Dharashiv Lok Sabha News : तहान-भूक विसरलेल्यांना आराम; तरीही महिनाभर धडधड कायम...

Political News : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत एकूण 52.78 टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम आकडेवारी येईपर्यंत, त्यात आणखी वाढ झालेली असेल.
Archana Patil, Omraje Nimbalkar
Archana Patil, Omraje NimbalkarSarkarnama

Dharashiv News : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात गेला महिनाभर प्रचाराची राळ उडाली होती. महायुतीच्या उमेदवाराची तगडी यंत्रणा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा जनसंपर्क अशी ही लढाई झाली. तहान-भूक विसरून उमेदवारांसाठी दिवस-रात्र एक करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदान झाल्यानंतर दिलासा मिळाला असणार, मात्र चार जूनपर्यंत त्यांची ध़डधड वाढलेलीच राहणार आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत एकूण 52.78 टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम ओकडेवारी येईपर्यंत त्यात आणखी वाढ झालेली असेल. 2019 ला एकूण 63.75 टक्के मतदान झाले होते. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil)आणि महाविकास आघाडीतील (MVA) शिवसेनेचे (Shivsena) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omarajenimbalkar) यांच्यात लढत झाली. विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीचा प्रचार होईल, असे वाटत असतानाच तो पुन्हा दोन कुटुंबांवर गेला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे वडिल पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येचा मुद्दा या निवडणुकीतही चर्चेत आला.

महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब लागला. त्यापूर्वी महायुतीकडून काही उमेदवारांनी चाचपणी सुरू केली होती. दिवस जातील तशी ती नावे मागे पडत गेली. अखेर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली.

Archana Patil, Omraje Nimbalkar
Bhivandi Lok Sabha 2024 News : आजारपणानंतर शरद पवार पुन्हा मैदानात; आता कल्याण, भिवंडीकडे मोर्चा

घड्याळाच्या चिन्हावर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना यश आले. महायुतीत हे सुरू असताना महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मतदारसंघाची एक फेरी पूर्ण केली होती. महाविकास आघाडीकडून उमेदवारी त्यांनाच मिळणार, हे निश्चित होते. कारण, स्पर्धेत अन्य कुणीही नव्हते.

अर्चनाताईंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातही नाराजीनाट्य सुरू झाले. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत या मतदारसंघातून इच्छुक होते. कळंबसारख्या शहरात संपर्क कार्यालय सुरू करून त्यांनी आपण इच्छुक असल्याचा संदेश दिला होता. इच्छुकांची संख्या वाढल्याने जागेसाठी ओढाताण सुरू झाली. अजित पवार यांनी परभणी मतदारसंघावरही दावा केला होता. तिकडे भाजपने रासपचे महादेव जानकर यांना रिंगणात उतरवल्यामुळे उस्मानाबाद मतदारसंघ अजितदादांना सुटला.

मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घ्यावा, यासाठी धनंजय सावंत यांनी शक्तिप्रदर्शन केले, ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. उमेदवारीसाठी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हेही इच्छुक होते. नाराजी दूर करून या सर्वांची मोट बांधण्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना यश आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्री डॉ. सावंत हे आक्रमक बोलण्यासाठी ओळखले जातात. प्रचारातही ते तसेच बोलू लागले. त्यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वडिलांचा उल्लेख करत जिल्हा बँक बुडवल्याचा, तेरणा कारखाना अडचणीत आणल्याचा आरोप केला. वडिलांचा उल्लेख येताच राजेनिंबाळकर आणखी आक्रमक झाले. त्यांनी सावंत यांना इशारे देत त्यांच्या जिव्हारी लागेल अशी टीका केली.

मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. या पाच आमदारांसह नुकतेच भाजपवासी झालेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे मोठे नेतेही अर्चना पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले. यामुळे सर्व शक्ती महायुतीच्या बाजूने एकवटल्याचे चित्र निर्माण झाले. अर्चना पाटील यांच्या वातावरण निर्मितीसाठी ही जमेची बाजू ठरली.

खासदार राजेनिंबाळकर यांच्याकडे वक्तृत्वकौशल्य आहे. त्याच्या बळावर त्यांनी महायुतीच्या सर्व दिग्गजांच्या आरोपांना सडेतोड उत्तरे दिली. मी लोकांचे फोन उचलतो, नाही उचलला तर कॉलबॅक करतो, मी लोकांच्या सतत संपर्कात राहतो, असे नॅरेटिव्ह त्यांनी आधीच तयार करून ठेवले होते. त्याला कारणही तसेच होते.

Archana Patil, Omraje Nimbalkar
Om RajeNimbalkar: ओमराजे म्हणाले; 'आमदार, मंत्री केलं तरी माणसं फुटली'

माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची याच कारणावरून मोठी अडचण झाली होती. ते लोकांच्या संपर्कात राहात नाहीत, यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे राजेनिंबाळकर यांनी पाच वर्षे सतत लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. हे नॅरेटिव्ह तोडण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी केला, मात्र त्यात कितपत यश आले, हे पाहण्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

याउलट कोणती विकासकामे केली, यावरून राजेनिंबाळकर यांना घेरण्यात महायुतीच्या नेत्यांना म्हणावे तितके यश आल्याचे दिसले नाही. राजेनिंबाळकर यांनी कोणती विकासकामे केली, यावर चर्चा नेण्याऐवजी ती त्यांचे वडील पवन राजेनिंबाळकर यांच्या कामांवर, त्यांच्या फोन उचलण्यावर नेण्यात आली.

राजेनिंबाळकर यांचे फोनचे नॅरेटिव्ह तोडण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी अखेरपर्यंत केला. खासदार आपला फोन उचलतो, याचे लोकांना कौतुक वाटते, हे सत्य आहे. खासदारांचे काम लोकांचे फोन उचलण्याचे आहे की विकासकामे करण्याचे, यावर चर्चा होऊ शकते. मात्र, खासदांरानी लोकांचे फोन उचलले म्हणजे काही चुकीचे केले का, असा प्रश्न लोकांमधून उपस्थित केला गेला.

Archana Patil, Omraje Nimbalkar
Archana Patil News : ...म्हणून धाराशिवमध्ये अर्चना पाटलांना उमेदवारी, बाजी मारणार?

राजेनिंबाळकर यांनीही हीच लाइन धरून महायुतीच्या नेत्यांवर टीका सुरू केली. मतदारसंघातील पाच आमदार, तगडी यंत्रणा आणि दिग्गज नेत्यांची साथ ही महायुतीच्या अर्चना पाटील यांची जमेची बाजू ठरली. लोकांच्या संपर्कात राहणारा, त्यांच्यात मिसळणारा खासदार ही राजेनिंबाळकर यांची जमेची बाजू ठरली.

कोणत्या ठिकाणी कोणाची हवा आहे, याची अखंड चर्चा झाली. पण ती हवा नक्की कोणाची होती, हे येत्या चार जून रोजी कळणार आहे. महिनाभरापासून दमछाक झालेल्या, तहान-भूक विसरून आपापल्या उमेदवारांचे काम करणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेत्यांना आता आराम मिळणार आहे. असे असले तरी चार जूनच्या प्रतीक्षेत सर्वांची धडधड वाढलेलीलच असणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Archana Patil, Omraje Nimbalkar
Dharashiv Loksabha 2024 : धाराशिव जिंकायचंच ! उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला; ओमराजेंना सहा सभांचं बळ, पण...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com