Maharashtra Political News : मुख्यमंत्रिपद चालून आले होते, मात्र त्यासाठी त्यांनी आपला पक्ष सोडला नव्हता, आपल्या विचारसरणीशी प्रतारणा केली नव्हती. ते होते शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक उद्धवरावदादा पाटील. आजच्या पिढीचा यावर विश्वास बसेल का?, हे सांगणे कठीण आहे. विरोधीपक्षात राहूनही जनतेची सेवा करता येते, असे उद्धरावदादा पाटील म्हणत असत. आज काय परिस्थिती आहे? ज्याला त्याला सत्ताधारी व्हायचे आहे, सत्ताधारी होऊन जनतेची सेवा करायची आहे.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्यावेळी त्यांची देसभरात चर्चा झाली होती. मात्र आता त्याच धंगेकरांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकांची, कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी सत्ताधारी पक्षात गेलो, असे काहीतरी ते म्हणाले आहेत. भाजपने त्रास दिला, त्यामुळे शिवसेनेत गेलो, असेही ते म्हणाले आहेत. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राहिलेलेच नेते सत्ताधारी पक्षात गेले आहेत, तेथे धंगेकर यांचा विषय तसा छोटाच म्हणावा लागेल, मात्र ताजी घटना म्हणून त्याचा संदर्भ घेणे आवश्यक ठरते.
मतदारसंघाच्या विकासासाठी निधी फक्त सत्ताधारी आमदारांनाच मिळाणार, कामे फक्त सत्ताधारी आमदारांचीच होणार, अशी घातक पद्धत रूढ झाली आहे. विरोधक शिल्लक ठेवायचेच नाहीत, यासाठी कुटील नियोजन सुरू असल्याचे दिसत आहे. भाजपने त्रास दिला, असे धंगेकर म्हणाले आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. चुकीचे काम केले की त्रास होणारच, हे गृहीत धरले तर चुकीची कामे फक्त विरोधी पक्षांतीलच आमदार, खासदार, नेते करत आहेत का? सत्ताधारी नेते, आमदार, खासदार, मंत्री हे सर्वजण धुतल्या तांदळासारखे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे कोणाला मागायची?
राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. अजितदादा पवार हेही विरोधी पक्षनेते होते. विखे पाटील आता भाजपमध्ये आहेत, कॅबिनेटमंत्री आहेत. अजितदादा पवार हे भाजपसोबत सत्तेत आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत. विकासकामांसाठी मी सत्तेसोबत गेलो, असे अजितदादा अनेकवेळा म्हणाले आहेत. शिवसेनेकडून मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे, काँग्रसेने दोनवेळा मुख्यमंत्रिपद दिलेले अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये आहेत. ही मानसिकता खालपर्यंत झिरपली आहे. त्यामुळे प्रत्येकाला असे वाटत आहे की आपणही सत्तेत गेले पाहिजे, विकासासाठी निधी खेचून आणला पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनाही आता असेच वाटत आहे म्हणे. पाटील यांचे जुने सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसा दावा केला आहे. माझे मन कशातच लागत नाही, सत्ता नसताना पाच वर्षे पक्ष सांभाळणे कठिण आहे, असेही पाटील म्हणाल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्या दाव्यानुसार जयंत पाटलांनाही सत्ताधारी व्हावे, असे वाटू लागले आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याला खरेच असे वाटत असेल तर मग इतरांचा काय विचार करायचा?
लोकशाहीत विरोधी पक्षाला मोठे महत्व आहे. विरोधी पक्ष प्रबळ असला की सत्ताधाऱ्यांवर अंकुश राहतो. सत्ताधाऱ्यांना नियम मोडून कामे करता येत नाहीत. मात्र आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेत असणाऱ्यांना विरोध पक्षच नको आहेत. त्यांना आपल्यावर अंकुश, निर्बंध नको आहेत. त्यांना मनमानी कारभार करायचा आहे. त्यामुळे सत्ताधारीच विरोधकांवर कडाडून टीका करताहेत, सत्ताधाऱ्यांचे गल्लीतील समर्थकही विरोधकांनाच जाब विचारताहेत, असे चित्र सामान्य झाले आहे. विकासाला, कायदा सुव्यवस्थेला सत्ताधारी जबाबदार असतात, याचाही विसर समर्थकांना पडला आहे.
निधी खेचून आणला की आपली जबाबदारी संपली, असे बहुतांश नेत्यांना वाटत आहे. गेल्या काही वर्षांपासून अशी एक नवी राजकीय संस्कृती उदयाला आली आहे. या निधीचे पुढे काय होते, त्यामुळे नेमका कोणाचा विकास होतो, हा संशोधनाचा वेगळा विषय आहे. विरोधक प्रबळ असले तर त्याचा जाब विचारू शकतात. पण आता सर्वांनाच निधी खेचून आणून विकास करायचा आहे, आपल्या चुकांवर पांघरूण घालत उत्कर्षही साधायचा आहे. लोकशाहीचे काय होईल, लोकांचे काय होईल, याच्याशी कोणालाही देणेघणे राहिलेले नाही.
यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात जायचे होते. त्यामुळे त्यांनी शेकापचे अभ्यासू नेते उद्धरावदादा पाटील यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा, मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता. दादांनी तो प्रस्ताव नाकारला होता. विरोधी पक्षात राहूनच अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार, आपल्या विचारसणीशी प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका घेत दादांनी यशवंतरावांचा तो प्रस्ताव नाकारला होता. आताच्या नेत्यांमध्ये असा स्वाभिमान जपण्याचा, आपल्या विचारसरणीशी प्रामाणिक राहण्याचा बाणा दुर्मीळ झालेला आहे.
विरोधक प्रबळ नसले तर काय होईल, याची लोकांनी कल्पना तरी करून पाहावी. पहिले चित्र दिसेल ते हुकूमशाहीसदृश्य परिस्थिती अवतरत असल्याचे. इतके सारे करण्यापेक्षा सर्वांनीच सत्ताधारी पक्षात किंवा पक्षांत सामील व्हावे. निवडणुका टळतील, त्यासाठीचा खर्च टळेल, वेळही वाचेल. विकासाची गंगा नागरिकांच्या दारापर्यंत धो धो वाहिल. यातला उपरोधाचा भाग सोडला तरी परिस्थिती गंभीर आहे. सत्तेत सामील होऊ पाहणाऱ्यांना आपल्या चुकांवर पांघरूण घालत स्वतःचा उत्कर्ष साधायचा आहे. त्यामुळे ते लोकशाहीला वेठीस धरत आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.