
Mumbai News : शिवसेना कोणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? यावर तातडीने सुनावणी घ्यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर येत्या 20 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले होते. त्यामुळे ठाकरेंच्या गोटात उत्साह पसरला होता, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात काहीशी अस्वस्था दिसून आली. मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई यांच्यासह शिंदे यांचाही दिल्ली दौरा झाला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. पण आता या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी येणार की नंतर येणार याबाबतची संदिग्धता कायम आहे. हा एक प्रकारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी धक्काच मानला जातो. दरम्यान, सुनावणी पुढे ढकलल्यानंतर काही कायदेतज्ज्ञ व राजकीय विश्लेषकांनी याविषयी मते व्यक्त केली आहेत.
यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले मूळ ‘शिवसेना’ (Shivsena) आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ कुणाचे याबाबतची सुनावणी 23 ऑगस्टनंतरच घेणार असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षचिन्हाबाबत तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु 19 ऑगस्टपासून घटनापीठासमोर राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबतचे प्रकरण सुनावणीसाठी घेणार आहेत. पक्षचिन्ह याचिकेत सखोल विचार करायचा असल्याने तातडीची सुनावणी घेण्यात येऊ शकत नाही, असे कोर्टाचे म्हणणे दिसते.
यामुळे संवैधानिक फसवणूक केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे राजकीय मरण काही दिवस पुढे ढकलले गेले इतकेच, असे सरोदे यांनी याबाबत ट्विट करून म्हटले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या प्रकरणाचा लवकर निकाल अपेक्षित असल्याचे सांगितले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी याचा निकाल लागला नाही तर उद्धव ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसू शकतो असे मत एका राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
सुप्रीम कोर्टाकडून सतत होत असलेला विलंब उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आत्मविश्वासावर परिणाम करत आहेत. ‘शिवसेना’ हे नाव आणि चिन्ह फक्त न्यायालयीन वाद नसून, ते महाराष्ट्राच्या जनतेशी भावनिकरित्या जोडलेलं आहे. या गोष्टीवर वेळेत निर्णय न घेतल्यामुळे मतदार गट गोंधळलेला आहे, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ राजकीय विश्लेषकाने व्यक्त केली.
याशिवाय राजकीय पक्षांच्या अंतर्गत लढाया न्यायालयात गेल्यानंतर निकालांची अनिश्चितता ही लोकशाही प्रक्रियेलाही त्रासदायक ठरते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ न मिळणे म्हणजे प्रचार आणि प्रतिमेवरही प्रचंड दबाव येत आहे. निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि यावेळी चिन्ह न मिळाल्यास कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरू शकते, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील राजकीय विश्लेषकाने व्यक्त केली. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.