
‘रिडल्स इन हिंदूइझम’चा वाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वादग्रस्त लेख ‘रिडल्स इन हिंदूइझम’ चौथ्या खंडात प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय आणि वैचारिक संघर्ष उभा राहिला.
शिवसेना विरुद्ध आंबेडकरी चळवळ: लेखावर आक्षेप घेत शिवसेनेने हिंदू देवतांची विटंबना झाल्याचा आरोप करत तीव्र आंदोलन छेडले, तर आंबेडकरी चळवळ आणि बुद्धिजीवी वर्गाने लेख हटवू नये म्हणून तीव्र मोर्चा काढला.
तोडगा आणि ऐतिहासिक युती: अखेरीस, प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासह समितीने चर्चेअंती लेख खंडातून न काढण्याचा आणि 'फूटनोट' टाकण्याचा तोडगा मान्य केला; ही लढाई आंबेडकरी आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा ठरली.
गेली सुमारे ६० वर्षे मी परिवर्तनवादी आणि आंबेडकरी चळवळीत आहे. या दरम्यान अनेक संघर्षात उभा राहिलो. त्यापैकी ज्यात माझा प्रामुख्याने पुढाकार होता अन् त्याला यश मिळाले तो म्हणजे ‘रिडल्स’चा लढा. अर्थात, लढ्याचे यश वैयक्तिक नसावे; ते चळवळीचे, संघटनेच्या सामर्थ्याचे असावे याचे मला भान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण लेखन प्रकाशित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार प्रकाशन समिती स्थापण्यात आली. बाबासाहेबांचे लेखन हे इंग्रजीत होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, चौथा खंड जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा महाराष्ट्रात वैचारिक वादळ उठले. या खंडात बाबासाहेबांचा ‘रिडल्स इन हिंदूइझम’ (हिंदू धर्माचे गूढ) या शीर्षकाचा लेख होता आणि या अनुषंगाने राम आणि कृष्ण या हिंदू देवतांची चिकित्सा केली होती. हे लेखन हे बाबासाहेब हयात असताना प्रसिद्ध झाले नव्हते.
त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शंकरराव चव्हाण होते. याच दरम्यान विलेपार्ले मतदारसंघात विधानसभेचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. काँग्रेसतर्फे शंकरराव चव्हाण यांचे समर्थक प्रभाकर कुंटे उभे होते. तर शिवसेनेकडून डॉ. रमेश प्रभू उमेदवार होते. अतिशय परखड अन् संशोधन, विश्लेषणाच्या पातळीवर हा लेख बेतला होता.
या लेखाविरुद्ध ‘लोकसत्ते’च्या ‘चौफेर’ या सदरात ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक माधव गडकरींचा लेख प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी बाबासाहेबांचा हा लेख या खंडात समाविष्ट केल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. शासनाने स्वखर्चाने प्रकाशित केलेल्या खंडात हिंदूधर्मीय देव-देवतांची बदनामी अन् विटंबना केली, असा आक्षेप घेतला.
शिवसेनेने याविरुद्ध मंत्रालयावर मोठा मोर्चा काढला अन् याच निमित्ताने पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमतः उघडपणे ‘हिंदुत्वा’ची घोषणा केली. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाने या खंडाची होळी, नागपूर अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढला.
अखेर तत्कालीन शिक्षणमंत्री राम मेघे यांनी हा लेख खंडातून वगळण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांचे ‘लोकसत्ता’चे संपादक माधव गडकरी यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले मैत्रीचे नाते आणि मराठा महासंघाची तत्कालीन भूमिका पाहिली तर हे राजकीय अनुबंध उलगडता येतात. बॅ. रजनी पटेल, ॲड. वसंतराव मेंगदे, जी. डी. तासकर, प्रभाकर कुंटे ही जवळपास डाव्या, समाजवादी विचारांची मंडळी इंदिरा गांधींच्या सोबत होती.
साहजिकच मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी त्यांचा सौहार्द होता. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील वैचारिक विश्वात झंझावात निर्माण झाला. महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी, डाव्या-समाजवादी आणि परिवर्तनवादी चळवळीत याविरुद्ध असंतोषाची लाट उसळली. या सर्वांचे तत्कालीन शिवसेनेशी नाते हे लक्षात घेता आणि राज्य शासनाच्या भूमिकेविरुद्ध दुहेरी असंतोष उफाळला.
आंबेडकरी, रिपब्लिकन जनतेमध्ये याविरुद्ध रोष अन् संघर्षाची भावना निर्माण होणे साहजिकच होते. त्या काळात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारतीय रिपब्लिकन पक्ष सक्रिय होता. मी त्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. मी बाळासाहेब आंबेडकरांना आपण पुढाकार घेतला पाहिजे हे सूचित केले. ते बाहेरगावी जात असल्याने त्यांच्या सूचनेनुसार मी सगळ्या गटा-तटांच्या नेत्यांची बैठक बोलावली. सगळ्यांचे दोन-दोन प्रतिनिधी घेऊन समिती तयार केली.
वास्तविक घनःशाम तळवटकर, रा. सु. गवई यांनी या समितीचे अध्यक्षपद स्वीकारायला हवे होते. पण सगळ्यांनी माझ्याच नावाचा आग्रह धरला. राजा ढाले यांनी या समितीचे नाव ‘फुले-आंबेडकर विचार संवर्धक समिती’ असावे ही सूचना मांडली. ती मंजूर झाली. या समितीतर्फे मंत्रालयावर मोठा मोर्चा नेण्यात आला. शासन आपल्या निर्णयाचा फेरविचार निश्चितच करेल असे आश्वासन आमच्या शिष्टमंडळाला दिले.
कारण आंबेडकरी जनतेच्या उठावाबरोबरच बुद्धिजीवी विचारवंत अभ्यासकांनी ही लढाई वैचारिक आणि संशोधनात्मक पातळीवर पुराव्यासहित लढविली. अनेक सभासदांनी या संदर्भातील शासकीय समितीच्या सभासदत्वाचे राजीनामे दिले. ही सगळी धग शासनापर्यंत पोहोचली होती. डॉ. भालचंद्र फडके, रूपा बोधी (कुलकर्णी), प्रा. अरुण कांबळे हे वैचारिक लढाईत अग्रेसर होते.
यानंतर शिवसेनेने पुन्हा मंत्रालयावर मोर्चा काढला,बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रश्नावर ‘आम्ही हिंदू देव-देवतांचा अपमान सहन करणार नाही. हे ‘प्रकरण’ वगळले नाही तर आम्ही महाराष्ट्र पेटवू’ ही घोषणा केली. आंबेडकरी जनतेला हे एक प्रकारचे आव्हान होते. मी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयात समितीची बैठक बोलावली अन् पुन्हा मोर्चाचे नियोजन केले. हा मोर्चा इतका विराट आणि भव्य होता.
मुंबईने-महाराष्ट्राने असा मोर्चा कधीच बघितला नव्हता, तसेच या प्रश्नावर रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेची एकजूट कधीच बघितली नव्हती. या मोर्चात बाळासाहेब आंबेडकरांनी शिवसेनाप्रमुखांना दिलेले उत्तर खूपच गाजले. ते म्हणाले होते, ‘‘महाराष्ट्र काय पेटवता, गिरण्या बंद पाडता, त्या गिरणी कामगारांची चूल पेटवा.’’ मी तरी माझ्या आयुष्यात असा मोर्चा बघितला नव्हता.शिवसेनेला हा मोर्चा सहन झाला नाही.
मुंबईचे शिवसेनेचे तत्कालीन महापौर छगन भुजबळ यांनी मोर्चेकऱ्यांनी हुतात्मा स्मारकाची नासधूस केल्याची आवई उठवली. मोर्चाला गालबोट लावून जनतेच्या मनात संभ्रम आणि दूषित भावना पसरविण्याचा हा बनाव आहे हे आमच्या लक्षात आले. हे थोपविण्यासाठी अतिशय तंग वातावरणात आम्ही सगळे हुतात्मा स्मारकाला जाऊन पुष्पचक्र अर्पण केले.
दरम्यान, पोटनिवडणुकीचा निकाल लागला होता. शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. अरुण साधूचा फोन आला, की ‘मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे. वाद मिटायला हवा.’ रविवारी दुपारी एका दैनिकाच्या ऑफिसमध्ये मी, प्रकाश आंबेडकर, अरुण साधू आणि कुमार केतकर बसलो. सुहास जाधव नावाचा प्रमुख कार्यकर्ता आमच्यासोबत होता.
त्याच रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते व समितीच्या नेत्यांची बैठक झाली. समितीच्या वतीने प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई, मी, नामदेव ढसाळ, अविनाश महात्तेकर, अरुण कांबळे, तर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, छगन भुजबळ, प्रमोद नवलकर हे हजर होते. आणि तिथे मध्यरात्री तोडगा मान्य झाला तो असा ः हे प्रकरण चौथ्या खंडातून वगळू नये. त्या लेखाखाली ‘फूटनोट’ टाकायची ती अशी ‘या लेखातील मजकुराशी महाराष्ट्र शासन सहमत असेलच असे नाही.’ आंबेडकरी चळवळीतील एक ऐतिहासिक लढ्याचा मी एक प्रमुख कारभारी होतो याचा मला अभिमान आहे.
‘रिडल्स इन हिंदूइझम’ लेखावर वाद का झाला?
बाबासाहेबांनी राम आणि कृष्णासारख्या देवतांवर केलेल्या चिकित्सेमुळे वाद निर्माण झाला.
या वादात शिवसेनेची भूमिका काय होती?
शिवसेनेने लेख हटवण्याची मागणी करत हिंदूधर्माच्या अपमानाचा आरोप केला.
आंबेडकरी चळवळीची भूमिका काय होती?
त्यांनी लेख कायम ठेवावा म्हणून मोठा जनआंदोलने व वैचारिक लढा उभारला.
शेवटी हा वाद कसा मिटवण्यात आला?
लेख कायम ठेवून ‘या मजकुराशी शासन सहमत नसेल’ असा फूटनोट टाकण्याचा तोडगा काढण्यात आला.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.