Eknath Shinde BJP Tension : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत जात मुख्यमंत्रिपद मिळवले. उद्धव ठाकरेंकडे असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना मिळाले. ज्या भाजपच्या मदतीने शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडली त्याच शिंदेंचे अस्तित्व भाजपमुळेच धोक्यात आले आहेत.
भाजपने स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या तोंडवार शिंदेंच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू केली. ठाणे जिल्हा हा शिंदेंचा बालेकिल्ला तेथेच भाजप शिंदेंना घेरत आहे. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महापालिकेत भाजप स्वबळाची तयारी करत आहेत. मित्रपक्षच आपली माणसं फोडत असल्याने शिंदेंनी नवी दिल्लीत धाव घेत अमित शाहांकडे तक्रार देखील केली मात्र त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही.
अमित शाहांनी देखील आपले लक्ष आहे, असे म्हणत शिंदेंच्या तक्रारीला महत्त्व दिले नाही. त्यांनी आपण भाजप नेत्यांच्या पाठीशी असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा पुढचा मार्ग खडतर झाला आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपने त्यांना अडचणीत आणले आहे.
एकनाथ शिंदे हे फायटर नेते म्हणून ओळखले जातात. भाजप हळूहळू आपल्या पक्षाला घेरतोय. हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यांच्या दिल्लीवारीचा काही परिणाम झालेला नाही. त्यामुळे पटण्यामधून ते गाडीनेच महाराष्ट्रात परतले. त्यामुळे ते नाराज असल्याचा त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये झालेल्या सभेत त्यांनी आपण अहंकाराच्या विरोधात एकत्र आलो आहे, असे म्हणत नाव न घेता भाजपवर टीका केली आहे.
मित्रपक्षाचीच माणसं फोडायची, जिथे मित्रपक्षाचे आमदार आहेत तेथे विरोधात असलेल्या सक्षम लोकांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. त्यामुळे मित्रपक्षांचा टेकू फार काळ भाजपला लागणार नाही, असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामुळे ठाकरेंशी पंगा घेत भाजपशी हात मिळवून करत शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना धोक्याची कल्पना आली आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. मोठ्या महापालिका जिंकल्या तर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेची गरज पडणार नाही. शिंदेंसोबत असलेले नेते, आमदार देखील अस्वस्थ होतील. त्यामुळे वेळ पडली तर ते भाजपमध्ये जाण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि त्यातूनच शिंदेंच्या शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
भाजपने ऑपरेशन लोटस राबवत शिवसेनेत फूट पाडली. एकनाथ शिंदेंना त्यांनी त्यासाठी पुढे केले. आता ऑपरेश लोटसचा दुसरा अंक राबवत एकनाथ शिंदेसोबत असलेले लोकं भाजप फोडत असल्याचादावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आला आहे. शिंदेसोबत असलेले 35 आमदार हे कधीही भाजपमध्ये जातील, असा दावा देखील करण्यात आला आहे. मात्र, 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ते शक्य नाही. मात्र, जर शिंदेंना स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीत यश मिळाले नाही तर त्यांचे शिलेदार हळूहळू भाजपची वाट धरतील हे नक्की.
शिवसेनेतून फूट पाडून उद्धव ठाकरेंशी पंगा घेत एकनाथ शिंदे यांनी ते फायटर असल्याचे दाखवून दिले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात लोकांचा काम करणारा नेता ही त्यांची प्रतिमा अजून उजळून निघाली. मात्र, आता त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद नाही. भाजप स्वबळावर बहुमताच्या जवळ आहे. शिंदे जरी लांब झाले तरी अजितदादा भाजपच्या मदतीसाठी आहेतच. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आपली ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दाखवून द्यावी लागणार आहे.
विशेष करून शिंदेंच्या मदतीशिवाय भाजपने मुंबई महापालिका जिंकली तर शिंदेंचे महायुतीमधील महत्त्व एकदम कमी होईल. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विजय मिळवणे आणि ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली या महापालिकांमधील आपली ताकद दाखवून विजय मिळवणे हेच उत्तर भाजपला उत्तर असणार आहे हे निश्चित. नाहीतर भविष्यात शिंदेंनाच भाजपमध्ये जाण्याची वेळ येईल.
भाजपने 2029 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी आत्तापासूनच केली आहे. त्यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ही त्यांच्यासाठी लिटमस्ट टेस्ट आहे. नगरपंचायत निवडणूकीत 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आणून भाजपने विरोधकांसह मित्रपक्षातील एकनाथ शिंदेंना सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.