Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यातील कमी टक्क्याने कोणाची दांडी होणार गुल ? राज्यातील दिग्गज नेत्यांची लागणार कसोटी

Political News: चौथ्या टप्प्याच्या प्रचारासाठी उडालेला आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा खाली बसल्यानंतर सोमवारी राज्यातील 11 मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत अनेक मात्तबर मंडळींची कसोटी लागणार आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Election Sarkarnama

चौथ्या टप्प्याच्या प्रचारासाठी उडालेला आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा खाली बसल्यानंतर सोमवारी राज्यातील 11 मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. या चौथ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत अनेक मात्तबर मंडळींची कसोटी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्याच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील मतदानाचा टक्का घसरला. रात्री 12 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सरासरी 59.64 टक्के मतदान झाले. राज्यातील 11 मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदान बीडमध्ये 69.74 टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान पुण्यात 51.25 टक्के झाले.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पुण्यात टक्केवारीत अल्पशी वाढ झाली आहे तर मावळ, शिरूर मतदारसंघात मत टक्का घसरला आहे. शिरूरमध्ये 51.46 टक्के तर मावळमध्ये 52.90 टक्के मतदान झाले. देशातील 17 राज्यातील 16 मतदारसंघात 66 टक्के मतदान झाले. त्यामध्ये सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी मतदान जम्मू काश्मीरमध्ये झाले. (Lok Sabha Election 2024 news)

Lok Sabha Election
Beed Lok Sabha News : बीडमध्ये तुतारी की कमळ ? राजकीय विश्लेषकांचे म्हणणे काय...

राज्यात गेल्या तीन टप्प्यातही मतदान कमी झाले आहे. पहिल्या टप्प्यात 63.71 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के तर तिसरा टप्प्पा 63.55 टक्के तर चौथ्या टप्प्यात 59.64 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जास्त मतदान झाले असले तरी चौथ्या टप्प्यातील या कमी टक्क्याने कोणाची दांडी होणार गुल ? राज्यातील दिग्गज नेत्यांची लागणार कसोटी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

लोकसभेचे पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या मतदानावेळी उष्णतेच्या लाटेचा मतदारांना सामना करावा लागला होता. परंतु सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी राज्यातील विविध भागात गारपिटीचा अवकाळी पावसाचा सामना नागरिकांना करावा लागला. त्याचा परिणाम मतदानावर झाला आहे. पावसाचा अंदाज घेत मतदानासाठी बाहेर पडण्याचे आव्हान नागरिकासमोर होते. त्यामुळे मताचा टक्का घसरल्याची चर्चा आहे.

पुणे मतदारसंघात भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या मुख्य लढत होत आहे. शिरुर मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar)यांच्या गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरोधात अजित पवार (Ajit Pawar) गटात आलेले शिवाजीराव आढळराव पाटील गेल्या पराभवाचा वचपा काढणार का? याकडे लक्ष लागले आहे. मावळ मतदारसंघात महायुतीचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर मतदारसंघात भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नीलेश लंके अशी चुरशीची लढत होत आहे. शिर्डी मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसच्या उत्कर्षा रुपवते या ठिकाणी मैदानात उतरल्या आहेत.

मराठवाड्यातील बीड मतदारसंघात भाजपने प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून यंदा पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना मैदानात उतरवले आहे. छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) हा मतदार संघामध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांची एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, महायुतीचे संदीपान भुमरे यांच्यात लढत होत आहे. तर जालना मतदारसंघात सलग सातवेळा निवडून आलेले भाजपचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सामना कॉंग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्याशी होणार आहे.

रावेर मतदारसंघातून भाजपच्या खासदार रक्षा खडसे विरोधात शरद पवार गटाचे उद्योजक श्रीराम पाटील रिंगणात आहेत. तर जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात ठाकरे गटाचे करण पवार अशी लढत होत आहे. तर नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी अशी लढत होत आहे. या सर्व चुरशीच्या लढतीसाठी सोमवारी मतदान झाले असून निकाल 4 जूनला लागणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Lok Sabha Election
Mawal Lok Sabha Election : पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत कमी मतदान; फटका कोणाला, वाघेरे की बारणे ?

चौथ्या टप्प्यातील या निवडणुक प्रचारात कुठल्याच विकासात्मक मुद्दयांवर ही निवडणूक होत नसल्याने विकासाचे मुद्दे हरवलेले दिसत आहेत. त्यामुळे राजकीय नेते विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांवर सभेतून चिखलफेक करताना दिसत आहेत. भाजपकडून असली शिवसेना व नकली शिवसेना म्हणत सेना नेते उद्धव ठाकरेंना डिवचत आहेत. तर दुसरीकडे या आरोपांवर उत्तर देण्यातच शिवसेनेचा बराचसा वेळ जात आहे. त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे भरकटलेली दिसत आहे.

आतापर्यंत या निवडणुकीत मतदानाचे एक एक टप्पे करीत चार टप्पे पूर्ण झाले आहेत. आता एक टप्पा राहिला आहे. त्यामध्ये उर्वरित टप्प्यानुसार निवडणुकीतील मुद्दे आता बदलणार आहेत. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत तर विरोधक या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची संधी असताना हे मुद्दे मांडत नाहीत.राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली आहे. या पाच वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले तर काँग्रेसमधील बरेच नेते भाजपने फोडले. त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे.

चौथ्या टप्प्यात देशातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 380 म्हणजे जवळपास 70 टक्के मतदार संघातील मतदान आता पार पडले आहे. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये केवळ 163 मतदारसंघ शिल्लक राहणारा आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पहिल्या तीन टप्प्यातील आकडेवारी पाहता कमी मतदान झाले आहे. त्यामुळे हा घटलेला टक्का कोणाच्या मदतीला येणार व कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होत आहे.

Lok Sabha Election
Pune Lok Sabha Election 2024 Voting LIVE: पुण्यात 'या' सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

सोमवारी चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी 59.64 टक्के मतदान झाले आहे. गेल्या 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले आहे, तर दुसरीकडे 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. त्यामुळे हा कमी झालेल्या मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा हे समजून येण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी झालेले मतदान

2019 2024

नंदुरबार 68.65% 67.12%

जळगाव 56.55% 53.65%

रावेर 61.77% 61.36 %

बीड 66.17% 69.74%

जालना 64.75% 68.30%

औरंगाबाद 63.55% 60.73%

मावळ 59.59% 52.90%

पुणे 49.89% 51.25%

शिरूर 59.44% 51.46%

अहमदनगर 64.79% 62.76%

शिर्डी 64.93% 61.13%

Lok Sabha Election
Loksabha Election Voting : पुणे, शिरुर अन् मावळमध्ये कोण बाजी मारणार? जाणून घ्या, किती झाले मतदान!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com