Female Chief Minister : राज्यात महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा, ती पुढे सरकणार की पुन्हा खुंटणार?

Maharashtra Politics : महिलेला साधे सरपंचपद मिळाले तरी तिच्या कामात घरातील पुरुष नातेवाईकांची लुडबूड सुरू होते. अशा मानसिकतेमुळे महिला मुख्यमंत्री हव्यात, ही चर्चा 'लॉजिकल एन्ड'पर्यंत जाईल का, याबाबत शंकाच आहे.
Vidhansabha Election
Vidhansabha Election sarkarnama
Published on
Updated on

Chief Minister of Maharashtra : महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या आहे 47 टक्के आहे आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महिला आमदारांची संख्या आहे केवळ 24. महिला मतदारांची ही टक्केवारीही 2019 चीच आहे. आता ती संख्या नक्कीच वाढलेली असणार.

राज्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात 2019 मध्ये पहिल्यांदाच सर्वाधिक 24 महिला विजयी झाल्या होत्या. असे असले तरी महिला आमदारांची ही टक्केवारी केवळ 8.33 आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ती चर्चा पुढे जाणार की नेहमीप्रमाणे खुंटणार, असा प्रश्न आहे.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी वर्षभरापूर्वी महिला मुख्यमंत्र्याची चर्चा सुरू केली होती. राज्यात 2024 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्रिपदाचा मान महिलेला मिळू शकतो, असे संकेत त्यांनी दिले होते. आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे, असे विधान केले आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदासाठी महिलांचे चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाकडे रश्मी ठाकरे आहेत. काँग्रेसकडेही महिला चेहरे आहेत, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

Vidhansabha Election
Maharashtra Politics : राजकीय संस्कृतीच्या 'या' मारेकऱ्यांना सत्ता जाण्याचे भय सतावू लागलंय का?

राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाव्यात, याची चर्चा होते, मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही. महिला मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न निर्माण झाला की खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांची नावे चटकन डोळ्यांसमोर येतात. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे वक्तव्य काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी केले होते. त्यानंतंर त्यांना कोणकोणत्या दिव्यांतून जावे लागले, हे सर्वांना माहितच आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वतः कधीही मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्ट केलेले नाही.

महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य अशी आहे, मात्र अद्याप एकाही महिलेला मुख्यमंत्रिपद मिळालेले नाही. महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वार्थाने अविकसित असलेल्या अनेक राज्यांना महिला मुख्यमंत्री लाभलेल्या आहेत. सध्या देशात दोनच महिला मुख्यमंत्री आहेत, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल बाजूला झाल्यामुळे दिल्लीच्या मुंख्यमंत्रिपदाची संधी मिळालेल्या आतिशी मार्लेना. काँग्रेसच्या सुचेता कृपलानी या देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. त्या 1963 ते 1967 दरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या.

सुचेता कृपलानी यांच्यानंतर अनेक महिला मुख्यमंत्री बनल्या. नंदीनी सतपथी या 14 जून 1972 रोजी ओडिशाच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांना दोन टर्म मिळाल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या शशिकला काकोडकर 12 ऑगस्ट 1973 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्री बनल्या. काँग्रेसच्या सय्यदा अनवरा तैमूर या 6 डिसेंबर 1980 रोजी आसामच्या मुख्यमंत्री बनल्या. एआयएडीमएकेच्या व्ही. एन. जानकी रामचंद्रन या जानेवारी 1988 मध्ये 23 दिवस तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. याच पक्षाच्या जयललिता या तमिळनाडूच्या पाचवेळा मुख्यमंत्री बनल्या होत्या.

काँग्रेसच्या(Congress) शीला दीक्षित दिल्लीच्या, राष्ट्रीय जनता दलाच्या राबडीदेवी बिहारच्या, बहुजन समाज पक्षाच्या मायावती या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या होत्या. भाजपच्या वसुंधराराजे शिंदे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसच्या राजिंदरकौर भट्टल पंजाबच्या, भाजपच्या सुषमा स्वराज दिल्लीच्या, भाजपच्या उमा भारती मध्य प्रदेशच्या, भाजपच्या आनंदीबेन पटेल या गुजरातच्या तर पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांना जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी संधी मिळाली होती.

Vidhansabha Election
Congress High Command : सत्तास्वप्नांमुळे ‘हायकमांड’ मराठी मुलखात

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल काय, हे निश्चितपणे सांगण्यासारखी परिस्थिती नाही, कारण या पदासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतही अनेक पुरुष नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली दिसत आहे. या पदासाठी महिलांच्या नावाचा विचार तरी होत असेल का, अशी परिस्थिती आहे. मागे उद्धव ठाकरे आणि आता वर्षा गायकवाड यांनी हा विषय छेडला आहे. त्यावर फारशी साधकबाधक चर्चाही झालेली नाही. रश्मी ठाकरे यांच्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या, मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उर्वरित सर्वच आघाड्यांवर शांतताच आहे.

रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रश्मी ठाकरे यांनी कधीही राजकारणात रस दाखवलेलला नाही. त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात, याचा अर्थ असा नाही की त्यांना राजकारणात रस आहे किंवा मुख्यमंत्रिपदासाठी त्या इच्छुक आहेत. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाल्या पाहिजेत, मात्र त्यात रश्मी ठाकरे यांचा नाव विनाकारण येऊ नये, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

महिला मतदारांची संख्या महाराष्ट्रात 50 टक्क्यांच्या घरात आहे, मात्र महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे, अशी चर्चा सुरू झाली की ती पुढे सरकत नाही. राज्यात सध्या 288 पैकी फक्त 24 महिला आमदार आहेत. महिलांना 33 टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर ही संख्या 90 पेक्षा अधिक होऊ शकते. त्यावेळी तरी राज्याला महिला मुख्यमंत्री लाभणार का, याचीही शाश्वती देता येत नाही. महिला साधी सरपंच झाली तरी तिचा पती किंवा मुलगा कारभार पाहतो, अशी असंख्य उदाहरणे महाराष्ट्रात पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत महिलेला मुख्यमंत्री करण्याइतके मोठे मन राजकीय पक्षा दाखवतील का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com