
Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाकडून तयारी केली जात आहे. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी महायुती होणार की नाही याविषयी उत्सुकता आहे. दिवाळीनंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता गृहीत धरून महायुतीकडून तयारी सुरु आहे. त्यातच गेल्या काहे दिवसापासून निवडणुकीच्या तोंडावर नगरविकास खात्यातील निधी वाटपावरून वाद सुरू झाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जात नसल्याने कामकाजात तातडीने सुधारणा करून या योजनांना गती देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून महायुतीमधील मित्रपक्षात मतभेद असल्याचे पुढे आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मंत्रीपद, खातेवाटप, पालकमंत्री, बंगले वाटप यावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसापूर्वी नगरविकास खात्यामार्फत शिंदेंच्या शिवसेनेला जास्त निधी मिळतो, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग वाढविण्यासाठी बाहेरच्या लोकांना भरपूर निधी देण्याची शक्यता असल्याने मित्रपक्षांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या खात्याच्या कारभारात लक्ष घालण्याचे ठरवल्याचे दिसत आहे.
या सर्व प्रकारावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचेही पुढे आले होते. त्यांनी नगरविकास विभाग व मंत्रिमंडळाच्या एके दोन बैठकांना दांडी मारली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या नियोजनाच्या बैठक व दोन दिवसापूर्वी झालेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीस एकनाथ शिंदे हजर होते. त्यानंतर नगरविकास विभागाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर सीएम फडणवीस (Devendra fadnavis) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दोघांमधील दुरावा पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध कल्याणकारी योज़न राबवत आहे. या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. त्यामुळे येत्या काळात या सर्व योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कामाना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय केंद्र सरकारच्या योजना अंमलबाजवणी करीत असताना राज्य सरकार कुठेही मागे पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमृत 2.0 योजनेंतर्गत मंजूर केलेल्या केंद्रस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीत प्रगती नसल्यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर तीव्र असंतोष व्यक्त केला. त्यांनी या योजनांचे काम मार्च 31, 2026 पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठरवली आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की जलपुरवठा, स्वच्छता, हिरवा उद्यान, तलाव पुनरुज्जीवन यांसारख्या क्षेत्रांसाठी मिळालेले निधी वेळेवर वापरून संबंधित प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अमृत 2.0 साठी राज्याला केंद्राकडून 9 हजार कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीचा प्रभावी वापर करणे हे सरकारचे उत्तरदायित्व असल्याचे सांगत नगरविकास खात्याच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरविकास खात्याच्या निधीवाटपाचे निर्णय त्यांच्या नियंत्रणाखाली आणले आहेत, ज्यामुळे शिंदे गटांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नगरविकास खात्याचे मोठ्या रकमेचे निधीवाटप करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मंजुरी घेणे बंधनकारक केले आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाची स्वायत्तता कमी होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावरील कामगिरीबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली असल्याने येत्या काळात या दोघांमधील दुरावा वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.