
Mumbai News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारने सरकार स्थापनेला १०० दिवसाचा कालावधी झाल्यानंतर लांबणीवर पडलेल्या विधिमंडळाच्या समित्यांचे वाटप करण्यात आले. त्यातच विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच समिती येणार होती. त्यासाठीचा फॉर्म्युलाही विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ठरला होता. मात्र, आघाडीच्या वाट्याला आलेल्या एकमेव ‘लोकलेखा समिती’वरून नाराजी दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘महाविकास आघाडी’त समन्वय नसल्याचे चव्हाट्यावर आले आहे.
महाविकास आघाडीचे (MVA) विधानसभेत एकूण 46 आमदार आहेत. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार आहेत. हे संख्याबळ लक्षात घेऊनच महाविकास आघाडीतील तीन मुख्य पक्षांमध्ये पदांचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये दोन्ही सभागृहाच्या संयुक्त 15 समित्या, विधानसभेच्या 8 समित्या, 6 तदर्थ समित्या अशा 29 समित्यांचा समावेश आहेत. विरोधी पक्षाकडे देण्यात येणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नाराजी दिसून येत आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला (Congress), विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला (उद्धव ठाकरे) आणि लोकलेखा समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) असे महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरले होते. मात्र, ऐनवेळी लोकलेखा समितीचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी उघडपने नाराजी व्यक्त केली आहे.
‘लोकलेखा समिती’च्या अध्यक्षपदावरून विरोधकातच समन्वय दिसून येत नाही. काँग्रेसच्या वाट्याला हे पद आल्याने नाराजी विरोधी बाकावर असलेल्या ‘महाविकास आघाडी’त समन्वय नसल्याचे पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. राष्ट्रवादीतून या समितीच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते जयंत पाटील इच्छुक होते. त्यासोबतच राेहित पवार यांनीसुद्धा लोकलेखा समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे या दोघापैकी एक जणांची वर्णी लागेल असे वाटत होते. मात्र, हे पद या दोघांच्या वाट्याला न येता काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने नाराजी अधिक आहे. विजय वडेट्टीवार यांना लोकलेखा समिती देऊन काँग्रेसला शांत करण्याचा प्रयत्न झाला असला तरी इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये विरोधकांना स्थान मिळाले नसल्याने नाराजी कायम आहे.
विरोधकांसाठी लोकलेखा समिती सरकारी उधळपट्टी व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचे महत्वाचे आयुध आहे. परंतु समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्याने राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीत राहून विरोधी पक्षनेतेपद हुकलेले काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सत्ताधारी महायुती सरकारने विधिमंडळाच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. या पदाला कॅबिनेट मंत्री दर्जा असतो, मात्र विद्यमान सरकारने तो दिला आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांना स्वतंत्र कार्यालय आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा काफिला मिळणार हे निश्चित झाले आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या हाती लोकलेखा समिती आल्यामुळे सरकारच्या आर्थिक निर्णयांवर टीकेचा भडिमार होण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीने आपले वर्चस्व दाखवले असले तरी विरोधकांनीही काही प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे या समित्यांच्या कामकाजातून राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे येत्या काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.