India Aghadi Vs BJP : आमदार फोडल्याचे कवित्व सुरू असताना भाजपला बसलेला धक्का दुर्लक्षितच !

Seven States Assembly Seats Result : लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळवू न शकलेल्या भाजपला महिनाभरात आणखी एक धक्का बसला. मात्र महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे काही आमदार फोडण्यात महायुतीला मिळालेल्या यशाचे कवित्व सुरू होते. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपला बसलेल्या धक्क्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले.
Narendra Modi- Eknath Shinde-Ajit Pawar- devendra Fadanvis
Narendra Modi- Eknath Shinde-Ajit Pawar- devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : गेल्या आठवड्यात देशातील राजकारणात एक महत्वाची घटना घडली, मात्र त्याकडे लोकांचे म्हणावे तितके लक्ष गेले नाही, कारण महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषद निवडणुकीचे कवित्व सुरू होते.

12 जुलै रोजी विधान परषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक झाली आणि 13 जुलै रोजी सात राज्यांतील विधानसभेच्या 13 जागांचे निकाल जाहीर झाले. यात इंडिया आघाडीने एनडीए आणि भाजपला जोरदार धक्का दिला.

बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तमिळनाडू,पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या 13 जागांवर पोटनिवडणूक झाली. 13 पैकी 10 जागा जिंकत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने भाजपला धक्का दिला.

भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. या निकालाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक झाली होती.

जागा 11 आणि उमेदवार 12 यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. अपेक्षेनुसार महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या पक्षाने पुरस्कृत केलेले शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली, परिणामी जयंत पाटील यांचा पराभव झाला.

Narendra Modi- Eknath Shinde-Ajit Pawar- devendra Fadanvis
Jayant Patil Defeat : कुणा फितुरांमुळे... शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी विधान परिषद दणाणून सोडणारा आवाज झाला 'म्यूट'!

महायुतीच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीची,विशेषतः काँग्रेसची मते फोडण्यात यश मिळवले. ही मते कशी फुटतात, हे आता लपून राहिलेले नाही. 2022 मध्येही असाच प्रकार घडला होता.

त्यावेळी महाविकास आघाडची सत्ता असतानाही काँग्रेसची मते फुटली होती. 2024 मध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. विधान परिषदेला मतदान कसे केले जाते, त्यासाठी काय काय करावे लागते,याची कल्पना आता लोकांना आली आहे.

अर्थसंकल्पानंतर जवळपास 95 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. विधान परिषद निवडणुकीत काय होणार, हे या पुरवणी मागण्यांच्या बजेटवरूनच लक्षात आले होते.

या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे प्रचंड आवेशात दिसले. महिनाभरापूर्वीच मतदारांनी महायुतीला धडा शिकवल्याचा विसर पडण्यास विधान परिषदेतील विजयाने हातभार लावला.

निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे तोंडभरून कौतुक केले. अनेक महिन्यांपासून जळत असलेल्या मणिपूरकडे पंतप्रधान मोदी यांनी पाठ फिरवल्याचा विसर त्यांना पडला.

नीटचा पेपर फुटल्याचाही त्यांना विसर पडला. विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत सत्ताधाऱ्यांची केलेली कोंडीही आपले मुख्यमंत्री विसरून गेले.

हे सगळे सुरू असताना दुसऱ्याच दिवशी मतदारांनी एनडीएला पोटनिवडणुकीत धक्का दिल्याचे समोर आले. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फोडल्याच्या आनंदात महायुतीच्या नेत्यांनी हा धक्काही पचवून घेतला. तिकडे, लोकसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिलेल्या इंडिया आघाडीला पोटनिवडणुकीतील विजयाने दिलासा मिळाला.

Narendra Modi- Eknath Shinde-Ajit Pawar- devendra Fadanvis
Video Sunetra Pawar : मोठी बातमी! शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या ‘मोदी बागे’त सुनेत्रा पवार; नेमकं काय घडलं?

राजकारणात जय-पराजय मागे सोडून पुढे जायचे असते. कोणतीही गोष्ट कायम राहत नसते. एकदा पराभव वाट्याला आला म्हणजे तो पुन्हा येईलच किंवा येणारच नाही, असे नसते. मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव का झाला, यापासून धडा घेण्यास नेते तयार नाहीत. गेली अडीच वर्षे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ तुंबड्या भरण्याचे काम केलेल्या सरकारने निवडणूक तीन महिन्यांवर असताना लाडकी बहीण ही योजना आणली आहे.

स्वयंपाकाचे 400 रुपयांचे गॅस सिलिंडर 825 ते 1000 रुपयांत घेताना लाडक्या बहिणींना किती कसरत करावी लागली, याचा विसर सरकरला पडला होता. आता त्या कसरतीचा विसर लाडक्या बहिणींना पडावा, यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.

अशा योजना आणि विधान परिषद निवडणुकीतील निकालामुळे महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे, मात्र सात राज्यांतील पोटनिवडणुकीच्या निकालाने जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण सादर केले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत एनडीएला बसलेला हा धक्का काही प्रमाणात दुर्लक्षित राहिला.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com