
Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार व देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महायुतीमध्ये खातेवाटप व पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली. सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर राज्य सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केली होती. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करताना भाजपच्या सर्व मंत्र्यांचा पालकमंत्रिपद देत महायुतीत पुन्हा आपली ताकद दाखवून दिली होती.
महायुतीमध्ये या पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली होती. पालकमंत्रिदाचे वाटप करून 24 तास उलटत असतानाच रायगड व नाशिक जिल्ह्यातील दोन पालकमंत्री हे औटघटकेचे पालकमंत्री ठरले होते. त्यांच्या निवडीला स्थगिती देण्यात आली. या निवडीला स्थगिती देऊन जवळपास १५ दिवसाचा कालावधी लोटला असला तरी अद्याप या दोन जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीवरून सुरु असलेला महायुतीमधील वाद कधी मिटणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
महायुतीतील पालकमंत्रिपदवरून वाद चव्हाट्यावर आला होता. आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्याला गोगावले यांचा तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद दिल्याने दादा भुसे नाराज झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली होती. त्यामुळे या ठिकाणच्या पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.
रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे व शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात सुरुवातीपासून चुरस पाहवयास मिळत आहे. या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने शिवसेनेने पालकमंत्री पदावर दावा केला आहे. या वादातून काही तरी तोडगा निघेल,असे वाटत असताना राष्ट्रवादी व शिवसेनेकडून पालकमंत्री पदावर दावा कायम ठेवलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसही माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे हा वाद सोडवण्यासाठी येत्या काळात तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस आहे. याठिकाणी भाजपच्या गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आल्याने शिवसेनेचे दादा भुसे नाराज झाले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे देखील याठिकाणी इच्छुक आहेत. त्यामुळे आता या वादात कोण माघार घेणार व यावर कशा प्रकारे तोडगा काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
रायगड, नाशिक या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची माळ आता येत्या काळात कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली असली तरी आता या ठिकाणी तोडगा काढण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर पडदा टाकत मार्ग काढावा लागणार आहे.
दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची घोषणा केली होती. मात्र, रायगड, नाशिक या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या निवडीवरून नाराजी पसरल्याने या ठिकाणच्या निवडीला त्यांनी स्थगिती दिली होती. मात्र, आता दावोसवरून परत येऊनही आठ ते दहा दिवसांचा कालावधी लोटला असला तरी हा निवडीचा तिढा जैसे तेच आहे. त्यामुळे आता येत्या काळात यावर कशा प्रकारे मार्ग काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.