Mahayuti Government : अनिर्बंध सत्तेमुळे निर्ढावलेपण अन् 'मलई'साठी टोकाचे रुसवे-फुगवे!

Devendra Fadnavis leadership Ajit Pawar political importance Eknath Shinde role in Maharashtra : महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये आता पालकमंत्रिपदांवरून टोकाचे रुसवे-फुगवे सुरू झाले आहेत. अनिर्बंध सत्ता मिळाल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अंगी निर्ढावलेपण आले आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Mahayuti Government
Mahayuti GovernmentSarkarnama
Published on
Updated on

'अ‍ॅब्सोलूट पॉवर करप्ट्स अ‍ॅब्सोलूटली...' ब्रिटिश इतिहासकार लॉर्ड अ‍ॅक्टन एके ठिकाणी असे म्हणून गेले आहेत. त्यांचा मृत्यू 1902 मध्ये झाला. ते जे बोलून गेले त्याची प्रचिती आपल्याला एकविसाव्या शतकातही येत आहे. अनिर्बंध सत्तेमुळे कैफ चढतो, नशा चढते. जसजशी सत्तेची ताकद वाढत जाईल, सत्ताधाऱ्यांचे नैतिक पतन होते, असे अ‍ॅक्टन म्हणाले होते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर काय वाटते? अ‍ॅक्टन जे म्हणाले त्यात आपण 'निर्ढावलेपण वाढते' हे दोन शब्द निश्चितपणे जोडू शकतो, अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक लागला. सत्ता महाविकास आघाडीची येईल, असे अनेक जणांना वाटत होते, मात्र तसे झाले नाही. महायुतीला बहुमत मिळाले, केवळ स्पष्टच नव्हे तर प्रचंड असे बहुमत मिळाले. सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांची आवश्यकता असते. महायुतीचे 232 आमदार निवडून आले. काही अपक्षांनीही महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे महायुतीचे संख्याबल झाले तब्बल 237! यात एकट्या भाजपच्या जागा 132 आणि सोबत पाच अपक्षही. मग कैफ चढणारच की! भाजपच्या जागी कोणताही पक्ष असता तर त्याला कैफ चढलाच असता की.

Mahayuti Government
Crop Insurance Scam: मायबाप सरकार; धक्कादायक काय आहे, पिकविमा घोटाळा की कृषिमंत्र्यांचे विधान?

पालकमंत्रिपदांवरून महायुतीत सध्या मोठी धुसफूस सुरू आहे, वरचेवर ती वाढतच आहे. सरकार आता सुरक्षित आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. महायुतीत धुसफूस सुरू आहे म्हणजे सरकार पडणार वगैरे असे अजिबात नाही. एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी कितीही नाराज झाले तरी सरकार सुरक्षितच राहणार आहे. मित्रपक्षांच्या नाराजीला फारसे गांभीर्याने घ्यायचे नाही, अशी मुभा भाजपला मिळालेली आहे. त्याचे कारण वर सांगितलेले आहे. महायुतीच्या या अंतर्गत राजकारणात भाजप वरचढ आहे, मात्र लोकांच्या प्रश्नांचे काय?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने झाले आहेत. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असेल, हा प्रश्न या दोन महिन्यांत पूर्णपणे निकाली लागलेला नाही. त्यावरून राजकारण, कुरघोड्या मात्र सुरू आहेत. विलंबानंतर अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. हा वाद संपला आहे, असे वाटत असताना रुसवे-फुगवे सुरू झाले. महायुतीत तीन पक्ष एकत्र असल्यामुळे दावेदार अधिक झाले. प्रचंड बहुमत मिळूनही गेल्या दोन महिन्यांपासून सरकारमध्ये विविध कारणांवरून रुसवे-फुगवे सुरू आहेत. याला चांगले लक्षण म्हणता येणार नाही.

Mahayuti Government
Nana Patole News : प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोलेंच्या जागी अनुभवी की तरुण नेता..? काँग्रेस बुचकळ्यात...

पालकमंत्री नसले तर काय होते आणि असले तर काय होते? काही जिल्ह्यांतून याचे उत्तर मिळेल, की काहीही होत नाही. काही जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन करण्यासाठीच पालकमंत्री येतात. धाराशिवचेच उदाहरण घ्या. या जिल्ह्यातील उमरगा-लोहारा या तालुक्यांतील नागरिकांना पालकंमत्री कशासाठी असतात, कोण आहेत, हे गेल्या 10 वर्षांपासून माहिती नाही. गेल्या दहा वर्षांत या तालुक्यांना पालकमंत्र्यांचे पाय लागलेले नाहीत. लोकांचे काय अडले? अडले असेल तरी कुणाला सांगणार?

अनिर्बंध सत्तेमुळे नैतिक अधःपतन होते, तसेच निर्ढावलेपणही वाढते. गेली दोन महिने नागरिक सत्ताधाऱ्यांचे रुसवे-फुगवे पाहत आहेत. पालकमंत्रिपद लोकांसाठी हवे आहे की स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हवे आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात लोकांच्या मनातील भावनांना वाट करून दिली आहे. ''रुसवे-फुगवे धरायला हे तुमचे काही घर नाही. सरकार स्थापनेला दोन महिने झाले आहेत. या गोष्टींचा आता उबग आला आहे,'' असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

काही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या मंत्र्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. त्यातच, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे 20 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा केला जात आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार, उद्धव ठाकरे यांचे 15 आमदार फुटणार, असे दावे केले जात आहेत. एकंदरीत काय तर राजकीय गंमतीजमती, पोरखेळ सुरू आहे. हे पाहत बसण्याशिवाय लोकांच्या हातात काहीही नाही.

भाजपचे आपल्यावाचून काहाही अडणार नाही, हे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या लक्षात आलेले नाही, असे म्हणता येणार नाही. लक्षात आले असले तरी सर्वकाही मुकाट्याने सहन केले तर आपल्या अस्तित्वाचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे रुसवे-फुगवे सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांमध्ये निर्ढावलेपण आलेले आहे, हे स्पष्ट दिसत आहे. विरोधकांचा आवाज क्षीण झालेला आहे. सत्ताधारी आमदार सुरेश धस आपल्याच सरकारवर पिकविमा घोटाळ्याचा आरोप करत आहेत. तरीही संबंधितांवर कारवाई होत नाही. याला अनिर्बंध सत्तेतून आलेले निर्ढावलेपण नाही तर आणखी काय म्हणायचे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com