
Malegaon Sugar Factory Election : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलची सरशी झाली आहे. या निवडणुकीत 21 पैकी 20 जागा या पॅनेलने जिंकल्या आहेत. तर चंद्रराव तावरे यांची एक जागा विरोधकांना राखता आली. या निवडणुकीत चंद्रराव तावरे व रंजन तावरे ही गुरू-शिष्याची जोरी अजितदादांना जेरीस आणेल, असे वाटत असतानाच मतमोजणी सुरू झाल्यानंतर पूर्ण चित्रच पालटले. पंचक्रोशीत अण्णा-काका म्हणून ओळख असलेली ही जोडीही आता फुटली आहे.
रंजन तावरे यांना पहिल्यांदाच पराभवाचा धक्का बसला आहे. ते 1997 ते 2025 असे सलग 28 वर्षे कारखान्याचे संचालक होते. तर 2015 ते 2020 यादरम्यान ते पहिल्यांदाच कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचेही ते संचालक होते. पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही ते निवडून आले होते.
चंद्रराव तावरे म्हणजेच अण्णा हे 1970 पासून कारखान्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. 1970 ते 2007 आणि 2014 ते 2025 अशी तब्बल 47 वर्षे ते कारखान्याचे संचालक होते. यादरम्यान 12 वर्षे ते अध्यक्ष होते. आता पुन्हा एकदा ते संचालक म्हणून निवडून आल्याने त्यांचा कार्यकाळ ५० वर्षांहून अधिक होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघासह पंचायत समितीमध्येही ते सदस्य होते.
1997 मध्ये अण्णा आणि काका यांनी एकत्रित पॅनेल करत निवडणूक लढवली होती. त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली होती. त्यावेळी या गुरू-शिष्याने शरद पवार आणि अजित पवारांना पहिला मोठा धक्का दिला होता. पण पुढचीच निवडणूक बिनविरोध झाली. 2007 च्या निवडणुकीत गुरू-शिष्याची जोडी फुटली. रंजन तावरेंनी पवार, चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलविरोधात स्वतंत्र पॅनेल उभे केले आणि सात संचालक निवडूनही आणले.
चंद्रराव तावरे 2007 ते 2014 या कालावधी कारखान्याचे संचालक नव्हते. 2014 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा अण्णा-काका ही जोडी एकत्र आली आणि पुन्हा 1997 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाली. निवडणुकीत जोडीनं पवारांना दुसऱ्यांदा धक्का दिला होता. 2015 च्या निवडणुकीनंतर रंजन तावरे पहिल्यांदाच कारखान्याचे अध्यक्ष बनले. राज्यात 2019 मध्ये सत्तांत्तर होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. या निवडणुकीत गुरू-शिष्याच्या पॅनेलचा पराभव झाला अन् पुन्हा पवारांची सत्ता आली.
आता 2025 च्या निवडणुकीत अजित पवारांनी अण्णा-काकाच्या जोडीला जोरदार धक्का देत 21 पैकी 20 उमेदवार निवडून आणले. या निवडणुकीत तब्बल 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच रंजन तावरे यांना आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत व्हावे लागले. मात्र, 85 वर्षांचे चंद्रराव तावरे यांना आपला गड शाबूत ठेवता आला. आता त्यांना पहिल्यांदाच एकट्याला कारखान्याचा किल्ला लढवावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.