Mahayuti Politics : जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांच्या विधानसभेच्या तयारीच्या निर्धार बैठका सुरु आहेत. आता आरपारची लढाई म्हणून आरोळ्या ठोकणाऱ्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा प्रचार केला. पण, आतापासून जेवढे स्वत:साठी जिवाचे रान करताहेत तेवढे केले असते तर पंकजा मुंडेंचा पराभवच झाला नसता, असे राजकीय जाणकार आणि पंकजा मुंडे समर्थकांचे मत आहे. माजलगाव आणि गेवराई मतदारसंघातील बैठकांवर मुंडे समर्थकांचा कटाक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने तत्कालिन खासदार डॉ. प्रितम मुंडे यांची उमेदवारी टाळून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ऐनवेळी बजरंग सोनवणे रिंगणात उतरले. दरम्यान, महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली होती.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे बड्या नेत्यांची वानवा होती. तर, दुसऱ्या बाजुला पंकजा मुंडे यांच्या बाजूने भाजपच्या नेत्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा दोन पक्षांच्या मातब्बर नेत्यांची गर्दी दिसली. परंतु, पंकजा मुंडे यांच्यासाठी जिव ओतून आणि स्वत:ला पुर्णत: झोकून देऊन प्रचार करणाऱ्यांची संख्या मोजकीच होती.
त्यावेळी आंदोलनामुळे भाजपवर नाराजी असली तरी व्यक्तीगत पंकजा मुंडे यांना माणणारा मोठा वर्ग त्यांच्या सोबतही होता. दरम्यान, अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांच्याकडून काठावरचा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली आहे. आता विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु झाल्याने सगळ्याच नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. आता आपण रिंगणात उतरणार हा संदेश मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी निर्धार सभांचा धडाका सुरु आहे.
मागच्या आठवड्यात गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी नाराजी व्यक्त करत वेगळा पर्याय निवडण्याचे सुचित केले आहे. पंकजा मुंडे यांनीही लक्ष दिले नसल्याचे नमूद केले. मात्र, त्यानंतर विरोधी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी ‘लोकसभेला आजारी’ आणि ‘विधानसभेसाठी नाराजी’ अशी त्यांच्यावर टोलेबाजी सुरु केली आहे.
माजलगावमध्येही राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व नवी मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनीही निवडणुक लढविण्याची आरोळी ठोकली आहे. तर, भाजपच्या मोहन जगताप यांनीही आरपारची लढाई अशी भूमिका मांडली आहे.
दोन दिवसांनी राष्ट्रवादीचे जयसिंग सोळंके यांनीही अजित पवारांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केला आहे. मात्र, या नेत्यांचा आता स्वत:च्या निवडणुकीसाठी येवढा निर्धार होता पण पंकजा मुंडेंच्या निवडणुकीलाच गार का होते, असा सवाल मुंडेंच्या समर्थकांना सतावत आहे.
गेवराईतून विरोधी उमेदवार बजरंग सोनवणे यांना मोठे मताधिक्क्य मिळाले. तर, माजलगावमध्ये महायुतीच्या नेत्यांची संख्या भली मोठी असताना केवळ १७०० मतांचे मताधिक्य पंकजा मुंडे यांना मिळाले. या नेत्यांनी लोकसभेला निवडणुकीला अंग राखून काम केले पण आता स्वत:साठी जोर दाखवयाला सुरुवात केली आहे. तेव्हाही असाच जोर दाखविला असता तर निकाल निश्चितच वेगळा लागला असता, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.