Local Body Election 2025: कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ; आमदार-खासदारांची कसोटी

Maharashtra local elections 2025: लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषद ही नेत्यांची निवडणूक असली तरी जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, असे सांगितले जात असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील काही घराणे पाहिली तरी घरातच सर्व पदे भोगणारे होऊन गेले आहेत.
Local Body Elections
Local Body Electionssarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर लोकप्रतिनिधींचा विजय सोपा झाला. त्याच कार्यकर्त्यांची ऋण फेडण्याची संधी आता नेत्यांकडे चालून आली आहे. पहिल्या टप्प्यात आपल्या कार्यकर्त्यांसाठी उमेदवारी खेचून आणण्याची तयारी आमदार आणि खासदारांना ठेवावी लागणार आहे. तर निवडून आल्यानंतर त्याच कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर बसवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्य व केंद्र सरकार विरोधात वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी महायुतीच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागली. तर महाविकास आघाडीत खासदार शाहू महाराज छत्रपती उमेदवार असल्याने राजर्षी शाहू महाराज यांचा पैरा फेडण्याची संधी मतदारांना मिळाली. त्यामुळे आघाडीच्या बाजूने मतदाराने भरभरून मतदान केले. पण त्यांना देखील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच रस्त्यावर उतरावे लागले.

तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणूक झाल्याने लोकसभेतला बॅकलॉग महायुतीने विधानसभा निवडणुकीत भरून काढला. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी केले. मात्र या उमेदवारांना विजयी करण्यामागे कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा हात होता. एक ही पदाधिकारी महायुतीपासून दूर जाऊ नये यासाठी महामंडळ, देवस्थान समिती, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ, नगरपालिका नगरपंचायत, महानगरपालिका, पंचायत समितीचा शब्द दिला होता.

लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषद ही नेत्यांची निवडणूक असली तरी जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. असे सांगितले जात असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील काही घराणे पाहिली तरी घरातच सर्व पदे भोगणारे होऊन गेले आहेत. मात्र या संस्कृतीला आता छेद देत कार्यकर्त्यांचा पैरा फेडण्याची संधी आमदार आणि खासदारांपुढे आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतेच मतदार संघातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या माहोलात आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 68 मतदार संघांपैकी 19 मतदार संघातील आरक्षण हे सर्वसाधारण महिला झाल्याने ते चर्चेत आले आहेत.

कारण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला हे प्रवर्ग राखीव ठेवण्यात आला आहे. त्या संदर्भात लोकप्रतिनिधींची चाचपणी सुरू झाली असली यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, अशी शक्यता महायुतीच्याच गोटात निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महायुतीच्या तीनही पक्षांचा अध्यक्षपदावर डोळा आहे. त्यासाठीच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषदेची निवडणूक महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार? याबाबतची अधिकची स्पष्टता अद्याप नाही. मात्र लोकप्रतिनिधींनाच आता कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय संदर्भ पाहता मधल्या काळात घराणेशाही उफाळून आल्याचे चित्र होते. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे न जाण्याची मानसिकता लोकप्रतिनिधींची दिसते.

Local Body Elections
Pune Jain Boarding House Land: जैन बोर्डिंगचा जमिन व्यवहार रद्द झाल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय इतिहास पाहिला तर आजवर एकाच घरात गेलेली विविध पदांमुळे अनेकांना राजकीय फटका सहन करावा लागला आहे. 2014 ला राष्ट्रवादीतून खासदार झालेले धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार झाले. शिवाय अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक जिल्हा परिषदेला भाजपकडून अध्यक्ष झाल्या. गोकुळ दूध संघामध्ये सत्ता राहिली. आताही महाडिक यांच्याकडे गोकुळचे संचालक पद आहे. एकाच घरात सगळे पक्ष असताना या एकाच कुटुंबाकडे जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाची पदे गेल्याने त्याचा रोष जनतेमध्ये होता. त्याचा फटका 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर बसला.

तर यंदा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आहे. तर पुत्र नवीद मुश्रीफ यांच्याकडे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष पद आहे. ते स्वतः कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार असल्याने त्यांच्याकडून ही कार्यकर्त्यांसाठी ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाचे अध्यक्षपद अपघाताने मिळाले असले तरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आता संधी मिळावी, अशी मानसिकता सध्या मुश्रीफ यांची दिसते.

तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्याकडे विधान परिषदेचे पद आहे. त्याचबरोबर मागील निवडणुकीत माजी आमदार ऋतुराज पाटील हे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूरचे नगराध्यक्ष झाले आहेत. इचलकरंजीचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र आमदार राहुल आवाडे हे सध्या विधानसभा सदस्य आहेत. माजी आमदार के पी पाटील यांचे पुत्र गोकुळमध्ये संचालक आहेत. तर आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके हे देखील गोकुळ मध्ये संचालक आहेत.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची देखील हीच परिस्थिती आहे. स्वतः राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर बंधू अर्जुन आबिटकर हे कोल्हापूर जिल्हा बँकेला संचालक आहेत. तर भावजय रोहिणी आबिटकर यांनी पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघातून प्रतिनिधित्व केले आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यांची राजकीय सोय करण्याची संधी आता या लोकप्रतिनिधी पुढे चालून आले आहे. राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना दुभंगल्यानंतर कार्यकर्त्यांचे कोण? असा प्रश्न विचारायची वेळ कार्यकर्त्यांवर निर्माण झाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात लोकप्रतिनिधींनीच चाचपणी सुरू केली आहे. काही मतदारसंघात आमदार खासदारांनीच आता चाचपणी सुरू केली आहे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे चित्र पहिले तर अनेक गट हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यांच्या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी अर्जुन आबिटकर यांचा मतदार संघ सेफ आहे. पण सर्वच पदे घरात घेण्यापेक्षा एखाद्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा विचार सध्या तरी दिसतो. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसैनिक नेहमीच आग्रही राहील, असे चित्र सध्या तरी दिसते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात देखील काही जिल्हा परिषदेचे मतदार संघ हे महिला सर्वसाधारण रक्षण पडलेले आहेत. त्यामध्ये गिजवणे, चिखली, बोरवडे या मतदारसंघाचा समावेश आहे. सतीश पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांच्या पत्नी, किंवा त्यांच्या मातोश्री रिंगणात उतरल्यास मंत्री मुश्रीफ देखील जिल्हाध्यक्ष पदावर यांच्यासाठी आग्रही राहू शकतात.

तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील त्यांनी देखील कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे. तत्कालीनचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांना काँग्रेसमध्ये घेऊन आल्यानंतर गारगोटी जिल्हा परिषद मतदार संघातून त्यांच्या पत्नी रेश्मा देसाई या रिंगणात उतरू शकतात. शिंगणापूर येथून रिंगणात उतरणाऱ्या माजी शिक्षण सभापती रसिका अमर पाटील यांच्यासाठी आग्रही असतील. तर आगामी विधानसभा निवडणूक आणि गोकुळची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करवीर विधानसभा मतदारसंघातून अनेकांसाठी त्यांची प्रयत्न राहतील. अंदाज सध्या तरी दिसतो.

पक्षांतर कळीचा मुद्दा, सत्ताधाऱ्यांची अडचण

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीत जाणे पसंत केले. यात राष्ट्रवादीतून जाणारे माजी आमदार के. पी. पाटील आघाडीवर होते. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवली. मात्र निवडणूक लढवत असताना अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीचे शब्द दिले आहेत. मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांची पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी झाली. त्यामुळे ज्यांनी शब्द दिला तेच नेते इतर पक्षात गेल्याने आघाडीतील कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. शिवाय ते ज्या पक्षात गेले आहेत. तेथील सत्ताधाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. तर विधानसभा निवडणूक काँग्रेस मधून लढलेले राहुल पाटील यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कारण महायुती म्हणून लढत असताना जागावाटप आणि उमेदवारीवरून नेत्यांची कसरत होणार आहे.

19 जागांवर महिला राज

यंदा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद सर्वसाधारण महिला जागांसाठी राखीव झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६८ पैकी जवळपास 19 जागांवर सर्वसाधारण महिला प्रवर्ग राखीव झाले आहे. यामध्ये आंबार्डे, यवलुज, कुंभोज, कोरोची, दत्तवाड, बोरवडे, चिखली, कळंबे तर्फ ठाणे, शिंगणापूर सांगरूळ, तिसंगी, कसबा तारळे, सरवडे, गारगोटी, पिंपळगांव, कडगांव खुला, गिजवणे, कुदनूर यासह आणखीन दोन मतदारसंघांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com