Mumbai News : विधान परिषदेच्या निवडणुकात काँग्रेसच्या सात आमदरांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले. सत्तेत असताना 2022 मध्येही काँग्रेसची मते फुटली होती. लोकसभा निवड़णुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचे आमदार फुटले. फुटिरांवर कारवाई कधी होणार, याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) मतांना महायुतीने पुन्हा एकदा सुरूंग लावला. त्याला आता आठवडा होत आला आहे, मात्र कारवाईच्या नावाखाली आनंदीआनंद आहे. फुटलेल्या, क्रॉस व्होटिंग केलेल्या 7 आमदारांवर कारवाई करणार, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे, मात्र कारवाई राहिली दूरच, या प्रकरणाला आता फाटे फुटत आहेत. कारवाई लवकर होणार, की 2022 प्रमाणे फुटिरांना पुन्हा अभय मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Congress News )
विधान परिषदेच्या 2022 च्या निवडणुकीतही काँग्रेसची मते फुटली होती. फुटिरांवर कारवाई करण्याची धमक काँग्रेसने त्यावेळी दाखवली नव्हती. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेत होता. आता सत्तेत नसला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उल्लेखनीय यश मिळाले आहे. काँग्रेस 13 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अपक्ष म्हणून विजयी झालेले सांगलीचे खासदार विशाल पाटील हेही नंतर काँग्रेससोबत आले. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांची संख्या 14 वर गेली आहे. असे असतानाही फुटिरांवर तातडीने कारवाई करण्याची धमक या पक्षात नसल्याचे दिसून येत आहे.
ज्यांच्यावर क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय आहे, तेच आमदार आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर डोळे वटारत आहेत.विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. एक उमेदवार अधिक असल्यामुळे घोडेबाजार होणार, हे निश्चित होते. यावेळीही या घोडेबाजाराला काँग्रेसचे आमदार बळी पडले. 12 जुलै रोजी मतदान झाले. त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर झाला. महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले.
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनचे (Shivsena) असे दोघे विजयी झाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पुरस्कृत केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उर्वरित मतांवर पाटील विजयी होतील, असे गणित होते, मात्र ते जुळले नाही. जयंत पाटील यांचा पराभव झाला.
काँग्रेसने या फुटीर आमदारांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे दिल्लीला पाठवला आहे. पक्षाचे निरीक्षक के. सी. वेणुगोपाल हे 19 जुलै रोजी मुंबईत येणार आहेत. ज्यांच्यावर संशय आहे, अशा सात आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी त्या दिवशी बोलावण्यात आले आहे. म्हणणे मांडल्यानंतर या आमदारांचे निलंबन केले जाणार आहे. त्यानंतर त्या सर्वांची नावे जाहीर केली जातील, असे सांगितले जात आहे. आमदार हिरामण खोसकर यांनाही म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात आले आहे. आपण क्रॉस व्होटिंग केलेले नाही, असे त्यांनी आधीच सांगून टाकले आहे. आता त्या सात आमदारांत समावेश झाल्यामुळे खोसकर भलतेच संतापले आहेत.
अन्य सहा आमदारांच्या नावांची चर्चा होत नाही. मात्र आपल्याच नावाची अधिक चर्चा होत असल्यामुळे आमदार खोसकर यांना हा संताप आला आहे. त्याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनाही कळवले आहे. निलंबनाची कारवाई झाल्यास अन्य पर्याय शोधण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काही आमदार नाराज असल्याचेही ते म्हणाले आहेत.
काही आमदार पटोले यांच्यावर नाराज असल्याचे म्हणणे मांडण्याची नोटीस आल्यानंतर आमदार खोसकर यांना कळाले, हे विशेष. 2022 मध्ये फुटिरांवर कठोर कारवाई न केल्याचे फळ काँग्रेसला 2024 मध्ये मिळाले आहे. ज्या सात आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे, काँग्रेसने संबंधित मतदारसंघांत अन्य उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. 19 जुलै रोजी कारवाई होईल का, हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे कारवाई राहिली लांब, काँग्रेसमध्ये अन्य सोंगेच सुरू असल्याचे दिसत आहे. (Edited By : Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.