Lok Sabha Election in Maharashtra : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधी भारतीय जनता पक्ष अतिशय उत्साहात होता. त्यांनी महाराष्ट्रात फोर्टी प्लस अशी घोषणा केली होती. मात्र, सध्याचे वारे पाहून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चक्क भाजपची ही घोषणाच हिसकावली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवारी (ता. 11 मे) नंदुरबार येथे जाहीर सभा झाली. धुळे येथे आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सभा होणार आहे. त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पटोले (Nana patole) दोन दिवसांपासून नंदूरबार आणि धुळे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून मिळणाऱ्या राजकीय माहितीमुळे पटोले चांगलेच खुशीत आहेत. राज्यभरातील महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) कामगिरी पाहता आम्हाला ‘फॉर्टी प्लस’ जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची (BJP) ‘फॉर्टी प्लस’ ही घोषणा नाना पटोले यांनी चक्क हिसकावली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा झाल्या. या सभांमध्ये शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. याच वेळी पवार यांना भारतीय जनता पक्षात येण्याचे निमंत्रणही पंतप्रधान यांनी दिले. त्याचा उल्लेख करीत पटोले यांनी पंतप्रधानांवर टीका केली. ते म्हणाले, एकीकडे पंतप्रधान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नकली म्हणतात. दुसरीकडे शरद पवार यांना भाजपसोबत येण्याचे निमंत्रण देतात. याचा अर्थ त्यांना पराभव दिसू लागला आहे. खरे तर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, हे मान्य करायला हवे.
उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या आठ जागा आहेत. या सर्व जागा सध्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा सहकारी शिंदे गटाकडे आहेत. त्या सर्व जागा भाजप यंदाही जिंकेल, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. हा दावाही नाना पटोले यांनी खोडला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल, काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. राज्यात सगळीकडे अशीच स्थिती आहे. मतदारांचा मोठा प्रतिसाद महाविकास आघाडीच्या प्रचार सभांना मिळत आहे, असा दावाही त्यांनी केला.
भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'अब की बार चारसौ पार' अशी घोषणा दिली होती. त्यात त्यांचा महाराष्ट्रावर विशेष भर होता. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार आहे. विरोधी पक्ष कमकुवत आहे. त्यामुळे उत्साहात असलेल्या सर्व भाजप नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक एकहाती जिंकण्याचा आत्मविश्वास आहे.
लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यांत निवडणूक झाल्यावर वेगळाच संदेश मिळू लागला आहे. त्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या राजकीय स्थितीचा फायदा घेण्यासाठी नाना पटोले यांनी चक्क भाजपच्या ‘फोर्टी प्लस’ ही घोषणाही अलगदपणे हिसकावून घेतली आहे. राजकारणात विरोधकांना नामोहरम करण्याची ही मानसिक खेळी पटोले यांनी खेळली आहे.
Edited By : Vijay Dudhale