
Mahadev Jankar Political Journey : महायुतीमधून बाहेर पडून महादेव जानकर यांनी काँग्रेसशी जवळीक साधली आहे. मे महिन्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रम आयोजित केला जाणार होता त्या कार्यक्रमाचे निमंत्रण महादेव जानकर यांनी राहुल गांधींना त्यांच्या घरी जाऊन दिले. राहुल गांधींच्या स्वागताने आणि पाहुणचाराने जानकर भारवले होते. विधानसभा निवडणूकीत भाजपशी फारकत घेत जानकरांचा पक्ष स्वबळावर लढला होता. 100 पेक्षा अधिक जागांवर जानकर यांनी उमेदवार उभे केले होते.
भाजपशी फारकत घेतल्यानंतर जानकर यांची वाटचाल काँग्रेससोबत युती करण्याची दृष्टीने होत असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. जानकर यांनी भाजपवर उघड टीका करतो भाजप आपल्या मित्र पक्षांना संपवतो. आता त्यांना आमची गरज राहिली नसल्याचे म्हटले. सत्तेत असलेल्या भाजपशी वैर घेण्याचे जानकरांचे कारण म्हणजे त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महादेव जानकर हे वंचित घटकाचे राजकारण करत असल्याचे सांगतात. मुख्यता त्याचा मतदार हा धनगर समाज आहे. 2011 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या तब्बल 1 कोटी आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात धनगर समाजाची संख्या ही 9 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 30 ते 35 विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान प्रभावशिल ठरते.
जानकर यांच्या पक्षाचे राजकारणाचा मुख्य स्तंभ धनगर समाज होता. तो स्तंभच भाजपने पळवला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या रुपाने भाजपकडे आक्रमक धनगर नेतृत्व आहे. राम शिंदे हे विधानसभेला पराभूत झाल्यानंतर देखील त्यांना विधान परिषदेचे आमदार करत त्यांना विधान परिषदेचे अध्यक्ष देखील भाजपने केले. धनगर समाजातील नेतृत्वाला भाजपने दिलेली ही संधी धनगर मतदारांना आकृष्ट करत आहे.
विधानसभेमध्ये धनगर समाज हा पूर्णपणे भाजपच्या मागे उभा राहिलेला दिसतोय. 100 पेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या जानकरांच्या पक्षाला अवघी एक जागा मिळाली. जी एक जागा मिळाली आहे तो आमदार देखील भाजपसोबतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आमला मतदार भाजपने पळवला याची पूर्ण जाणीव जानकर यांना आहे.
जानकर हे महायुतीचे उमेदवार म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघातून लढले होते मात्र त्यांचा पराभव झाला. जानकर यांना विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी शक्यता विधानसभा निवडणुकीच्या आधी वाटत होती. मात्र, भाजपने जानकर यांना विधान परिषदेची संधी न देता गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर घेतले होते. त्यामुळे विधानसभेला जानकर यांचा पक्ष स्वतंत्रपणे लढले.
महादेव जानकर यांचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कांशीराम यांच्या बसपामधून झाली. पुढे त्यांनी यशवंत सेना स्थापन केली. 2003 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला विरोध करत त्यांनी आपले राजकारण सुरु केले. शरद पवार हे त्यांच्या निशाण्यावर होते. मात्र, आता राजकीय गणित बदलली आहे. बलशाली भाजपसोबत एकट्याने लढणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे आघाडीसोबत जाऊन पक्षाचे अस्तित्व टिकवणे हे त्यांची प्राथमिकता आहे.
महादेव जानकर यांनी पहिल्यांदा 1998 मध्ये नांदेड लोकसभा निवडणूक बसपाच्या तिकीटावर लढली होती. त्यांना तेव्हा फक्त 20 हजार मते मिळाली होती. पुढे आपला राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत 38 उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत त्यांना पक्षाला 0.35 टक्के मते मिळाली होती.
लोकसभा निवडणुकीत जानकर स्वतः माढा मतदारसंघात शरद पवार यांच्या विरोधात लढले होते. त्यांचा माढात पराभव झाला मात्र त्यांनी एक लाखापेक्षा अधिक मते घेतली होती. ती चर्चेचा विषयी ठरली होती. 2014 लोकसभा निवडणूक ते बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढले होते. त्यांना 69 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. तर, 2024 मध्ये ते परभणीमधून लढले. 2014 आणि 2024 मध्ये ते भाजपप्रणित युपीएचे उमेदवार होते. 2015 मध्ये जानकर हे विधान परिषदचे सदस्य झाले होते. युती सरकारमध्ये ते पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्सविभागाचे मंत्री देखील होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.