Dawood Ibrahim : डोंगरी टू कराची व्हाया दुबई... मुंबई पोलिसांना घाबरून पळाला होता दाऊद

Crime News : मोस्ट वाँटेड गँगस्टरवर कराचीत विषप्रयोग, तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी आवळला होता फास
Dawood Ibrahim
Dawood IbrahimSarkarnama
Published on
Updated on

Dawood Ibrahim News : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दहशत वाढली होती. गँगवार, खून, खंडणी उकळणे असे प्रकार मुंबईत नित्याचेच झाले होते. 1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. भाजपचे दिग्गज नेते कै. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री बनले, गृहखातेही त्यांच्याकडेच होते. गुन्हेगारीवर आळा घालण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. सत्तेत आलो तर दाऊदला अटक करणार, असे आश्वासन गोपीनाथ मुंडे यांनी दिले होते. दाऊदने देशाबाहेर राहून मुंबईत आपल्या गँगच्या माध्यमातून दहशत पसरवली होती. तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील टोळ्यांविरोधात कठोर पावले उचलली होती. मात्र त्यांना दाऊदला अटक करणे शक्य झाले नाही.

दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात राहत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांचा तो व्याही आहे. त्याच्यावर विषप्रयोग झाला असून तो कराचीतील रुग्णालयात दाखल असल्याच्या बातम्या सकाळपासून सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानातील आरजू काझमी या पत्रकाराने तिच्या यूट्यूब चॅनेलवरून ही बातमी सर्वात आधी दिली.

पाकिस्तानातील काहीजणांनी दाऊदचा मृत्यू झाल्याचे ट्विट केले आहेत. पाकिस्तान सरकारकडून याला दुजोरा मिळालेला नाही. तसा दुजोरा मिळणेही अवघड आहे, कारण दुजोरा दिला की दाऊद पाकिस्तानात राहत होता, हे पाकिस्तान सरकारनेच जाहीर केल्यासारखे होईल. दाऊद पाकिस्तानात असल्याचे यापूर्वीही अनेकवेळा समोर आले होते, पण पाकिस्तानने ते मान्य केले नव्हते. यावेळी मात्र पाकिस्तान पुरता कोंडीत अडकला आहे.

Dawood Ibrahim
Shivsen Vs MNS : सेटलमेंट कोण कोणाशी करतंय, हे जनतेला माहिती आहे; सुनील प्रभूंचा राज ठाकरेंवर निशाणा

गोपीनाथ मुंडे हे 1995 ते 1999 या काळात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होते. त्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्डचा धुमाकूळ सुरू होता. गँगवॉर, खंडणीसाठी मुंबईतील गल्लोगल्ली दिवसाढवळ्या खून पडत होते. दाऊदच्या नावाने खंडणी उकळण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू होते. गुंडांची संख्या वाढली होती, गुन्ह्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली होती. बिल्डर, बॉलीवूड सेलिब्रिटीही खंडणीला बळी पडले होते, त्यांचेही खून झाले होते.

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) गृहमंत्री झाले आणि त्यांनी अंडरवर्ल्डच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. गुन्हेगारी संपवण्यासाठी मुंडे यांनी पोलिसांना मोकळीक दिली. त्यामुळे अंडरवर्ल्डमध्ये दहशत पसरली. दाऊद इब्राहिमला अटक करणार, असे मुंडे यांनी त्यावेळी निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होते. 80 आणि 90 दशकात बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चेहरे उदयाला आले होते. मात्र ते सुरक्षित नव्हते. बॉलिवूडसह उद्योजकांतही अंडरवर्ल्डची दहशत होती.

दाऊद इब्राहीमसह छोटा शकील, रवी पुजारी, भरत नेपाळी हे खंडणी उकळायचे. त्यामुळे सेलिब्रिटीज आणि उद्योजक कायम दहशतीखाली राहायचे. मुंडे यांनी मुंबईतील 40 हजार पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना मोकळीक दिली आणि त्याचा परिणाम दिसून आला. दाऊद पोलिसांच्या हाती लागला नाही, मात्र पोलिसांच्या दहशतीमुळे त्याला देशातून पळ काढावा लागला. अंडरवर्ल्डची दहशत जवळपास संपुष्टात आली.

दया नायक, विजय साळसकर अशा पोलिस दलातील त्यावेळच्या एन्काऊन्टर स्पेशालिस्टची आजही चर्चा होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गावात 26 डिसेंबर 1955 रोजी दाऊद इब्राहीम कासकर याचा जन्म झाला. त्याचे वडील इब्राहीम कासकर मुंबई पोलिसांत हवालदार होते. दाऊदचे बालपण मु्ंबईच्या डोंगरी भागात गेले. नंतर डोंगरीचा परिसर दाऊदच्या गुन्हेगारी कृत्यांचे केंद्रस्थान बनला. कमी वयातच शिक्षण सोडून तो गुन्हेगारी जगताकडे वळला. त्याने भाऊ शाबिर कासकर सोबत 1970 मध्ये डी कंपनी बनवली. डी कंपनीद्वारे आता जगभरात अंमली पदार्थ, शस्त्रांची तस्करी केली जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

1992 मध्ये बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईसह देशात दंगली सुरू झाल्या. एस. हुसेन झैदी यांच्या 'ब्लॅक फ्रायडे' या पुस्तकानुसार, या दंगलींचा बदला घेण्यासाठी निकवर्तीयांकडून दाऊदवर दबाव वाढू लागला होता. त्यानंतर दाऊदने मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांचा डाव रचला. त्यानुसार 1993 मध्ये मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात जवळपास 257 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तो भारताचा मोस्ट वाँटेड गँगस्टर बनला. त्यामुळे देश सोडून गेल्यानंतर तो कधीच भारतात परत आला नाही.

दुबईहून कराचीला शिफ्ट झाल्यानंतर तेथे तो आयएसआय आणि लष्कर ए तय्यबा या दहशतावादी संघटनेच्या संपर्कात आला. 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासह सागरी मार्गाने मुंबईला पाठवण्याची सोय दाऊदनेच केली होती. मुंबई हल्ल्यात 173 जणांचा मृत्यू झाला होता.

ओसामा बिन लादेन आणि अल कायदाशीही डी कंपनीचे संबंध होते, असा दावा अमेरिकेने केला होता. त्यानंतर दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशवादी घोषित करून विविध देशांतील त्याची संपत्ती जप्त करण्यात आली होती. दाऊद 1984 ला मुंबईतून दुबईला पळाला आणि 1993 नंतर पाकिस्तानात आश्रयाला गेला.

(Edited by Sachin Waghmare)

Dawood Ibrahim
Dawood Ibrahim News : दाऊदच्या फरार नातेवाइकाला ३० वर्षांनंतर अटक; 'डी गँग'ची उलगडणार अनेक गुपितं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com