
Uddhav Thackeray News : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वतंत्र सभा घेत साजरी करण्यात आली. या आधी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त सभागृहामध्ये कार्यक्रम घेतला जात होता. मात्र, पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या जयंती निमित्त दोन्ही शिवसेनेकडून जाहीर सभा घेण्यात आल्या.
विधानसभेत दारुण पराभव झाल्यानंतर पहिल्याच जाहीर सभेतून उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत अमित शाह यांच्यावर हल्लाबोल करत महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
उद्धव ठाकरेंनी सभेतून आव्हान करत कार्यकर्त्यांनी ताकद दाखवली तर त्यांच्या मनातील निर्णय घेऊ, असे म्हणत महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. त्यामुळे ठाकरेंचा पक्ष महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार नसल्याची चर्चा आहे.
आपल्या सभेच्या एक दिवस आधीच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र असून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका एकत्रित लढतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या भेटीनंतर जाहीर सभेतून ताकद दाखण्याचे आव्हान ठाकरेंनी शिवसैनिकांना केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी देखील ठाकरे जेव्हा भेटले होते तेव्हा त्यांनी टोकाची भाषा केली नसल्याचे म्हटले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मुंबई महापालिका स्वबळावर लढणार असून मुंबई वगळता इतर महापालिका, जिल्हा परिषदमध्ये महाविकास आघाडीसोबत असेल तेथील निवडणुका आघाडीसोबत लढेल, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे ठाकरेंचा स्वबळाचा निर्णय हा फक्त मुंबई महापालिकेसाठीच असल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंची स्वबळाची तयारी पाहता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना जसे लढायचे आहे तसे लढू द्या, काँग्रेस आपल्या पद्धतीने लढेल, असे म्हणत स्वबळावर लढण्यास काँग्रेस देखील सज्ज असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.