Kunal Kamra controversy : एखादा पक्ष, नेता सत्तेत असला की त्याची जबाबदारी वाढते. घटनात्मक पदावर बसलेल्या नेत्यांनी काळजीपूर्वक विधाने करणे अपेक्षित असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात भलतेच चित्र दिसू लागले आहे. घटनात्मक पदावर बसलेले नेते भान हरपल्यासारखे बोलू लागले आहेत. या गोंधळातच विधीमंडळाचे अधिवेशन पार पडले.
आता पुन्हा एकदा राज्यात गोंधळ सुरू झाला आहे तो कुणाल कामरा (Kunal Kamra) या स्टॅण्डअप कॉमेडिअनमुळे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तींवर टीका-टिपण्णी होतच असते. कधी कधी ती टीका अमर्याद अशी असते. अशी टीका सहन करणारे, त्याला शांतपणे उत्तर देणारे अनेक नेते राज्याने, देशाने पाहिले आहेत.
कुणाल कामरा यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात कोणाचेही नाव घेता विडंबन गीत सादर केले. त्यात दाढी, गद्दार, गुवाहाटी असे शब्द होते. कोणाचेही नाव घेतले नसले तरी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून होते, असा अर्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आणि त्यांनी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला त्या स्टुडिओची तोडफोड केली.
आता मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी कामरा यांना सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. कुणाल कामरा हे कोणत्याही बिळात लपून बसले असले तरी त्यांना शोधून काढणार, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत. ते एढ्यावरच थांबले नाहीत. कुणाल कामरा यांना थर्ड डिग्री देणार, त्यांना टायरमध्ये घालून मारणार, असा इशारा मंत्री देसाई यांनी दिला आहे.
याचा अर्थ स्पष्ट आणि सरळ आहे, तो म्हणजे मंत्री देसाई यांना कायदा, न्यायालय मान्य नाही, त्यावर विश्वास नाही. कामरा यांनी चूक केली असेल तर त्यांना कायद्याने व्हायची ती शिक्षा होईल. याबाबत कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र कामरा यांना टायरमध्ये घालून मारण्याचा अधिकार मंत्र्यांना कसा मिळतो, असा प्रश्न आहे.
कुणाल कामरा यांचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. सत्ताधाऱ्यांचा कायद्यावर विश्वास नाही किंवा ते कायद्याला जुमानत नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. कामरा यांनी शिंदे यांचे नाव घेतलेले नव्हते. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांचा उल्लेख गद्दार, असा केला जातो. शिवाय कामरा यांनी नाव न घेता शिंदे यांच्यासाठी वापरलेले शब्द यापूर्वी अनेकदा वापरून झालेले आहेत. ती शिवसेनेची भाषा आहे.
असे असताना कामरा यांनी विडंबन केल्यानंतरच शिंदे यांच्या शिवसेनेला इतका राग का बरे आला असेल? असाही प्रश्न पडला आहे. कामरा प्रकरणात शिंदे यांच्या शिवसेनेचे पाय वरचेवर खोलात जात आहेत. शिंदे आणि त्यांच्या नेत्यांनी समाजमनाचा कानोसा घेतलेला दिसत नाही. कामरा यांच्याविरोधात आक्रमक झालेली शिवसेना शिवराय आणि शंभूराजे यांचा अपमान झाला त्यावेळी शांत का होती? असा प्रश्न विरोधक आणि नेटिझन्सही मोठ्या प्रमाणात उपस्थित करू लागले आहेत.
शिवसेनेला शिवराय, शंभूराजेंचा अपमान सहन होतो, मात्र एकनाथ शिंदे यांचा अपमान सहन होत नाही, असा संदेश समाजात गेला आहे. त्यामुळे कामरा यांचे प्रकरण कायद्यावर सोडून देणे शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या हिताचे ठरले असते. मात्र, झाले उलटेच. शिंदेंच्या विविध भागांतील शिलेदांरानी कामरा यांना धडा शिकवण्याची भाषा सुरू केली. कामरा यांना चोप देण्याची भाषा खुलेआम सुरू झाली. शिवसेनेतून फुटल्यानंतर अशा प्रकारची टीका होणार, हे अपेक्षितच होते.
कामरा यांनी तर कोणाचेही नाव घेतलेले नाही. तरीही आता मंत्री शंभूराज देसाई यांनीही थर्ड डिग्री, टायरमध्ये घालून मारणार, अशी भाषा केली आहे. कामरा यांनी ज्या माध्यमातून टीका केली, तेच माध्यम त्यांना उत्तर देण्यासाठी वापरण्याची क्षमता शिंदे आणि त्यांच्या पक्षात नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घटनात्मक पदावर बसलेले नेतेही ठोकाठोकीची भाषा करू लागले आहेत.
महाराष्ट्राला समृद्ध अशी राजकीय परंपरा आहे. ती गेल्या काही वर्षांपासून धुळीस मिळाली आहे. सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल टोकाची टीका केली आहे, त्यांच्या आजाराला पुढे करूनही टीका केलेली आहे. मात्र शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पातळी सोडली नाही. गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सर्वाधिक विखारी टीका सहन करणारे नेते ठरले आहेत.
या नेत्यांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी टीका करणाऱ्यांना थर्ड डिग्री किंवा टायरमध्ये घालून मारण्याची भाषा केल्याचे ऐकिवात नाही. कुणाल कामरा यांचा शिंदे यांच्या शिवसेनेला इतका राग का आला आहे, असे कोडे राज्याला पडले आहे. शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा कामरा यांनी नाव न घेता केलेला उल्लेख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाव घेऊन अनेकवेळा केलेला आहे. त्या शब्दांची समाजमाध्यमांत अद्यापही चलती आहे.
कामरा प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी, लोकांना माझे काम पाहिले आहे, त्यामुळे माझ्या पक्षाने 80 जागा लढवून 60 जिंकल्या, असे वक्तव्य केलं आहे. तरीही त्यांचे नेते कामरा यांच्या 'पिच'वर जाऊन का खेळत आहेत? कामरा यांनी नाव घेऊन टीका केली असती तर मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया कशी असती?, असे प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.