Shivsena : एकनाथ शिंदेंचा संयम संपला..! तोंड दाबून बुक्क्यांचा मार किती काळ सहन करणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देत नसल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ मंत्रालयावर वॉच ठेवायला सांगितला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

महायुतीत अजित पवारांची एन्ट्री झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रया गेली, त्यांची फरपट सुरू झाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही अजितदादा पवार यांना आणि त्यांच्या शिलेदारांना महत्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळाले. त्यातून मग भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्षही पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नसती तर भाजप सत्तेत आला नसता, भाजपची साथ नसती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, असे दावे-प्रतिदावे दोन्ही पक्षांकडून झाले. शिंदे यांच्या संयमाची जणू परीक्षाच सुरू आहे, मात्र आता त्यांचा संयम सुटत आहे.

शिंदे आणि अजितदादा यांच्यातील हा सुप्त संघर्ष महाविकास आघाडीत सरकारच्या काळातच सुरू झाला होता. त्या सरकारमध्येही अजितदादा अर्थमंत्री होते. शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही, राष्ट्रवादीच्या आमदारांनाच झुकते माप दिले जाते, असा आरोप त्यावेळीही अजितदादांवर करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यासाठी अजितदादांकडून निधी मिळत नाही, हे एक मुख्य कारण होते. ते खरे मानले तर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार कशाप्रकारे सहन करावा लागत आहे, याची प्रचीती येऊ शकते.

निधी मिळत नाही, या प्रकरणाचा पुढचा प्रयोग आता सुरू झाला आहे. अजितदादांच्या निधीवाटपावर लक्ष ठेवा, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली. त्यानंतर शिंदेंनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. तीत सर्व मंत्र्यांनी अजितदादांविषयी तक्रारींचा पाढा वाचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थ खात्याकडून निधीचे वाटप कसे केले जाते, यावर लक्ष ठेवा, असे शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे. त्यानंतर शिंदेंनी अजितदादांची भेट घेऊन चर्चा केली. शिंदे यांचा संयम संपला आहे, का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वीच अजितदादांनी शिंदेंच्या मंत्र्यांना फटकारले होते. निधी वाटपाची एक पद्धत, प्रक्रिया आहे. त्यानुसार निर्णय होत असतात. मी काही निधी खिशात घेऊन फिरत नाही, असे अजितदादा म्हणाले होते. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता. या निर्णयावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करताच त्यांची कोंडी करण्यात आली. त्यांच्या मुलावर महिलेने आरोप केल्याचे प्रकरण बाहेर आले. हॉटेल खरेदी प्रक्रियेत शिरसाट यांच्या मुला सवलत दिल्याचाही आरोप झाला. अखेर त्यांच्या मुलाचा अर्ज बाद झाला.

Eknath Shinde
Ajit Pawar: अजितदादांनी किरीट सोमय्यांना कडक शब्दांत दिली समज; म्हणाले,'मशिदीत जाऊ नये,अन्यथा...

एमआयडीसीत मंत्री संजय शिरसाट कुटुंबीयांनी नियम डावलून जमीन खरेदी केल्याचा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. अशा पद्धतीने संजय शिरसाट यांच्याशी संबंधित एकापाठोपाठ प्रकरणे बाहेर काढण्यात आली. याचा अर्थ असा की एकनाथ शिंदे यांची महायुतीतील दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून कोंडी करत आहेत. शिंदेंचे परतीचे दोर कापले गेलेले आहेत. अजितदादांचे तसे नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, अशी चर्चा मध्यंतरी झाली. पक्षात फूट पडली असली तरी आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत, असा संदेश पवार कुटुंबीयांकडून वारंवार देण्यात आला आहे.

रायगडचा पालकमंत्री कोण, हा तिढा आद्याप सोडवण्यात आलेला नाही. रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत. असे असतानाही शिवसेनेला पालकमंत्रिपद मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसलाही रायगडचे पालकमंत्रिपद हवे आहे. शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत. डीपीडीसीतून होणाऱ्या विकासकामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. सरनाईक यांनी या जिल्ह्यात विरोधकांशी जवळीक साधली, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे ही कामे स्थगित करण्यात आली. जिथे तिथे शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.

Eknath Shinde
Ajit Pawar: नव्यांना मानाचे पान, निष्ठावंतांकडे दुर्लक्ष? राष्ट्रवादीचे माजी आमदार नाराज

शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावला आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची तर अशा पद्धतीने कोंडी झाली की त्यामुळे शिवसेना गोत्यात आली आहे. विधान मंडळ अंदाज समितीच्या पाहणी दौऱ्यासाठी खोतकर हे धुळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वीय सहायकाच्या विश्रामगृहातील कक्षातून जवळपास दोन कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्यामुळे खोतकर अडचणीत सापडले. संदेश गेला ते शिवसेनेचे नेते भ्रष्टाचार करतात असा.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भाजप - शिंदेच्या शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. अजितदादा या सरकारमध्ये नसल्यामुळे शिंदेंचा पक्ष आनंदी होता. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. या सरकारमध्येही अजितदादांची एन्ट्री झाली आणि शिवसेनेचे हाल सुरू झाले ते अद्यापही कायम आहेत. आता शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. फडणवीस आणि अजितदादा यांची जवळीक वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदेंना भलेही अधिक जागा मिळाल्या असतील, मात्र अजितदादांची प्रतिमा त्यांच्यापेक्षा सरस ठरते का, असाही प्रश्न आहे.

हा प्रश्न यामुळे आहे की, काकांपासून म्हणजे शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊनही अजितदादांनी संयम, भाषेची मर्यादा सोडलेली नाही. ते शक्यतो शरद पवार यांच्यावर टीका करत नाहीत, केली तरी ती संयमित असते. शिवसेनेत मात्र एकदम उलट चित्र आहे. टीका करताना कशी भाषा वापरायची, याची मर्यादा दोन्ही बाजूंनी सोडलेली आहे. महायुतीतील मराठा नेता कोण, याचे उत्तर होते, एकनाथ शिंदे. मात्र अजितदादा महायुतीत आल्यापासून या उत्तराला पर्याय उपलब्ध झाला आहे. शिंदे यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडण्यात आलेली नाही, हे वास्तव आहे.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे, असा प्रवास शिवसेनेचा सुरू आहे. भाजप आणि अविभाजित शिवसेना युतीचे सरकार असताना एका जाहीर कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी, आता मी भाजपसोबत काम करू शकत नाही, माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, असे साकडे उद्धव ठाकरेंना घातले होते. आता तीही सोय राहिलेली नाही. उद्योगमंत्री उदय सामंत 20 आमदारांसह भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा घडवण्यात आली किंवा अफवा पसरवण्यात आली. समजा शिंदेंनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाच तर किती आमदार त्यांच्यासोबत जातील, हा कळीचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंचा संयम सुटला की काय, असे वाटत आहे. त्यातूनच त्यांनी अजितदादांच्या खात्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश आपल्या मंत्र्यांना दिले असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com