
Pune News : सुरुवातीला लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर तत्कालीन काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी तीन महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी शिवसेनेची पुण्यामध्ये ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून रवींद्र धंगेकर यांना पक्ष प्रवेश दिला असला तरी अद्यापही धंगेकर हे महायुतीतील इतर पक्षांसाठी परकेच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
धंगेकर शिवसेनेत आले तरी अद्याप त्यांना महायुतीतील इतर पक्षांनी स्वीकारलय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये धंगेकर कोणत्याही महायुतीच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अद्याप पाहायला मिळाले नाहीत. तसंच त्यांच्याही कोणत्याही कार्यक्रमाला महायुतीच्या मित्र पक्षातील नेतेही दिसले नाहीत. तसेच दरम्यानच्या काळामध्ये धंगेकर यांच्या कोणत्याही महायुतीतील मित्र पक्षाच्या नेत्यांशी भेटीगाठी झाल्याचं देखील समोर आले नाही. त्यामुळे महायुतीमध्ये येऊन देखील अद्याप रवींद्र धंगेकर हे अलिप्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर आणि माहितीतील मित्र पक्षांमध्ये मनोमिलन होईल, याची शक्यता देखील कमीच वाटत आहे. कारण एकीकडे भाजपने देखील पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला असतानाच दुसरीकडे रवींद्र धंगेकर देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे सध्या तरी मिले सुर मेरा तुम्हाराचा सूर होणे शक्य दिसत नाही.
याबाबत रवींद्र धंगेकर यांना 'सरकारनामा'ने विचारला असता ते म्हणाले, मी महायुतीमध्ये कार्यकर्ता म्हणून आलो आहे. आणि कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे मी नेता म्हणून महायुतीत आलेलो नाही. कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेसाहेब जी जबाबदारी देतील ती मी निभावण्यास तयार आहे. मी शिवसेनेमध्ये नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. शिंदेसाहेब सांगतील ते काम करणं माझी जबाबदारी असेल. दरम्यान, महायुतीमध्ये थेट भाष्य करणं टाळलं.
दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 2023 मध्ये झाली. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने धंगेकरच्या जोरावर भाजपला पराभवाचा धक्का दिला. हा पराभव पुणे शहरासह राज्यातील भाजप नेत्यांच्या चांगला जिव्हारी लागला होता.
कसब्याचा गड भाजपाकडून जिंकल्यानंतर आपण काँग्रेसचा हिरो असल्याचं सांगत धंगेकरांनी महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली. आधीच पोटनिवडणुकीचा घाव जिव्हारी लागला असतानाच धंगेकरांनी डागलेल्या टीकास्त्रांनी भाजपचे स्थानिक नेते आणखीच घायाळ झाल्याचे पाहायला मिळाले.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा एकत्रित ताकदीची मोट बांधत धंगेकरांचा मोठा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या विजयामुळे कुठेतरी पोटनिवडणुकीचं शल्य कमी झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर झालेला विधानसभा निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीचा वचपा काढत भाजपने पुन्हा एकदा कसब्याचा गड काबीज केला. दरम्यानच्या काळामध्ये पोर्शकार अपघात आणि इतर प्रकरणांमधून धंगेकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मोठ्या प्रमाणात लक्ष केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे महायुतीच्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेते या प्रमाणात दुखावले गेले.
विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मी काँग्रेसचा हिरो म्हणणाऱ्या धंगेकरांनी शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली. ते एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा सुरू असताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाबाबत थेट नाराजी व्यक्त केली होती. असे असताना देखील पुण्यामध्ये शिवसेनेला चेहऱ्याची गरज पाहता मित्र पक्षांची नाराजी स्वीकारून एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना प्रवेश दिला. शिवसेनेला पक्ष वाढीसाठी रवींद्र धंगेकर यांची आवश्यकता आहे. आक्रमक चेहरा आणि थेट सामान्य कार्यकर्त्यांशी असलेला संवाद ही धंगेकरांची जमेची बाजु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.