
Election Transparency and Trust : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारा ठरला होता. तर महायुतीला मिळालेला विजय अविश्वसनीय होता. एवढा मोठा विजय मिळेल, असे युतीतील नेत्यांनाही वाटले नसेल. पण या निकालानंतर राज्यासह देशभरात संशयाचे ढग जमा होण्यास सुरूवात झाली. लोकसभा ते विधानसभेदरम्यान वाढलेली मतदारसंख्या, सायंकाळनंतर वाढलेले मतदान आदी मुद्द्यांवर विरोधकांनी आक्षेप घेण्यास सुरूवात केली, आजही ते सुरूच आहे. पण गुरूवारी भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 10 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमची तपासणी अन् पडताळणीबाबत दिलेली माहिती विरोधकांच्या नॅरेटिव्हला धक्का देणारी आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने गुरूवारी एका प्रेसनोटद्वारे छातीठोकपणे सांगितले आहे की, ‘ईव्हीएममध्ये छेडछाड करता येत नाही, हे पुन्हा एकदा सिध्द झाले.’ एका बाजूने विरोधकांकडून सुरू असलेला हल्लाबोल सहन करत आयोगाने महाराष्ट्रातील दहा मतदारसंघात ईव्हीएम तपासणी व पडताळणी केली. एकाही ठिकाणी एकही त्रुटी आढळून आली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने निवडणूक आयोगावर मतांच्या चोरीचा आरोप करत आहे.
आयोगाकडून भाजपसाठी हे केले जात असल्याचा दावा राहुल गांधी करत आहेत. आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही ते करतात. पण त्यांनी एकदाही हे पुरावे समोर आणलेले नाहीत. तर आयोगाकडून वेळोवेळी ईव्हीएमची विश्वासार्हता, मतदार नोंदणी, मतदारयाद्यांबाबतचे विरोधकांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांच्याकडे कोणते, कुठले आणि किती पुरावे आहेत, हे त्यांना आणि हे पुरावे गोळा करणाऱ्या नेत्यांनाच ठाऊक. पण त्यांच्याआधी आयोगाने मात्र पुराव्यानिशी बाजी मारली आहे.
महाराष्ट्रातील 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार संबंधित 10 विधानसभा मतदारसंघात मतदार युनिट (BU), नियंत्रण यंत्र (CU) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यांची तपासणी आयोगाकडून करण्यात आली. ही यंत्र तयारी करणारी कंपनी आणि आयोगाच्या पडताळणीमध्ये सर्व यंत्र सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम पडताळणीतही कोणताही फरक आढळून आला नाही. हे सर्व कामकाज त्या-त्या मतदारसंघात आठ उमेदवार आणि दोन ठिकाणी त्यांच्या प्रतिनिधींसमोर झाल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही विनंती करणारे पराभूत उमेदवार होते. आयोगाकडून या पडताळणीध्ये एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅटची तपासणी झाली.
उमेदवारांच्या विनंतीनुसार, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला आणि माजलगाव या मतदारसंघात मेमरी आणि मायक्रोकंट्रोलर पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली. सर्व यंत्रांची निदान चाचणी यशस्वी ठरली. तर पनवेल, अलीबाग, अर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि माजलगाव मतदारसंघातही निदान चाचणी यशस्वी ठरली. तिथे मॉक पोलही घेण्यात आला. सर्वच चाचण्यांमध्ये यंत्रे योग्यप्रकारे काम करत असल्याचे संबंधित कंपनीकडून प्रमाणित करण्यात आले आहे. या दहा मतदारसंघांमध्ये 19 ते 29 जुलै या कालावधीमध्ये आयोकाडून ही पडताळणी करण्यात आली आहे.
पडताळणीनंतर आयोगाने ईव्हीएमध्ये कोणतीही छेडछाड करता येत नसल्याचे जाहीर केले आहे. राहुल गांधी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दाव्यांना हा मोठा धक्का आहे. आजही या नेत्यांकडून ईव्हीएममध्ये गडबडीचे आरोप केले जातात. मतदान मतपत्रिकांवर घेण्याचे आव्हान निवडणूक आयोगाला दिले जाते. पण आयोगाने दहा मदारसंघात ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी करत विरोधकांचे आरोप एकप्रकारे पुराव्यानिशी खोडून काढले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.