गेल्या पाच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यातील महत्वाच्या प्रादेशिक पक्षांत फूट पडली. यासाठी भाजप कारणीभूत असल्याचा महाराष्ट्राचा समज झाला आहे. फुटून बाहेर पडलेल्या पक्षांतील नेत्यांच्या वाट्याला आतापर्यंत आशाही आली, निराशाही आली. काहीजणांनी मन मोकळे केले. काही जणांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण झाली आहे. येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो, यावर या पक्षांचे भवितव्य अवलंबून असेल.
पक्षफुटीनंतर शिवसेनेला लागलेली गळती लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरूच राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही असेच झाले. याचप्रमाणे फुटून बाहेर पडण्यासाठीची वेगवेगळी कारणे अखेरपर्यंत देण्यात आली. आता या सर्वांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे घालमेल सुरू झाली असणार. बाहेर पडलेल्या पक्षांतील नेत्यांमध्येही अनेकवेळा अंतर्विरोध दिसून आले. मंत्रिपदासाठी अनेकांची घालमेल झाली, मात्र काहीजण अद्यापही त्यापासून वंचित राहिले. मंत्रिपद मिळत नसल्याने काही नेत्यांनी हास्यास्पद विधाने केली. यापलीकडे ते काहीच करू शकले नाहीत. कारण आता फुटून कुठे जाणार? कुठे गेले असते तर लोकांच्या नजरेत आहे ती किंमतही संपून गेली असती.
रवींद्र वायकर (Rabindra Waikar) आणि गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar)यांची प्रकरणे ताजी आहेत. तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यामुळे रवींद्र वायकर यांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांना महायुतीने उमेदवारी दिली. वायकर हे अनिच्छेने शिंदे गटात गेले होते का, असा प्रश्न त्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झाला आहे. "माझ्यासमोर दोनच मार्ग होते, पहिला- शिंदे गटात जाण्याचा आणि दुसरा-कारागृहात जाण्याचा," असे वायकर म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागणारेच होते, कारण ते लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच आले होते. विरोधक आणि लोक जे बोलतात त्याला पुष्टी मिळेल, असेच वक्तव्य रायकर यांनी केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निश्चितच कोंडी झाली असणार.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांची अडचण झाली. पक्षाचा प्रचार करायचा की पुत्राचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. ठाकरे गटाकडून पुत्राला उमेदवारी दिली गेल्यामुळे गजानन कीर्तिकर यांच्यावर शिंदे गटातून संशय घेतला जाणे साहजिक होते. त्यातून मग ठिणग्या उडू लागल्या. गजानन किर्तीकर यांनी पक्षाचा प्रचार केला नाही, मुलाला अप्रत्यक्ष मदत केली, असा संशय त्यांच्यावर घेतला जाऊ लागला. प्रत्यक्षात, गजानन किर्तीकर हे तटस्थ राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिंदे सेनेत आपण एकटे पडल्याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी ती जाहीरपणे बोलून दाखवली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता गजानन किर्तीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरू झाली आहे. शिशिर शिंदे यांनी तसे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी चर्चा आहे. कारवाई काय तर, किर्तीकर यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी केली जाऊ शकते. गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्यात मंत्री राहिलेले आहेत. मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार, मालाड विधानसभा मतदारसंघाचे ते आमदारही राहिलेले आहेत. त्यांचे वय आता 80 वर्षे आहे. आता पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि त्यातून काय साध्य होणार, हे महत्वाचे प्रश्न आहेत. राजकीय नेत्यांनाही कुटुंब असते, भावना असतात, कुटुंब हा त्यांचा प्राधान्यक्रम असतो, या बाबी पक्षशिस्तीसमोर महत्वाच्या नसतात. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या चार जून रोजी लागणार आहे. त्यानंतर फुटून बाहेर पडलेल्या आणि मूळ पक्षांचेही भवितव्य ठरणार आहे. या पक्षांत धुसफूस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गजानन किर्तीकर प्रकरणाने त्याची सुरवात झाली आहे, असे म्हणता येईल.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.