Madhi Kanifnath Yatra: सीएम फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा झोपेचं सोंग बाजूला सारतील का..?

विधानसभा निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे' या भाजपच्या घोषणेचा अजितदादांनी विरोध केला होता. निवडणूक झाली, आपले काम भागले अशा भूमिकेतून अजितदादांनी जगताप यांना आता 'फ्री हँड' दिला आहे का? असा प्रश्न आहे.
 Madhi Kanifnath Yatra news
Madhi Kanifnath Yatra newsSarkarnama
Published on
Updated on

भाजपचे मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे सातत्याने दोन समाजांत तेढ निर्माण करत आहेत, तेढ निर्माण करणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. दैनंदिन जीवनमरणाच्या प्रश्नांसोबत संघर्ष करणाऱ्या समाजाला ते द्वेषाच्या आगीत ढकलत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना हेच हवे आहे का? असा प्रश्न आहे.

देशाच्या, समाजाच्या प्रगतीसाठी शांततामय सहजीवनाची गरज असते. किंबहुना, प्रगतीसाठी, गुंतवणूक येण्यासाठी समाजात शांतता असणे, ही पहिली अट असते. प्रचंड बहुमताने सत्तेवर स्वार झालेल्या महायुतीतील काही नेत्यांना समाजात शांतता नको आहे, असे दिसत आहे. ध्रुवीकरण कसे होत राहील, वातावरण कसे पेटत राहील, असा प्रयत्न भाजपच्या एका मंत्र्याकडून सातत्याने केला जात आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका आमदारानेही आता यात उडी घेतली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी ग्रामपंचायतीने एक ठराव घेतला. त्यानुसार मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेत मुस्लिम विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. असा ठराव घेतल्यानंतर खरेतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खडबडून जागे व्हायला हवे होते. पण तसे झाले नाही. मतांसाठी आणि सत्तेसाठी घटनात्मक पदावरील हे तिघेही, सर्वांना समान वागणूक देणार अशी संविधानातील शपथ घेतलेले हे तिघेही शांत राहिले. हा ठराव बेकायदेशीर होता, राज्यघटनेतील कलमांच्या विरोधात होता. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तो रद्द केला.

 Madhi Kanifnath Yatra news
Walmik Karad News: मुंडेंच्या राजीनाम्यानंतर SIT च्या तपासाला वेग; वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात

त्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे आणि अहिल्यानगर येथील अजित पवार यांचे आमदार संग्राम जगताप यांनी मढी येथे जाऊन सभा घेतली. मढी ग्रामपंचायतीने पुन्हा ठराव करावा, गटविकास अधिकाऱ्यांकडे मी पाहतो, अशी धमकी मंत्री राणे यांनी दिली. मढी ग्रामपंचायतीने घेतला तसा निर्णय राज्यभरात घेतला जाईल, असा इशाराही राणे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हेही राणेंइतकेच आक्रमक झाले. मढी ग्रामपंचायतीचा निर्णय योग्यच आहे, ही सुलेमानी वळवळ ठेचायला पाहिजे, असे ते म्हणाले.

मंत्रिमंडळात समावेश झाला त्यावेळी नितेश राणे यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. सर्वांना समान वागणूक देईन, भेदभाव करणार नाही, असा त्याचा आशय असतो. आमदारांनाही अशाच प्रकारची शपथ दिली जाते. मंत्री नितेश राणे यांना संविधान मान्य नाही, हे त्यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून सिद्ध झालेले आहे. त्यात आता अजितदादांच्या आमदाराचीही भर पडली आहे. विधानसभा निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे' या भाजपच्या घोषणेचा अजितदादांनी विरोध केला होता. निवडणूक झाली, आपले काम भागले अशा भूमिकेतून अजितदादांनी आमदार जगताप यांना आता 'फ्री हँड' दिला आहे का? असा प्रश्न आहे.

 Madhi Kanifnath Yatra news
BSP Chief Mayawati: IAS बनण्याचे स्वप्न अपूर्ण, पण IAS अधिकारी त्यांना करीत होते 'सलाम'; मायावतींचा राजकीय प्रवास जाणून घ्या!

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. देशमुख यांना करण्यात आलेल्या अमानुष, क्रूर मारहाणीची छायाचित्रे समोर आली आणि महाराष्ट्र पुन्हा हादरून गेला. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. देशमुख यांच्या हत्येमध्ये मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आरोपी आहेत. खरेतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळीच मुंडे राजीनामा देतील, असे वाटले होते, मात्र तसे झाले नाही. समाजमनाचा कानोसा घेण्यात आला. सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात राग असल्याची जाणीव झाल्यानंतर राजीनामा घेण्यात आला.

एका घरात दोन भाऊ राहत असले तरी त्यांच्यात वाद होत असतात, तसेच वाद हिंदू-मुस्लिम समाजातही होत असतात. सर्वच मुस्लिम आणि सर्वच हिंदूंना असे वाद निर्माण करायचे नसतात. एकाने चूक केली म्हणून संपूर्ण मुस्लिम किंवा हिंदू समाजाला दोषी कसे धरता येईल? देशात हिंदू आणि मुस्लिम शेकडो, हजारो वर्षांपासून एकत्र राहत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिमही लढले आहेत. सत्तेसाठी अनेक पक्ष फिरून आलेल्या नितेश राणे आणि अजितदादांचे आमदार संग्राम जगताप यांना मात्र या दोन समाजांत तेढ निर्माण करून आपली पोळी भाजायची आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची परवानगी असल्याशिवाय राणे आणि जगताप अशी वादग्रस्त विधाने करूच शकत नाहीत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जे राज्यकर्ते आहेत, कुटुंबप्रमुख आहेत त्यांनाच घरामध्ये फूट पाडून वाद पेटवायचा आहे, असा याचा अर्थ आहे. असे करण्यासाठी राज्यघटना त्यांना परवानगी देते का? केरळमधील भाजपच्या एका नेत्याला 'हेट स्पीच'प्रकरणी न्यायालयाने दणका दिला आहे. पी. सी. जॉर्ज असे या नेत्याचे नाव असून, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राणे, जगताप यांना हे माहित आहे का? प्रचंड बहुमत असूनही महायुती सरकारला आतापर्यंत तरी चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही. परभणीतील सोमनाथ सूर्यंवशी यांच्या कोठडीतील मृत्यूचे प्रकरण मागे पडले आहे. संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यास विलंब लावल्यामुळे सरकारची नाचक्की झाली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. महिलांवर दुष्कर्माच्या घटनांनीही महाराष्ट्र हादरून गेला आहे. सरकारचे हे अपयश झाकण्यासाठी राणे, जगतापांना मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सूट दिली असेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेजाऱ्याच्या घराला आग लागली तर आपलेही घर सुरक्षित राहत नाही, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. आपली पोळी भाजून घेण्यासाठी काही राजकीय नेते पेटवापेटवी करतच राहणार आहेत. या पेटवापेटवीत त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

नुकसान होईल ते दोन्ही समाजांतील सामान्य लोकांचे. राणे, जगताप यांचा, त्यांच्या राजकीय पक्षांचा फायदाच होणार आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावे. मंत्री राणे, आमदार जगताप यांच्याविरोधात कुणीतरी तक्रार घेऊन येईल, याची प्रतीक्षा न्यायालय करत असेल का? त्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपेचे सोंग बाजूला सारतील का, याची प्रतीक्षा शांतताप्रिय नागरिकांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com