Eknath Shinde in Kashmir : काश्मीर दौऱ्यातून एकनाथ शिंदेंचे 'पाच' पैगाम... फडणवीस अन् भाजपला पचतील का?

Eknath Shinde in Kashmir : काश्मीरमधील पहलगामजवळ दहशतवाद्यांनी क्रूरपणे पर्यटकांचे हत्याकांड घडविल्यानंतर एकनाथ शिंदे 23 एप्रिलला रात्री अचानक श्रीनगरला रवाना झाले. त्यांनी तेथे जाऊन महाराष्ट्रातल्या पर्यटकांची विचारपूस केली.
Eknath Shinde in Kashmir
Eknath Shinde in Kashmir Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde in Kashmir : एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राकडे उपमुख्यमंत्रिपद आहे. त्यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) अशी तीन खाती आहेत. काश्मीरमधील पहलगामजवळ दहशतवाद्यांनी क्रूरपणे पर्यटकांचे हत्याकांड घडविल्यानंतर शिंदे 23 एप्रिलला रात्री अचानक श्रीनगरला रवाना झाले. त्यांनी तेथे जाऊन महाराष्ट्रातल्या पर्यटकांची विचारपूस केली. त्यांची खूपसारी छायाचित्रे, व्हिडिओ, पत्रकारांशी सर्वत्र संवाद समाज माध्यमांवर व्यवस्थितपणे प्रसारित करण्यात आला. श्रीनगरमध्ये शिंदे म्हणाले, इथे आल्यामुळे यंत्रणा आणखी गतिमान होईल आणि पर्यटकांना लवकर सुरक्षितपणे घरी पाठवता येईल, हीच भावना मनामध्ये आहे. मी इथे आल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांचा आत्मविश्वास वाढला. शेवटी आपला माणूस दिसल्यानंतर प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढतोच. त्याला नैतिक पाठिंबा मिळतो.

दोन प्रबळ मंत्री श्रीनगरात :

महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे काल दुपारी तिथे पोहोचले. त्यानंतर काही तासांनी शिंदे तेथे पोहोचले. संकटात सापडलेल्या नागरिकांची सुटका करणे महाजन यांच्या खात्याचे काम आहे. शिंदे आणि महाजन असे दोन प्रबळ मंत्री महाराष्ट्राच्या पर्यटकांची काळजी घेण्यासाठी श्रीनगरला पोहोचतात, ही समाधानाची बाब आहे. गेल्या अडीच दशकांतील सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला असल्याने पर्यटकांमध्ये घबराट पसरण्याची स्वाभाविक शक्यता होती. दोन मंत्री, त्यांचा ताफा श्रीनगरात पोहोचल्याने ही घबराट काही अंशी कमी करण्यात निश्चितपणे यश येणार आहे. काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये गुजरात आणि महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या मोठी असते. तथापि, गुजरातमधील कोणी मंत्री गुजराती पर्यटकांच्या सुरक्षेच्या काळजीने श्रीनगरमध्ये गेल्याचे किमान अजून तरी दिसलेले नाही.

Eknath Shinde in Kashmir
Eknath Shinde in Kashmir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्मीरमध्ये, पर्यटकांच्या मदतीसाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ

शिवसैनिकाची प्रतिमा :

आपत्ती व्यवस्थापन खात्याचा कारभार नसतानाही शिंदे यांनी तडकाफडकी श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांची प्रतिमा 'संवेदनशील मुख्यमंत्री' अशी बनविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी सर्व फंडे वापरले. उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागल्यानंतर त्यांनी स्वतःला 'dedicated to common man' म्हणजे डीसीएम म्हणजे उपमुख्यमंत्री असे संबोधण्यास सुरुवात केली. श्रीनगर भेटीतून त्यांनी त्यांची प्रतिमा आणखी बळकट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे समोर येते. या तातडीच्या दौऱ्यातून त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या, हे स्पष्ट आहे. एकतर अडकलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील नागरिकांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक विचारात घेता मुंबईकरांसाठी अहोरात्र काम करणारा तो शिवसैनिक ही प्रतिमा आणखी दृढ करण्यात शिंदे यांना या दौऱ्याचा निश्चितपणे उपयोग दिसतो. दुसरे, त्यांची संवेदनशीलता ते वारंवार आणि वेळोवेळी प्रकट करतच असतात. ही संवेदनशीलता प्रकट करण्याची आणखी एक पायरी त्यांनी श्रीनगरमध्ये गाठल्याचे दिसते.

तडे बुजवणारी कृती :

तिसरी गोष्ट, जी राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे आणि ज्याचे संभाव्य परिणाम असू शकतात ती म्हणजे शिंदे उपमुख्यमंत्री असले, तरी अशा प्रसंगात त्यांचे निर्णय तेच घेतात, हे ठळकपणे मांडले गेले. श्रीनगरमध्ये शिंदे यांची देहबोली, भाषा यातून हे निर्णयस्वातंत्र्य कळत-नकळतपणे दाखवले गेले. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्यापासून सर्व मंत्र्यांची नाकाबंदी झाल्याची कुजबूज मंत्रालयात असते. ही कुजबूज विभागीय पातळीवर पाझरते आणि राज्यभर पसरते. सर्व निर्णय फडणवीस घेतात, असे या कुजबुजीचे स्वरूप. त्यातील तत्थ्य-असत्य पडताळणे अशक्य. तथापि, ही कुजबूज शिवसैनिकांच्या कानावरही पडते आणि विरोधकांच्याही. त्यातून शिंदे यांच्या 'संवेदनशील', 'निर्णयक्षम' प्रतिमेला सुक्ष्म का होईना, तडे जातात. हे तडे बुजवण्याच्या दृष्टीने श्रीनगर दौरा महत्त्वाचा आहे.

Eknath Shinde in Kashmir
Eknath Shinde In Kashmir : उपमुख्यमंत्री नाही मराठी माणूस...! एकनाथ शिंदे ग्राऊंड झिरोवर! कश्मीरमध्ये पर्यटकांची भेट

शहा-शिंदे समीकरण :

चौथा मुद्दा म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर शिंदे पोहोचणे. शहा-शिंदे संबंध शिंदेंच्या पूर्ण कार्यकाळात उत्तम राहिले. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या दणदणीत यशानंतर स्वाभाविकपणे शिंदे यांचे महत्त्व मर्यादित झाले. अशा परिस्थितीत शिंदे तातडीने प्रवास करतात आणि थेट संकटातील नागरिकांच्या मदतीसाठी धावून जातात, हा संदेश शहांपर्यंतही पोहोचतो. दोघांमधील कथित वाढत्या दुराव्यावर हा प्रवास इलाज ठरणारा आहे. शिंदे आणि त्यांचे काश्मीरप्रेम गेल्या दोन वर्षांत वारंवार दिसले आहे. जून 2023 मध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची काश्मीरमध्ये भेट घेऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भवनासाठी जागा मागितली. त्यानंतर मार्च 2024 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने भवन बांधण्याचा ठराव केला. त्यापाठोपाठ अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तशी घोषणा केली. लगेचच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात अमरावतीत, एप्रिल 2024 मध्ये शहांच्या उपस्थितीतच शिंदे यांनी महाराष्ट्र भवनाची घोषणा पुन्हा एकदा करताना जागा वगैरे अन्य तपशीलही सादर केला.

भाजप-शिवसेना रस्सीखेच?

आधी महाजन आणि नंतर शिंदे यांच्या श्रीनगर भेटींमुळे राज्य सरकारमध्ये भाजप-शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे का, हा पाचवा मुद्दा उपस्थित झाला. राज्य सरकार भले या प्रश्नाला झटकून टाकेल आणि 'जी कृती आवश्यक होती, ती केली,' असे स्पष्टीकरणही दिले जाईल. तथापि, शिंदे यांचा दौरा राज्य सरकारच्या नियोजनाचा भाग असण्याची शक्यता धूसर आहे. हा दौरा नियोजित असेल, तर मग महाजनांची स्वतंत्रपणाने जाण्याची काय आवश्यकता होती, हा प्रश्न शिल्लक उरतोच. शंभर दिवसांच्या कामकाजाचा अहवाल, भविष्यकालीन नियोजन, खासगी सचिव-विशेष अधिकारी नियुक्तीचे अधिकार अशा अनेक बाबींवरून देवेंद्र फडणवीस यांनी कडक मास्तरांची भूमिका घेतल्याचे मंत्रालयात सांगतात. अनेकांची कोंडी यानिमित्ताने झाल्याचेही सांगण्यात येते. राज्य सरकार महायुतीचे आणि तिघांच्या नेतृत्वाखाली असले, तरी फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असल्याचे निर्णयांतून ठकणावून सांगितले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार या साऱ्या माहौलापासून शक्य तितके दूर राहून 'विकास' मंत्राचा जप करत असतात. मात्र, तो शिंदे यांचा स्वभाव नाही. शिंदे जमेल तिथे स्वतःची जागा तयार करण्याच्या प्रयत्नात असतात आणि ते स्वाभाविकही आहे. हा प्रयत्न भाजप-शिवसेनेतील ताणाचे प्रमुख कारण ठरतो. घाईघाईने आखलेल्या श्रीनगर दौऱ्यातूनही शिंदे यांनी त्यांची स्वतंत्र जागा धडधडीतपणे दाखवून दिली आहे. भाजप आणि मुख्य म्हणजे फडणवीस या जागेची किती पाठराखण करतात, यावर भविष्यातील राजकारणाचे वारे वाहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com