
Mahayuti News : महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुती ऐतिहासिक यशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तेवर आली.न भूतो भविष्यती यश मिळवलेल्या महायुतीची गाडी सुसाट धावणार हे निश्चित मानलं जात होतं. कुठल्याही प्रकारचं स्पीडब्रेकर असण्यांचं कारण नव्हतं. पण भाजप स्वत:132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 41 आणि अपक्ष 7 अशा एकूण 237 जागांवर विजय मिळवल्यानंतरही भक्कम महायुतीला हळूहळू रुसवे-फुगवे, आरोप-प्रत्यारोप, नाराजी यांचे जोरदार तडाखे बसू लागले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील मित्रपक्षांतला सुप्त संघर्ष थोपवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
विधानसभा निवडणुक निकालानंतर महायुतीत (Mahauti) मुख्यमंत्रीपदावरुन मोठी खलबतं झाली होती. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकांवर बैठका यांनी महायुतीतला मुख्यमंत्रिपदावरुन निर्माण झालेला वाद चांगलाच चर्चेचा विषय ठरला. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड जोर लावूनही अखेर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
मुख्यमंत्रिपदाचा वाद थांबत नाही तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावरुनच महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख वेळ आणि ठिकाण परस्पर जाहीर करुन टाकले. त्यामुळे हा भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षासाठीही मोठा धक्का होता. यामुळे मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करताना भाजपची पुरती दमछाक झाली होती.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याआधी काही तासांपर्यंत महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपदावरुन नाराजीनाट्य सुरु होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नांनंतर एकनाथ शिंदे हे शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास तयार झाले होते. त्यामुळे शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स संपला होता.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरुन जोरदार खटके उडाल्याचे दिसून आले होते. शपथविधी सोहळ्यानंतर त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनंतर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालं. गृह, अर्थ,नगरविकास, कृषी,आरोग्य, सार्वजनिक बांधकाम,जलसंपदा अशा विविध महत्त्वाच्या खात्यांवरुन जोरदार रस्सीखेच महायुतीत पाहायला मिळाली.मात्र,या कालावधीत शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या दिल्लीदरबारी अनेक चकरा झाल्या.तेव्हा कुठं मंत्रिमंडळाचा प्रश्न मार्गी लागला.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप होऊन महिना उलटून गेल्यानंतरही महायुती सरकारकडून पालकमंत्रिपदाचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षाकडून या दिरंगाईबद्दल सरकारला धारेवर धरले जात होते. महायुती सरकारच्या रखडलेल्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे.
सरकारमध्ये विशेषतः राज्यातील रायगड, बीड, सातारा,जळगाव यासारख्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमधील तीन घटक पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. पण 18 जानेवारी 2025 ला रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली.
पण रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं समोर आलं. कारण काही तासांतच नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली. याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही तासांनंतरच अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.
रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. पालकमंत्रिबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे,अशा शब्दांत गोगावलेंनी नाराजी बोलून दाखवली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्याआधी जाहीर केलेल्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवरुन घमासान सुरू आहेत. महायुतीतील पक्षांमध्येच वार पलटवार सुरू आहे.रायगडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात मोठा वाद उफाळून आला आहे. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पण या प्रकरणात अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
तसेच शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रायगडमध्ये उफाळलेल्या महायुतीतील पालकमंत्रिपदाच्या वादाला बळ दिलं.त्यांनी वर्षानुवर्षे काम केलेल्या नेत्यानं एका पदाविषयी अपेक्षा ठेवणं,यात गैर काय असं म्हटलं होतं.पण हा वाद कधी शमणार अशी विचारणा सध्या केली जात आहे.
तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट झालेल्या सुधीर मुनगंटीवार,छगन भुजबळ,रवीद्र चव्हाण, तानाजी सावंत,अब्दुल सत्तार यांसारख्या नेत्यांनी महायुती सरकारमध्ये असूनही त्यांच्या पक्षाच्या धोरणांवर उघड उघड टीका करत आपली नाराजी दाखवून दिली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील मित्रपक्षांना टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महायुतीतील तीनही मित्रपक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरुन खटके उडण्याची शक्यता आहे. कारण तीनही पक्षांकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे वाद,रुसवे-फुगवे,आरोप-प्रत्यारोपांमुळे फडणवीसांसमोर महाराष्ट्राचा विकासाचा गाडा हाकण्यासोबतच मित्रपक्षांना सांभाळून घेणंही तितकंच परीक्षा पाहणारं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.