Gandhi-Bachchan Family : सोनिया अन् जया बच्चन यांची पुन्हा वाढतेय जवळीक; कधी तुटली होती ही दोस्ती?

Amitabh Bachchan Jaya Bachchan Sonia Gandhi : कधीकाळी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यातील मैत्रीची राजकीय वर्तूळात सातत्याने चर्चा व्हायची. पण काही कारणांनी बच्चन आणि गांधी कुटुंब एकमेकांपासून दुरावले.
Jaya Bachchan, Sonia Gandhi
Jaya Bachchan, Sonia GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राजकारणात कधी कुणाची मैत्री होईल अन् कोण कुणाचे शत्रु, हे सांगणे कठीण आहे. कधीकाळी गांधी आणि बच्चन यांच्यातील कौटुंबिक संबंध अत्यंत घट्ट होते. काही दशकांपूर्वी त्यामध्ये मिठाचा खडा पडला. पण आता पुन्हा या दोन्ही कुटुंबातील दरी दूर होईल, असा आशेचा किरण दाखवणारी एक घटना नुकतीच घडली.

 राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असा नामोल्लेख केला आणि राज्यसभेत वाद सुरू झाला. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन त्यावर चांगल्याच भडकल्या. याआधीही ‘अमिताभ’ वरून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. केवळ जया बच्चन असाच उल्लेख करावा, असा त्यांचा रोख होता. पण मागील आठवड्यात राज्यसभेत त्यांनी थेट धनखड यांच्यावर बॉडी लँग्वेज आणि टोनवर भाष्य केले. त्यावर धनखड यांनीही त्यांना तुम्ही असा सेलिब्रिटी पण सभागृहाचा डेकोरम पाळलाच पाहिजे, असे ठणकावले.

इथेच वादाची ठिणगी पडली. काँग्रेससह विरोधी पक्षातील इतर सदस्यांनी सेलिब्रिटी शब्दावर आक्षेप घेत जया बच्चन या खासदार म्हणून इथे उपस्थित असल्याचे सांगितले. त्यावर वाद वाढत गेला. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यावेळी सभागृहातच होत्या. धनखड यांचे बोलणे सोनियांनाही आवडले नाही आणि त्यांनी इतर सदस्यांसह कामकाजावर बहिष्कार टाकला. एवढेच नाहीतर बाहेर मीडियाशी बोलताना त्या जया बच्चन यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असल्याचे पाहायला मिळाले. दोघींमध्ये हसतखेळत संवादही झाला.

Jaya Bachchan, Sonia Gandhi
Shiromani Akali Dal : अकाली दल फुटीच्या उंबरठ्यावर; उरले फक्त दोन आमदार, ‘आप’ने दिला दणका

सोनिया आणि जया बच्चन यांची ही कृती गांधी व बच्चन कुटुंबातील जवळीक तर वाढत नाही ना, असे सूचक संकेत देणारी असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. कधीकाली गांधी आणि बच्चन कुटुंबात घट्ट मैत्री होती. अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या चांगल्या मैत्रिणी होत्या.

गांधी-बच्चन मैत्री कशी झाली?

नेहरू-गांधी कुटुंबाचे अलाहाबादमधील आनंद भवन हे घर गांधी-बच्चन यांच्यातील मैत्री साक्षीदार होते. सरोजिनी नायडू यांनी अमिताभ यांचे वडील हरिवंश राय आणि आणि आई तेजी बच्चन यांची जवाहरलाल नेहरूंसोबत भेट घडवून आणली होती. त्यानंतर तेजी बच्चन आणि इंदिरा गांधी यांच्यातील मैत्री वाढत गेली. राजीव गांधी आणि अमितभा बच्चन यांची भेटही लहानपणीच झाली. त्यावेळी राजीव गांधी दोन तर अमिताभ चार वर्षांचे होते. त्यानंतर ही मैत्री अधिकच फुलत गेली.

Jaya Bachchan, Sonia Gandhi
Manish Sisodia : राहुल गांधी, केजरीवाल अन् भाजप..! 570 दिवस जेलमध्ये राहिलेल्या सिसोदियांनी केले अनेक खुलासे

सोनिया गांधी 1968 मध्ये भारतात आल्या त्यावेळी अमिताभ बच्चन त्यांना घेण्यासाठी दिलीतील पालम विमानतळावर गेले होते. राजीव यांच्याशी विवाहाआधी त्या तेजी बच्चन यांच्या घरी राहिल्या होत्या. एका मुलाखतीत सोनिया यांनी त्यांचा तिसरी आई म्हणून उल्लेख केला होता. अमित आणि अजिताभ हे आपला भाऊ असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.

अशी तुटली दोस्ती

गांधी कुटुंबाच्या प्रत्येक समारंभात बच्चन कुटुंबीयांचा सक्रीय सहभाग असायचा. संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर राजीव गांधी राजकारणात सक्रीय झाले. त्यानंतर आई इंदिरा गांधी यांची हत्या झाली अन् राजीव गांधी पंतप्रधान बनले. अमिताभ बच्चन यांनीही लोकसभा निवडणूक लढवली होती. अलाहाबादमधून ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पण तीन वर्षांनी अमिताभ यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्याला बोफोर्स प्रकरण कारणीभूत ठरले. अमिताभ यांचे नाव या घोटाळ्याशी जोडले गेले होते.

अमिताभ यांनी खासदारकीचा राजीनामा देत राजकारणातून काढता पाय घेतला आणि तिथूनच गांधी-बच्चन कुटुंब दुरावण्यास सुरूवात झाली. बच्चन यांच्या राजीनाम्याला राजीव गांधींची संमती नव्हती, असे सांगितले जाते. पुढे 1991 पर्यंत राजीव गांधी आणि अमिताभ यांच्यातील दुरावा वाढत चालला होता. पुढे 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर अमिताभ हे अंत्यविधीच्या संपूर्ण नियोजनात सक्रीय असल्याचे दिसून आले होते.

Jaya Bachchan, Sonia Gandhi
Yogi Adityanath : पाकिस्तान नष्ट होणार की भारतात विलीन..! योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

गांधी आणि बच्चन कुटुंबातील दुरावा नंतर चांगलाच वाढत गेला. अमिताभ यांनी 1995 मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी स्थापन केली होती. पण कंपनीने अमिताभ यांना आर्थिक संकटात नेले. या काळात गांधींनी मदत केली नाही, असे सातत्याने बोलले जाते. त्यानंतर अमिताभ यांच्या मुलीच्या विवाहातही गांधी कुटुंबातही एकही सदस्य उपस्थित नव्हता. याच काळात जया बच्चन यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि आजपर्यंत याच पक्षाच्या खासदार म्हणून संसदेत आहेत.

दरम्यानच्या काळात जया बच्चन या गांधींवरील आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत होत्या. ज्या लोकांनी आम्हाला राजकारणात पुढे आणले त्यांनीच मध्येच साथ सोडली. आम्ही अडचणीत असताना सोबत नव्हते. हे लोक नेहमी धोका देतात, असे एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या. राहुल गांधी यांनीही बच्चन कुटुंबावर टीका केली होती. ‘ते खोटं बोलत आहेत. एवढ्या वर्षानंतर ते आरोप का करत आहेत. कुणी कुणाला धोका दिला हे लोकांना माहिती आहे,’ असा पलटवार राहुल यांनी केला होता. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यावरूनही राहुल यांनी बच्चन यांना लक्ष्य केले होते.

पुन्हा सूर जुळणार?

संसदेतील एका घटनेनंतर जया बच्चन आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये वाढलेली जवळीकीने राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे. जुने सारे विसरून ही दोन्ही कुटुंब पुन्हा एकत्रित येणार का, या चर्चांना उधाण आले आहेत. दोघींचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. पण ही केवळ राजकीय गरज म्हणून एकी दाखविण्याची रणनीतीही मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com