
महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूंकप झाला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर ठाकरेंना कधीच अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीतही दोन आकडी खासदार निवडून आणता आले नाहीत. तर विधानसभेत 20 चा आकडा गाठताना नाकीनऊ आले. दुसरीकडे राजकीय उठाव करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी विधानसभेत 57 जागा मिळवत आपली ताकद दाखवून दिली. या ऐतिहासिक विजयानंतर गुरूवारी मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या पहिल्याच मेळाव्यात त्यांचा कॉन्फिडन्स खूप काही सांगून गेला.
एकनाथ शिंदे यांनी शेरोशायरी करत भाषण ठोकले. पण शेवट करताना त्यांनी ‘जिंदगी जिओ इस कदर के मिसाल बन जाये’, असे म्हणत उद्धव ठाकरेंना द्यायचा तो संदेश दिला. त्याआधी अडीच वर्षांपूर्वी केलेला उठाव आणि त्यानंतर मिळालेल्या विजयाची जगभरात चर्चा आहे. या विजयाची आठवण पुढील अनेक पिढ्यांना राहील, हे सांगायला शिंदे विसरले नाहीत.
भाषण करताना शिंदे यांचा आत्मविश्वास दुणावला असल्याचे स्पष्ट दिसून आले. हे त्यांनी मान्य केले. अडीच वर्षे केलेल्या कष्टाचे मेहनतीचे हे यश आहे. जीवाला जीव देणारे सहकारी आणि शिवसैनिकांमुळे हा ऐतिहासिक विजय असल्याने आता जबाबदारी वाढल्याचे सांगत राजकीय परिस्थितीचे भान असल्याचेही दाखवून दिले.
बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही प्रतारणा होणार नाही, असा शब्द शिंदेंनी यावेळी दिला. मी साधा कार्यकर्ता आहे. आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. खुर्चीसाठी कधीही कासावीस होणार नाही. तत्वांसाठी खुर्चीला लाथ मारून बाहेर पडणारे आपण आहोत. राजकारण हा माझ्यासाठी समाजकारणाचा मार्ग आहे, असा सांगताना शिंदेंनी तुम्ही आमदार, खासदार, मंत्री व्हाल, पण तुम्ही सर्वात आधी बाळासाहेबांचे सैनिक आहात, हे विसरू नका, असा संदेशही नेत्यांना दिला.
शिंदेंचे गॉडफादर दिल्लीत बसलेत, अशी वारंवार टीका ठाकरेंच्या नेत्यांकडून केली जाते. पण आपल्याला आता कुणीही गॉडफादर नाही, बाळासाहेबांचे विचार, दिघेसाहेबांची शिकवण आणि शिवसेना हा चार अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत, असेही शिंदेंनी गुरूवारी सांगितले. हे तीन गॉडफादर ठाकरेंना घायाळ करणार की नाही, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा समोर येईलच.
उद्धव ठाकरेंनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून शिंदेंवर आसुड ओढले होते. त्याचा समाचार घेत शिंदे म्हणाले, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले, त्यांनीच स्मारकात जाण्यापूर्वी नाक घासून माफी मागायला हवी होती, असा हल्ला चढवला. पण ठाकरेंवर फार बोलणे, शिंदेंनी जाणीवपूर्वक टाळले. विजयोत्सवामध्ये त्यांनी शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला. शिवसेना वाढीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत आता थांबायचे नाही, हे सांगितले. त्याचवेळी आपणही खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत असल्याचा विश्वासही दिला.
गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक हे मिशन हाती घेण्याचे आवाहन शिंदेंनी केले. आता केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातील शिवैसनिक तिथेही शिवसेनेची मागणी करत असल्याचे सांगितले. शक्तीशाली शिवसेना उभी करण्याचे टार्गेट त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवले. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुमच्यासोबत असल्याचे सांगून शिंदेंनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.