Jayant Patil Vs Rohit Pawar : जयंतरावांच्या खुर्चीवर 'साहेब' कोणाला बसवणार? रोहित पवार की...

NCP SP News : जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे.
Jayant Patit-Rohit Pawar-state president-NCP-Sharad-Pawar
Jayant Patit-Rohit Pawar-state president-NCP-Sharad-PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP SP News : अखेर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात जाहीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली. यावर पवार यांनी प्रमुख सहकाऱ्यांना घेऊन बसू आणि पाटील यांच्या मागणीवर विचार करू, असे सांगितले.

दुसऱ्या बाजूला पाटील यांना बाजूला केल्यास शरद पवार प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोणाला बसवणार? असा प्रश्न विचारला जात आहे. पण पाटील यांनी इच्छा व्यक्त करताच 2 वर्षांपासून चर्चेत असलेल्या रोहित पवार यांच्या इच्छांना नक्कीच धुमारे फुटले असावेत. रोहित पवार यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. यातूनच त्यांचे आणि जयंत पाटील यांचे पटत नाही. पण अद्याप त्यांना प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहचता आले नव्हते.

रोहित पवार अन् जयंत पाटील यांच्यामध्ये सुप्त संघर्ष :

खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदाचा वाद चिघळला आहे. त्यातही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष बदलासाठी जोर धरला आहे. यात रोहित पवार या पदासाठी आग्रही असल्याचे दिसून येते. मुंबईत पदाधिकारी बैठकीत "बास आता, जयंत पाटील यांना थांबवा. त्यांच्या जागी रोहित पवार किंवा रोहित पाटील यांना संधी द्यावी" अशी मागणी शरद पवार यांच्यासमोरच झाली होती.

अशा जाहीर आणि अनपेक्षित मागणीने जयंत पाटील आवाक् झाले. पण त्यातून सावरत त्यांनी पलटवार केला. "पक्षाला नवीन पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष देण्याची मागणी करण्यात आली, हे वास्तव आहे. मी देखील एकटा किती वेळ काम करणार? आठ दिवसांचा वेळ द्या, स्वतःहून प्रदेशाध्यक्षपद सोडतो. पण, तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीत बुथवर काम केल्याचा डेटा द्यावा. कुणी काय काम केले, आपल्या बुथवर पक्षाला किती मतदान झाले याची सविस्तर माहिती द्यावी, असे म्हणत जयंत पाटील यांनी जणू प्रति आव्हानच दिले.

Jayant Patit-Rohit Pawar-state president-NCP-Sharad-Pawar
Jayant Patil : जयंत पाटलांची 'प्रदेशाध्यक्षपदातून' मुक्त करण्याची मागणी : मेळाव्याच्या भाषणातच राजीनामा देण्याचे सुतोवाच

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्तानेही जयंत पाटील यांनी राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेतल्या, मात्र रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात सभाच झाली नाही. मग रोहित पवार यांनीही जयंत पाटील यांच्याकडे पाठ फिरवलेली होती. या निवडणुकीतील विजयानंतर रोहित पवार समर्थकांनी ‘संघर्षातही न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय’ असा जाहिरात लेख प्रसिद्ध केला.

तर जयंत पाटील समर्थकांनी ‘विजयाचा सेनापती’ अशा मथळ्याची जाहिरात प्रसिद्ध केली. यावर, "विजयाचा कोणी एक सेनापती नसतो, हे यश शरद पवार आणि राज्यातील कार्यकर्त्यांचे आहे" असे म्हणत जयंत पाटील यांच्या जोशाला रोहित पवार यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे ब्रेक दिला. गतवर्षी अहिल्यानगरच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनाच्या सभेत देखील रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील वाद बघायला मिळाला होता.

या मेळाव्याच्या आधीच रोहित पवार यांचे निकटवर्तीय विकास लवांडे यांनी एक ट्विट केले होते. ''निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे किंवा युवा आमदार रोहित पवार यांच्यावर आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी. तसेच, सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवरही पक्ष संघटना वाढवली पाहिजे", असेही लवांडे यांनी म्हटले होते. या ट्विटचे जयंत पाटील यांनी नगरच्या सभेत जाहीरपणे वाभाडे काढले.

"काही लोक माझ्या अध्यक्षपदासंबंधी महिने मोजत आहेत. ते मोजत बसू नका. मला केवळ चारच महिने द्या. राज्यात सरकार आणू. त्यानंतर मी स्वतःच ‘नमस्कार’ करेन. माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर तर थेट शरद पवार यांच्या कानात सांगा. त्यांनी दोन कानशिलात दिल्या तर त्या घेऊ. उगाच जाहीर वाच्यता करू नका.’’ अशा शब्दात जयंत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. तर विकास लवांडे यांचे कान टोचले होते.

Jayant Patit-Rohit Pawar-state president-NCP-Sharad-Pawar
Jayant Patil Politics : विशाल पाटलांना येणाऱ्या ऑफरवर जयंत पाटलांची गुगली; म्हणाले, 'ते अपक्ष, त्यांनीच...'

लवांडे यांच्या ट्विटनंतर जयंत पाटील यांचे निकटवर्तीय अॅड. भूषण राऊत यांनीही नाव न घेता रोहित पवार यांची खिल्ली उडवली होती. "राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे म्हणजे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाहीये", असे ट्विट राऊत यांनी केले होते. राऊत यांच्या ट्विटचा रोख थेट रोहित पवारांवर असल्याचे दिसून आले होते. कारण, बारामती अॅग्रोच्या माध्यमातून रोहित पवार यांचा पोल्ट्रीचाही मोठा उद्योग आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून गेली. यातही रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे पाटील यांनी पाठ फिरवली. मग रोहित यांनी पाचही ठिकाणी उपस्थिती टाळली. विशेष म्हणजे ते कर्जत-जामखेड मतदारसंघात उपस्थित असूनही ते प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात सहभागी झाले नाहीत.

अजित पवारांच्या बंडानंतरच रोहित पवारांची फिल्डिंग :

एकत्रित राष्ट्रवादीच अजित पवार विरुद्ध जयंत पाटील असे शीतयुद्ध बघायला मिळाले होते. पण शरद पवार यांचा जयंत पाटील यांच्यावर प्रचंड विश्वास होता आणि आजही आहे. अजित पवार यांनी एका मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण शरद पवार यांनी ही मागणी मान्य केली नाही. मात्र दोघांनी कधीही वाद चव्हाट्यावर येऊ दिले नाहीत.

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर मात्र रोहित पवार यांना स्पेस मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा ते प्रयत्न करू लागले. सातत्याने राज्यात विविध यात्रा काढत दौरे काढू लागले. प्रचार काळात अजित पवार यांच्यावर टीका करण्यासाठी शरद पवार यांनीही रोहित पवार यांना मोकळीक दिली. त्यामुळे रोहित पवार अधिकच आक्रमक झालेले दिसून आले होते.

यानंतर रोहित पवार आणि रोहित पाटील यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली जावी अशी मागणी सातत्याने पुढे येऊ लागली. स्वत: शरद पवार यांनी रोहित पवार आणि रोहित पाटील यांना जबाबदारी द्यावी असे जयंत पाटील यांना सांगितल्याचे बोलले गेले. पण जयंत पाटील अनेक दिवस या मागणीकडे लक्ष दिले नाही. पदाधिकारी निवडीतही रोहित पवार यांना विचारात घेतले जात नसल्याच्या चर्चा होत्या.

यातूनच रोहित पवार यांनी आपली फळी उभी करायला सुरुवात केल्याचे दिसून आले. त्यामुळे एकाच पक्षात दोन प्रभावी गट तयार झाले. दोन सत्ताकेंद्र तयार झाल्याने कार्यकर्त्यांनाही पर्याय मिळाला. त्यातूनच दोघांचीही ताकद वाढत गेली. आता एकाच म्यानात दोन तलावरी बसू शकत नाहीत, त्याचप्रमाणे एका पक्षात दोन सत्ताकेंद्र एकत्र राहूच शकत नाही. त्यातूनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वाढ चिघळला असल्याचे बोलले जाते.

अशात विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी अनुभवी रोहित पवार यांना डावलत नवख्या रोहित पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली. याचाही रोहित पवार यांना चांगलाच राग असावा. त्यातूनच जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येते. आता स्वतः जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

पण राष्ट्रवादीचा आजवरचा इतिहास बघता पवार घराण्यातील एकही व्यक्ती प्रदेशाध्यक्ष झालेली नाही. शरद पवार यांनी छगन भुजबळ, आर.आर. पाटील, मधुकर पिचड, भास्कर जाधव, सुनील तटकरे अशा पवार घराण्याबाहेरील व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष केले आहे. अजित पवार यांनी इच्छा व्यक्त करूनही ती पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे आता रोहित पवार यांना शरद पवार संधी देणार का? की अन्य दुसऱ्या फळीतील तरुण नेत्याला या पदावर बसवणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com