
Eknath Shinde Masterplan : पहलगाम हल्ल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. भारत पाकिस्तानवर काय कारवाई करणार याकडे देशाच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, महाराष्ट्रातील पर्यटक कश्मीरमध्ये अडकले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मदतीसाठी कश्मीरमध्ये दाखल झाले.
शिंदे हे सरकारकडून नाही तर स्वतंत्रपणे कश्मीरमध्ये गेले होते. त्यामुळे मदतीला धावून जाणारा उपमुख्यमंत्री ही त्यांची प्रतिमा उजाळून निघाली. सरकारी आघाडीवर कामांचा धडका शिंदे यांनी लावला असताना महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी चक्रव्यूह रचला आहे.
राज्यात सर्वाधिक पाठींबा उद्धव ठाकरेंना कुठे मिळाला असेल तर तो मुंबईमध्ये. शिवसेनेतील फूटीनंतर मुंबईतील शिवसैनिक ठाकरेंसोबत कायम राहिला. उद्धव ठाकरेंची खरी ताकद आजही मुंबईमध्येच आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरेंना पराभूत करण्यासाठी शिंदेंनी ठाकरेंचे मुंबईतील शिलेदार फोडण्यास सुरुवात केली आहे. शिलेदार फोडून संघटनात्मक ताकदीवरच वार करण्याचा प्लॅन शिंदेंचा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीला आणखी आठ महिन्यांचा कालावधी असताना त्यांनी ठाकरेंच्या पक्षातून आपल्या पक्षात इन्कमिंग वाढवले आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेत नुकतेच मुंबई महापालिकेचे माजी महापौर दत्ता साळवी यांनी प्रवेश केला. साळवींचा प्रवेश हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. त्यातच एकनाथ शिंदेंनी आपल्यापक्षासोबत उद्धव ठाकरेंची साथ सोडून आत्तापर्यंत तब्बल 45 ते 50 नगरसेवक आल्याचे जाहीर केले आहे. महापालिकेची निवडणूक जशी जवळ येईल तशी या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरेंचे पक्ष संघटन दुबळे करण्याचा शिंदेचा प्लॅन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.
'मिशन टायगर'द्वारे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना साथ देणाऱ्या माजी आमदारांना आपल्या पक्षात घेतले. आता, शिंदेंची नजर ही माजी नगरसेवक आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेत शिंदेंनी ताकद दिली. तर नवी मुंबई महापालिकेची तब्बल 13 माजी नगरसेवकांना शिंदेंनी आपल्या सोबत घेतले. यातील बहुतांश नगरसेवक हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंसोबत राहिले होते.
मुंबई महापालिका हा दोन्ही ठाकरे बंधुंच्या दृष्टिने अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्धव-राज एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबईत त्यांचे पारडे जड होईल आणि मराठी मतदार उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना आपल्याकडे घेत उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून राज-उद्धव यांच्या युतीचा काहीच उपयोग होणार नाही आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना फटका बसेल, अशी रणनीती शिंदेंनी आत्तापासूनच आखण्यास सुरुवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.