
Mumbai News : आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण येत्या काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केला. त्यांचे मनोगत आणि राज्यातील सद्यस्थिती याचा विचार केला तर काँग्रेसपुढील आव्हानांच्या डोंगराखाली सपकाळ दबून जाणार की काय? अशी भीती वाटत आहे. ज्या संकल्पना घेऊन ते आले आहेत त्याच्या अगदी विपरीत पक्षाची आज अवस्था दिसत आहे.
येत्या काळात सपकाळ यांच्यासमोर समोर घोटाळ्याच्या गाळात पुरते अडकलेल्याना बाहेर काढताना त्यांची खरी कसोटी लागणार आहे. पक्षातील बदलला प्रस्थापित त्यांना कितपत साथ देतील, हे येत्या काळात समजणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसच्या (Congress) स्वभावाला जो रोग लागला आहे ते दूर करण्यासाठी त्यांना काही निर्बंध घालावे लागणार आहेत.
काँग्रेस पक्षाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळवतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा आव्हानात्मक अवस्थेत काँग्रेसने सपकाळ यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली आहेत. या पदावर नवा चेहरा दिल्यावर दोनच शक्यता असतात. एक तर येत्या काळात पक्षवाढीसाठी ते प्रयत्न करतील अथवा पक्षाचे नुकसान होईल. दुसरे म्हणजे नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण की जे पक्षाचे नुकसान व्हायचे होते ते होऊन गेले आहे. त्यामुळे आता फायदाच होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात त्यासाठी त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहे.
हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) हे कोणत्याच गटाचे नाहीत. त्यामुळे ते काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणात अडकून राहणार नाहीत. उलट गटातटाच्या राजकारणात अडकलेल्या नेतेमंडळींना बाहेर काढण्याच्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. आजच्या काँग्रेसच्या नेत्यांनी बिघडवलेला काँग्रेस सुधारण्यासाठी अनेक कठीण निर्णय त्यांना वेळप्रसंगी घ्यावे लागतील. प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारताना पक्षाबद्दलची भावना व्यक्त करणे, ही एक बाब झाली. पण या भाषणातून व्यक्त केलेला भावना पक्षातील बदल अमलात आणण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत.
सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, अनेक संस्थानिक कुटुंबात, राजकारणात असल्याने त्यांना कितपत हे सर्व काही पचनी पडेल, हेच आता सांगता येणार नाही. लगेचच सर्वात बदल घडेल, अशी जादूची कांडी आज कोणाकडे नाही. त्यातच आता पुढचे साडेचार वर्षे केंद्र व राज्यात काँग्रेसची सत्ता असणार नाही. पक्ष चालवायचा म्हटले तर पैसा लागतो. त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ खर्च करू शकतील, अशी त्यांची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसला लागलेली ही घरघर बाजूला सारत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची भूमिका त्यांना पार पाडत पक्षाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाच पक्ष बनला पण विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. त्यामुळे येत्या काळात नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागी विजय मिळवून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे येत्या काळात आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत करण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.