Mahavikas Aaghadi News : आघाड्यांच्या राजकारणात समंजसपणा दाखवत दौन पावले मागे घ्यायचे असतात, याचा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला विसर पडला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास भलताच वाढलेला दिसून येत आहे. यातूनच विदर्भातील काही मतदारसंघांवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये टोकाचा वाद निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना ठाकरे गटात तणाव निर्माण झाला होता. तो वाद अखेरपर्यंत मिटला नव्हता. विधानसभेच्या काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद मर्यादेपेक्षा अधिक ताणला गेला आहे.
विदर्भातील 10 ते 12 जागांवरून हा वाद असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेला आम्ही काही जागा सोडल्या होत्या, परतफेड म्हणून काँग्रेसने विधानसभेच्या काही जागांचा त्याग करावा, अशी शिवसेनेची (ShivsenaUBT) भूमिका आहे. संबंध इतके ताणले गेले आहेत की आता वाद मिटला तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील का, याबाबत शंकाच आहे.
गेल्या पाच वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला उभ्या फुटीची लागण झाली. काँग्रेस पक्षही यातून सुटला नाही. काँग्रेसमध्ये उभी फूट पडली नाही, मात्र महत्वाच्या नेत्यांनी पक्षाचा त्याग करत भाजपमध्ये प्रवेश केला. हे प्रकार महाराष्ट्रातील लोकांना आवडले नव्हते. त्यातच महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत एकीचे प्रदर्शन केले. त्यामुळे लोकांनी त्यांच्या झोळीत मतांचे दान टाकले.
विधानसभा निवडणुकीतही असेच चित्र दिसण्याची शक्यता होती. यासाठी शरद पवार यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या टोकाच्या भूमिकेमुळे चित्र वेगळे निर्माण होऊ लागले आहे.
शिवसेना आणि काँग्रेस अगदी वेगळ्या, अपवादात्मक राजकीय परिस्थितीमुळे एकत्र आले होते. दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत टोकाची भिन्नता आहे. मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना - भाजपची युती तुटली होती. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेनेने काँग्रेससोबत घरोबा केल्यामुळेच आम्ही बाहेर पडलो, असे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार सांगतात. एकनाथ शिंदे अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिले, हा भाग वेगळा.
महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊन उद्धव ठाकरे यांनी एका अर्थाने मोठा त्याग केला, असे म्हणता येईल. उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, त्यामुळे भाजपसोबत राहिले असते तरी त्यांचा पक्ष सत्तेत राहिलाच असता. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वांना मान्य असलेल्या चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा मार्ग शरद पवार यांनी शोधला होता.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आले नसते तर काँग्रेसला सत्तेत येण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. काँग्रेसला याचा विसर पडलेला दिसत आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे चेहरे असणे, हे एक महत्वाचे कारण होते, याचाही विसर काँग्रेसला पडला आहे.
हरियाणा लोकसभा निवडणुकीतही प्रदेश पातळीवर काँग्रेस नेत्यांनी असाच अतिआत्मविश्वास दाखवत आ़डमुठी भूमिका घेतली होती. राहुल गांधी यांनी सूचना करूनही आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यास हरियाणातील स्थानक नेत्यांनी नकार दिला होता. त्याचा फटका निवडणुकीत बसला.
सर्व बाबी अनुकूल असतानाही काँग्रेसला सत्तेचा सोपान गाठता आला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. वाद मिटला तरी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करणार का, की एकदिलाने काम करणार, यावरच महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.
काही जागांचा वाद नको तितका ताणला गेल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत बेदिली निर्माण होऊ शकते. बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार असतील तर आम्ही येणार नाही, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाकडून घेण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील वाद किती टोकाला गेला आहे, याची प्रचिती येऊ शकते. हा वाद मिटावा, यासाठी शरद पवार यांनीही प्रयत्न केले, मात्र, त्यानंतरही हे पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे दिसत आहे.
प्रश्न अस्तित्वाचा असल्यामुळे दोन्ही पक्ष एका मर्यादेनंतर माघार घेऊ शकतात. मात्र हा वाद नको तितका ताणला गेल्यामुळे महाविकास आघाडी म्हणून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.