
India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या अमेरिकेच्या भूमिकेची जोरदार चर्चा होत आहे. एकीकडे भारताकडून प्रत्येकवेळी मात दिली जात असल्याने पाकिस्तानची दाणादाण उडालेली असताना अमेरिकेनेही सर्व दोर कापले आहेत. प्रत्येकवेळी पाकला पाठिशी घालणाऱ्या अमेरिकेच्या या भूमिकेने पाकला जन्माची अद्दल घडणार, हे निश्चित आहे.
पाकिस्तानच्या विश्वासाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. भारतासोबत कधीही संघर्षाची स्थिती निर्माण झाल्यास अमेरिका आपल्याला त्यातून बाहेर काढेल, असा ठाम विश्वास पाकच्या नेत्यांना होता. पण यावेळी तसे घडले नाही. त्यामुळे पाकची भंबेरी उडाली आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अमेरिकेने या संघर्षामध्ये हस्तक्षेप करण्यास थेट नकार दिला आहे. पाकिस्तानसाठी हा सर्वात मोठा मानसिक धक्का मानला जात आहे. आता त्यांना नेहमीसारखे अमेरिकेच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येणार नाही.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी सध्याच्या संघर्षावर फॉक्स न्यूजशी बोलताना भारत आणि पाकमधील संघर्षात अमेरिका हस्तक्षेप करणार नाही, असं मोठं विधान केलं आहे. हा संघर्ष कमी व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. पण आम्ही त्यामध्ये थेटपणे सहभागी होणार नाही. आम्हाला त्याच्याशी काही देणंघेणं नाही, असे व्हान्स यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. पाकिस्तानने 1971 नंतर पहिल्यांदाच अशी भूमिका घेतली आहे.
भारत आणि पाकिस्तानातील 1971 च्या युध्दावेळी अमेरिकेने बंगालच्या उपसागरात लढाऊ युध्दनौका तैनात केली होती. न्यूक्लिअर हल्ला करू शकणारी लढाऊ विमाने या युध्दनौकेवर होती. हा भारतासाठी एकप्रकारे इशारा मानला जात होता. त्यानंतर 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले होते. त्यावेळी अमेरिकेकडून नकळतपणे पाकला वाचविण्याचा प्रयत्न केला होता.
अमेरिकेच्या मागील सरकारच्या काळात ज्यो बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला एफ-१६ ही लढाऊ विमाने पुरविल्याची चर्चा होती. त्याचप्रमाणे यापूर्वी अनेकदा अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक मदत केल्याचेही सांगितले जाते. 1971 ते आतापर्यंतचा अमेरिकेचा हा इतिहास पाहता यावेळी घेतलेली भूमिका पाकसाठी मोठा झटका ठरली आहे. केवळ अमेरिकाच नव्हे तर इतर मित्रराष्ट्रांनीही थेट ढवळाढवळ करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाक एकाकी पडल्याची सध्याची स्थिती आहे.
पाकिस्तानला तुर्कीकडून मदत होत असल्याचे समोर आले आहे. पाकने भारतावर केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेली ड्रोन तुर्की बनावटीची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच तुर्कीकडून पाकला शस्त्रास्त्रे पुरविली जात असल्याचेही वृत्त आहे. मात्र, चीन, सौदी अरेबिया, यूएई, अझरबैजान सारख्या देशांनी पाक आणि भारताला या संघर्षातून मार्ग काढण्याचे आवाहन करत एकप्रकार पाकला एकटे पाडले आहे. याउलट अमेरिकेने भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला उघडपणे पाठिंबा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.