
Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी बराचसा वेळ लागला होता. गृहखाते मिळाले नाही तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी समजूत काढल्यानंतर शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले होते.
त्यानंतरच्या काळातही खातेवाटप, पालकमंत्रीपद, बंगले वाटप व निधी वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरूच असतात. दुसरीकडे राज्यात तीन पक्षाचे मिळून महायुतीचे सरकार आल्यानंतर सत्ता वाटपाचा संघर्ष सुरूच आहे. त्यातच आता राज्य सरकारला जवळपास 100 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आता समान अधिकार देत एकनाथ शिंदेंना बळ दिले आहे.
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यानंतर महायुती सरकारमध्ये क्रमांक 1 आणि क्रमांक दोनचा उपमुख्यमंत्री कोण याचीही राजकीय वर्तुळात रंगली होती. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचेही म्हटले जात होते. राज्यातील महायुती सरकारमध्ये नंबर 1 चा उपमुख्यमंत्री कोण? याचं कोड आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये सुप्त सत्ता संघर्ष असल्याचे म्हटले जात होते. महायुतीच्या नेत्यांनी याचा इन्कार केला असला तरी एकमेकावर कुरघोडी करण्याची संधी भाजप, शिंदेंची शिवसेना (Shivsena), अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनहे पक्ष सोडत नव्हते. त्यामुळे नेहमीच नाराजीवरून चर्चा सुरूच राहत होत्या.
त्यातच आता राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व विभागांना आदेश दिले आहेत की, फायली थेट मुख्यमंत्र्यांकडे न जाता आधी त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जातील. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून फायली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत.
या निर्णयामुळे उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकाराची समान वाटणी केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना ताकद देण्यात आली असल्याची चर्चा जोरात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील धोरणात्मक निर्णयांच्या फायली आधी तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होत्या. त्यानंतर त्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेकडे जात होत्या. त्यामुळे प्रत्येक निर्णयात फडणवीसांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत होती. तसेच काहीसे आत्ता एकनाथ शिंदेंच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. त्यामुळे ते नवीन सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः शिंदे यांनी सरकारमध्ये कोणी नाराज नसल्याचे म्हटले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता शिंदेंना पुन्हा अधिकार दिले आहेत. त्यामुळे या मधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्याने सर्वच फायली त्यांच्याकडे जात होत्या. मात्र, शिंदे यांच्याकडे सर्वच फायली जात नसल्याने त्यांच्याकडे फारसे अधिकार नसल्याची चर्चा रंगली होती. त्याचमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता अजित पवार यांच्याकडून येणाऱ्या फायली या एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील तर शिंदे यांच्याकडुन त्या फायली मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत. त्यामुळे एक अर्थाने या निमित्ताने आता शिंदेना ताकद देण्याचे काम फडणवीस यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.