोणाचा हात आहे, त्यांनाही सोडणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे मंत्री नितेश राणे यांना मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच वाक्यात मंत्री राणे आणि वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना गुंडाळून टाकले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेत राजकारणही दडलेले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे महायुतीला अडचणीत टाकणारे प्रश्न उपस्थित करत होते. मुस्लिम मतदारही महायुतीसोबतच राहावा, याची काळजी फडणवीस, अजितदादांनी घेतली आहे. हिंदुत्ववादी मतदार तर महायुतीसोबतच राहणार, अशी खात्री फडणवीस यांना असणार. मुस्लिम मतदार काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे न जाता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महायुतीकडेच राहावा, अशी या विधानांमागची व्यूव्हरचना आहे.
सपकाळांनी फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्याविरोधत आक्रमक झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात पुन्हा एकदा एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीची दिशा आणि धोरणे फडणवीस आणि अजितदादाच ठरवत आहेत. प्रभावी 'नॅरेटिव्ह'ही हे दोघेच तयार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्ष सोडणार, अशी चर्चा सातत्याने सुरू आहे. महायुतीतील नेते तसा दावा करत आहेत. एकजुटीचा, एकवाक्यतेचा अभाव असलेल्या महाविकास आघाडीपुढे फडणवीस आणि अजितदादांनी मोठे संकट निर्माण केले आहे.
एका विशिष्ट समुदायाला सातत्याने लक्ष्य करणाऱ्या नेत्यांचा विषय सध्यातरी फडणवीस आणि अजितदादांनी संपवल्याचे दिसत आहे. ते किती दिवस टिकून राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्याच्या प्रगतीसाठी शांततामय सहजीवन अत्यंत आवश्यक असते, हे सरकारलाही माहित असते. नागपूर दंगलीवरून लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. दंगलीत नेत्यांची मुले नसतात, सामान्यांची मुले असतात, अशी चर्चा समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात झाली. या सर्व बाबींमुळे राज्यकर्त्यांचे डोळे उघडले असावेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.