Madhavrao Scindia : वयाच्या 26 व्या वर्षी खासदार, अटलजींचाही केला होता पराभव

Remembering Madhavrao Scindia, Maharaja of Gwalior : राजघराण्यात जन्माला आलेल्या माधवराव शिंदे यांनी देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिंदे कुटंबातील सर्वात प्रभावशाली असलेल्या या नेत्याला मुख्यमंत्रि‍पदाला मात्र गवसणी घालता आली नव्हती. तरुण वयात असतानाच 23 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.
Remembering Madhavrao Scindia, Maharaja of Gwalior
Remembering Madhavrao Scindia, Maharaja of GwaliorSarkarnama
Published on
Updated on

वयाचे 56 वे वर्ष हे काही जग सोडून जाण्याचे नसते. याच वयात असलेल्या, देशाच्या राजकारणात आपली छाप पाडलेल्या एका नेत्याला काँग्रेसने गमावले. नऊ वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्या या नेत्याने केंद्रात विविध मंत्रिपदे भूषवली. विशेष म्हणजे, देशातील सर्वाधिक प्रभावशाली नेत्यांपेकी एक असलेले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही त्या नेत्याने पराभव केला होता. होय, माधवराव शिंदेच ते! वयाच्या 56 वर्षी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2001.

माधवराव शिंदे यांचा जन्म 10 मार्च 1945 रोजी मुंबईत मराठी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंबिय संस्थानिक होते. त्यांचे वडील जिवाजीराव शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे शेवटचे संस्थानिक होते. जिवाजीराव यांचे 1961 मध्ये निधन झाले. पुढे केंद्र सरकारने मध्ये संस्थाने खालसा केली. दरम्यान, माधवराव शिंदे यांनी शालेय शिक्षण ग्वाल्हेरमधील सिंधिया स्कूलमधून पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनला गेले. तेथील ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले.

माधवरावल शिंदे यांच्या मातुःश्री विजयाराजे या राजकारणात सक्रिय होत्या. शिक्षण संपवून ब्रिटनहून परतल्यानंतर शिंदे यांनीही राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1971 मध्ये गुना मतदारसंघातून जनसंघाच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला. तत्पूर्वी, 1966 मध्ये त्यांचा विवाह माधवीराजे यांच्याशी झाला. माधवीराजे याही राजघराण्यातील होत्या. त्यांचे आजोबा जुद्ध शमशेर जंग बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते. आता भाजपमध्ये असलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे माधवराव शिंदे यांचे पुत्र आहेत. त्यांना चित्रांगदा नावाच्या एक कन्याही आहेत. मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या वसुंधराराजे शिंदे या माधवराव सिंधिया यांच्या भगिनी आहेत.

देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर माधवराव शिंदे हे ब्रिटनला गेले. आणीबाणी उठवल्यानंतर ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी जनसंघाचा राजीनामा दिला आणि गुना मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आणीबाणीमुळे जनतेमध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचंड राग होता आणि जनता पार्टीच्या बाजूने लोकमत तयार झालो होते. अशा वातावरणातही ते विजयी झाली. पुढे 1980 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि गुना मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला.

Remembering Madhavrao Scindia, Maharaja of Gwalior
Sharad Pawar : शरद पवार देणार भाजपला दुसरा धक्का; बडा नेता गळाला?

भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे 1984 मध्ये ग्वाल्हेर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अटलजींच्या समोर कोणता उमेदवार टिकेल, याबाबत काँग्रेसमध्ये बराच खल झाला होता. अनेक दिवस चाचपणी करण्यात आली. शेवटच्या क्षणी माधवराव शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यांना उमेदवारी देण्यात आली. सिंधिया यांना त्या निवडणुकीत अटलजींचा पराभव केला होता. त्यापुढील दोन निवडणुका शिंदे यांनी ग्वाल्हेर मतदारसंघातून लढवल्या आणि जिंकल्याही होत्या. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

माधवराव शिंदे यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. गांधी कुटुंबियांचे निष्ठावंत असूनही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याची त्यांची संधी दोनदा हुकली होती. मातुःश्री विजयाराजे शिंदे यांच्याशी त्यांचे मतभेद होते. विजयाराजे यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधूनच सुरू झाली होती, मात्र नंतर त्यांनी जनसंघात प्रवेश केला. ब्रिटनहून परतल्यानंतर माधवराव यांनी जनसंघात प्रवेश केला होता. आपला तो निर्णय चुकीचा होता, असे ते नंतर म्हणाले होते. राजकीय, कौटुंबिक कारणांमुळे आई आणि मुलामध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. त्यातूनच विजयाराजे यांनी आपल्या अंत्यसंस्काराचा अधिकार माधवराव यांना नाकारला होता.

Remembering Madhavrao Scindia, Maharaja of Gwalior
Supriya Sule: तुम्ही त्यांना मतदान केलं तर तुम्हाला सौ खून माफ; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा

माधवराव शिंदे (Madhavrao Scindia) यांना केंद्रात विविध मंत्रिपदे भूषवण्याची संधी मिळाली. उत्तम प्रशासक अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. रेल्वेमंत्री असताना त्यांनी या खात्यात संगणकीकरणावर भर दिला. मानव संसाधन विकास मंत्री, पर्यटन मंत्री म्हणूनही काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची संधी त्यांच्याकडे दोनवेळा चालून आली होती, मात्र दोन्हीवेळा ती संधी हुकली. मध्यप्रदेशात 1989 मध्ये लॉटरी घोटाळा झाला होता. त्यावेळी अर्जुनसिंह हे मुख्यमंत्री होते. त्यांना हटवून शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची होती. मात्र अर्जुनसिंह यांनी राजीनामाच दिला नव्हता.

यानंतर आणखी एक वेळ अशी आली होती की शिंदे हे जवळपास मुख्यमंत्री बनणारच होते, मात्र त्यावेळीही संधी हुकली होती. बाबऱी मशिदीचा 1992 मध्ये विध्वंस करण्यात आला, त्यानंतर मध्य प्रदेशातील सुंदरलाल पटवा यांचे सरकार बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर 1993 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. माधवराव शिंदे, श्यामाचरण शुक्ल, सुभाष यादव हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. असेही सांगितले जाते, की त्यावेळी दिल्ली विमानतळावर शिंदे यांच्यासाठी एक विमान राखीव ठेवण्यात आले होते, कारण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी त्यांना कोणत्याही क्षणी भोपाळला जावे लागणार होते. मात्र घडले वेगळेच. पी. व्ही. नरसिंहराव यांनी दिग्विजय सिंह यांना मुख्यमंत्री बनवले होते.

तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी शिंदे यांच्यावर 1996 मध्ये लाचखोरीचा आरोप केला होता. त्यानंतर शिंदे यांनी काँग्रेस सोडली आणि मध्य प्रदेश विकास काँग्रेस या पक्षाची स्थापना केली होती. 1998 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. त्याचवर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी गुना मतदारसंघातून विजय मिळवला होता.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) या विदेशी असून त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारू नये, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये 1999 मध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी जी नावे चर्चेत आली होती, त्यात शिंदे यांचाही समावेश होता. त्याच संदर्भाने कानपूर येथे आयोजित एका जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी ते विमानाने निघाले होते. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात त्यांच्या विमानाने पेट घेतला आणि दुर्घटना घडली. त्यात माधवराव शिंदे यांचा मृत्यू झाला. शिंदे यांच्यासह विमानातील सर्व आठजणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

Remembering Madhavrao Scindia, Maharaja of Gwalior
Sanjay Raut : 'सुरत' की 'गुवाहाटी'; राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना दसरा मेळाव्याची ठिकाणं सांगितली

माधवराव शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य यांनी त्यांचा राजकीय वारसा चालवला. ज्योतिरादित्य शिंदे या हे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. मात्र मध्य प्रदेशातील काँग्रेस अंतर्गत राजकारणातील वादातून ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते केंद्रीय मंत्री आहेत. माधवराव शिंदे यांच्या मातुःश्री विजयाराजे याही भाजपमध्ये होत्या. त्यांच्या भगिनी वसुंधराराजे सिंधिया भाजपमध्ये असून त्यांनी दोनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. शिंदे कुंटुबात माधवराव हे सर्वात प्रभावी राजकारणी होते. त्यांनी अटलजींचा पराभव केला, केंद्रात त्यांना मंत्रिपदे मिळाली, मात्र ते मुख्यमंत्रिपदाला गवसणी घालू शकले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com