Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे स्थान बळकट; मात्र अपयशामुळे धक्का बसण्याचा धोका?

Devendra Fadnavis Position In BJP Is Strengthened : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सूड उगवण्याचा नादात आणि एकनाथ शिंदे, अजितदादा पवार सोबत आले म्हणजे, आपण जिंकलो या भ्रमात राहिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पदरी लोकसभा निवडणुकीत अपयश आले. त्यांचे पक्षातील स्थान अद्यापही बळकट वाटत असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वबदलाच्या धक्कातंत्राकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

Devendra Fadnavis And BJP : देवेंद्र फडणवीस यांची जागा घेऊ शकेल, असा नेता महाराष्ट्र भाजपमध्ये सध्यातरी कुणी दिसत नसला तरी, लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे केंद्रात त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी केली होती. पक्षश्रेष्ठींनी ती तूर्तास अमान्य केली आहे. असे असले तरी पक्षातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्यात जे राजकारण झाले, त्याच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसही होते. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा निर्णय त्यांचाच होता, असे गेल्या काही महिन्यांतील घडामोडींवरून सिद्ध झाले आहे. मी पुन्हा आलो, मात्र दोन पक्ष फोडून, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मात्र भाजपने हे दोन पक्ष फोडल्याचा इन्कार केला होता. पवार यांचे पुत्रीप्रेम आणि उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे त्यांचे पक्ष फुटले, असे अमित शाह यांनी जाहीर सभेत सांगितले होते. हे दोन्ही पक्ष फोडण्याशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा संबंध नव्हता, असे अमित शाह यांच्यासह अन्य नेत्यांनीही वारंवार सांगितले आहे. त्यामुळे अर्थातच ती जबाबदारी फडणवीस यांच्यावर येऊन पडली.

भाजपच्या (BJP) पक्षसंघटनेचे नेहमीच कौतुक केले जाते. विस्तारक, वॉरियर्स, पन्नाप्रमुख आदींच्या कामावर भाजपची भिस्त असते. निवडणुका जिंकण्यात यांचा मोठा वाटा असतो, असे सांगितले जाते. हे जाळे दाट विणले गेले आहे, असे चित्र भाजपकडून निर्माण करण्यात आले होते. भाजपच्या तुलनेत विरोधकांची तयारी काय आहे, ते भाजपला कसे पराभूत करू शकतील, असे प्रश्न उपस्थित केले जायचे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ही यंत्रणा कुठे होती, असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. भाजपच्या या संकल्पना 'ओव्हररेटेड' आहेत का, अशी शंका आता उपस्थित होत आहे. उस्मानाबादसारख्या (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात भाजपची ही फळी सपशेल निकामी ठरली आहे. एक्झिट पोल करणारे आम्हाला आयुष्यात कधी भेटले नाहीत, असे लोक सतत बोलत असतात. भाजपच्या या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही अशी परिस्थिती पाहायला मिळाली.

Devendra Fadnavis
Raj Thackeray: बिनशर्त पाठिंबा देऊनही मनसेच्या वाट्याला अवहेलनाच!

फोडाफोडी, गद्दारी महाराष्ट्र सहन करत नाही, अशी चर्चा नेहमी होते. त्याला या निवडणुकीने दुजोरा दिला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर मर्यादा सोडून टीका करणारे भाजपचे नेते अर्थातच फडणवीस यांच्या जवळचे आहेत. यातील काही वाचाळवीरांनी ध्रुवीकरण होईल, अशी वक्तव्ये सातत्याने केली. त्यांना फडणवीस रोखू शकले असते, मात्र तसे झाले नाही. महागाई, बेरोजगारीने लोक त्रस्त झाले होते. त्याकडे लक्ष न देता सरकारने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच टीका करण्यात अधिक वेळ घालवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी मंत्रिमंडळात सर्वाधिक महत्व फडणवीस यांनाच आहे, हेही लपून राहिलेले नाही. त्यामुळे याचीही जबाबदारी फडणवीस यांच्यावर येऊन पडते.

Devendra Fadnavis
Modi 3.0 Cabinet: लोकसभेला निराशा: मंत्रिमंडळाच्या रचनेतून शिवसेना-राष्ट्रवादीला भाजपचा संदेश?

महायुतीतल अन्य पक्षांचे उमेदवार ठरवण्याचे बहुतांश निर्णय फडणवीस हेच घेताहेत, असे चित्र दिसत होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलेला हिंगोलीचा उमेदवार त्यांना बदलायला लावला. सलग पाचवेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांची उमेदवारी कापायला लावली. नाशिकमधून विजयी झालेले हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी अक्षम्य विलंब झाला. उस्मानाबादची जागा कुणाला सुटणार आणि उमेदवारी कुणाला मिळणार हे अखेरच्या क्षणी ठरले. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश महागात पडला. यासह काँग्रेसमधील अन्य काही सरंजामी वृत्तीच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन चूक झाली, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. काही मतदारसंघांत अशा नेत्यांच्या गावांतूनही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली. फडणवीस यांच्या विदर्भातही भाजपची मोठी पीछेहाट झाली.

एकनाथ खडसे यांच्या भाजपप्रवेशाबाबत फडणवीस आणि त्यांचे निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजन हे सकारात्मक नव्हते. मात्र विनोद तावडे यांच्या माध्यमातून खडसे यांनी फडणवीस, महाजन यांच्यावर मात केली. खडसेंमुळे रावेरसह त्या भागातील काही जागा राखण्यात भाजपला यश मिळाले. विनोद तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. ते मोदी आणि शाह यांच्या जवळ गेले आहेत.

पक्षश्रेष्ठींनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या आहेत. भाजपमध्येही गटबाजी आहे आणि ती अत्यंत तीव्र अशा स्वरूपाची आहे. ती बाहेर दिसून येत नाही. उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी फडणवीस यांनी केल्यानंतर मोहीत कंबोज यांनी एक ट्वीट केले होते. एका नेत्याची रेष छोटी करण्यासाठी कटकारस्थाने करण्यात आली, असा त्याचा आशय होता. कंबोज यांचा रोख फडणवीस यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडे होता.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या ताकदीकडे फडणवीस यांनी दुर्लक्ष केले. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना सोबत घेतले म्हणजे आपली मोहीम फत्ते झाली, असे त्यांना वाटायला लागले होते. मतदारांचा मूड काय आहे, हे त्यांच्या लक्षात आलेच नसावे. फडणवीस हे चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेऊन महाविकास आघाडीत गेल्यामुळे ते सूडाने पेटून उठले होते. त्यामुळेच त्यांचा घात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धक्कादायक निर्णय घेत असतात.

गेल्यावर्षी मध्यप्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री निवडताना त्याची प्रचीती पुन्हा एकदा आली होती. विनोद तावडे यांच्याबाबत लवकरच मोठी बातमी ऐकायला मिळेल, अशा आशयाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विधान ताजेच आहे. एका अर्थाने विनोद तावडे तयार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांच्या भाजपमधील स्थानाला तूर्तास धक्का लागणार नाही, असे चित्र असले तरी धक्का कधीच लागणार नाही, असे म्हणता येणार नाही. फडणवीस यांच्या काही चुकांमुळे विनोद तावडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे का, हे येत्या काही महिन्यांत समोर येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com