
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मराठवाड्याचा राजकीय नकाशा बदलणार आहे. मागील काळात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे हे घडणार आहे. या निवडणुकांतून नवे बालेकिल्ले तयार होणार आहेत.
एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज अशोक चव्हाण यांना आता भाजपची ताकद वाढवावी लागेल, तर बीडमध्ये जातीय समीकरणांचा माध्यमातून नवी समीकरणे उभी राहू शकतात. लातुरात देशमुख बंधू व संभाजी पाटील निलंगेकर, बीडमध्ये मुंडे बंधू भगिनी व विरोधक, छत्रपती संभाजीनगरात मंत्री अतुल सावे, संजय सिरसाट व अंबादास दानवे आदींची प्रतिष्ठा पणाला लागेल.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक ही भाजपचे मंत्री अतुल सावे, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरणार आहे. ११५ नगरसेवकांची ही मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी हे सारेच पक्ष तुटून पडणार आहेत. गेल्या २० वर्षांपासून सत्तेत एकत्र असलेले पक्ष आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणार आहेत. याच पक्षांच्या धोरणामुळे तब्बल २० वर्षे शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
२० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात आता याच विषयावर हेच पक्ष मतदान मागणार आहेत. त्यामुळे स्वबळाची उबळ आलेल्या पक्षांनाही इतर पक्षांसोबत युती, आघाडी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. सर्वाधिक नागरीकरण असलेल्या या महानगरात आजही पाण्यासारख्याच विषयावर निवडणूक लढवली जाईल.
जिल्ह्यातील इतर नगरपालिकांसोबत सिल्लोड व पैठणची निवडणूक होणार आहे. सिल्लोड नगर परिषदेवर आमदार अब्दुल सत्तार यांचेच वर्चस्व अबाधित आहे. अपवाद वगळता त्यांच्या घरातच सत्तेची खुर्ची फिरत राहिली. पैठण नगरपालिकेवर विद्यमान खासदार व माजी मंत्री संदीपान भुमरे यांचे वर्चस्व होते. मात्र नंतर भाजपचे सुरज लोळगे यांनी थेट जनतेतून निवडणूक लढवून शिवसेनेसह काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करुन विजय मिळवला होता. आता आगामी निवडणूकही भाजप व शिवसेनेतच निवडणूक होणार आहे.
संभाजीनगरनंतर मोठे राजकीय केंद्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात नांदेड-वाघाळा महानगपालिका, १२ नगरपालिका आणि चार नगर पंचायती आहेत. या १७ पैकी १३ स्थानिक स्वराज्य संस्था माजी मुख्यमंत्री व विद्यमान भाजप खासदार अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसच्या ताब्यात होत्या. आता चव्हाण हे भाजपमध्ये आल्याने त्यांना पुन्हा आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, प्रतापराव पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादीत गेले असून काँग्रेसची पडझड होत असल्याने यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे चित्र वेगळे असणार आहे. राष्ट्रवादी पक्ष तसेच शिवसेनाही विभागली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाची धुरा जुन्या व नव्या पिढीतील कार्यकर्ते सांभाळत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आगामी निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या तीनही घटक पक्षांत धुसफूस सुरू आहे. आमदारांमध्येही उघडपणे ती पाहायला मिळते. कार्यकर्त्यांमध्ये तर अनेक ठिकाणी टोकाचा विरोध होत आहे. शहरांतील प्रमुख प्रश्नांमध्ये पाणीटंचाई, रस्त्यांची दुर्दशा, रोजगार व शहरीकरण या समस्या आहेत.
जालना नगरपालिकेत गेल्यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. संगिता गोरंट्याल नगराध्यक्ष होत्या. शिवसेना फुटीनंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. आता महानगरपालिका म्हणून होणाऱ्या पहिल्या निवडणुकीत आपलाच महापौर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीकडून भाजप, शिवसेनेकडून जोर लावला जात आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून जोर लावला जात आहे.
ही निवडणूक पाण्याच्या प्रश्नावरच प्रामुख्याने लढली जाणार आहे. शहरात पाणी प्रश्न बिकट असून सध्या दहा ते बारा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषद गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मुस्लिमबहुल मतदार जास्त असल्यामुळे येथे नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व असते. भाजपला शहरात अपेक्षित यश मिळत नाही.
परभणी महापालिकेसह पाथरी, मानवत, सेलू, जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड आणि पूर्णा या आठ नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. परभणी महानगरपालिकेत सध्याच्या काँग्रेस सत्तेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मागील निवडणुकीत सत्ता मिळवली होती व अनिता सोनकांबळे यांनी महापौरपद भूषवले होते. मात्र आता काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यादृष्टीने पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
पाथरी नगरपालिकेत माजी आमदार बाबाजानी यांचे वर्चस्व ओसरताना दिसत असून, सईद खान यांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला आहे. पूर्णा नगरपालिकेत विशाल कदम यांचा प्रभाव टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने सत्तेच्या समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. जिंतूर व सेलू या दोन्ही नगरपालिकांत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. गंगाखेड पालिकेत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या समर्थकांनी तयारी सुरू केली आहे.
बीड जिल्ह्यात बीड, धारुर, परळी, अंबाजोगाई, माजलगाव व गेवराई नगर पालिकांवर प्रशासकराज आहे. बीड, परळी व माजलगाव या नगरपालिका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात होत्या. तर धारुर पालिका पंकजा मुंडे समर्थकांच्या तर गेवराईत माजी आमदार लक्ष्मण पवार तर अंबाजोगाई कॉँग्रेसच्या ताब्यात आहेत. बीड, धारुर, अंबाजोगाई, माजलगाव शहरांत पाण्याचा प्रश्न बिकट आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजप हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. मात्र, नव्या महायुतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आल्याने परळी, माजलगाव, धारुरमध्ये महायुती एकत्र लढू शकते. परंतु, बीडमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गटबाजी वाढली असून गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित हे राजकीय विरोधक असल्याने स्वतंत्र लढती होतील. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे व आमदार संदीप क्षीरसागर हे दोन लोकप्रतिनिधी आहेत. परंतु, जिल्हाभरात संघटनबांधणी नाही. क्षीरसागरांची ताकद बीड मतदार संघापुरती तर सोनवणेंची ताकद केजपुरती मर्यादित आहे.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी व वसमत येथे नगरपरिषद आहे तर औंढा नागनाथ व सेनगाव येथे नगर पंचायत आहे. जिल्ह्यातील नगरपरिषदांचा निवडणूकाचा कालावधी संपून गेला आहे. हिंगोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भाजपचे होते. परत सत्ता मिळविण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी दोन पक्ष झाल्याने त्यांच्या आपसातही रस्सीखेच होणार आहे. कळमनुरी नगर परिषदेत नगराध्यक्ष शिवसेनेचे होते. यामुळे तिथे दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे. वसमत नगरपरिषदेत मागच्या वेळी पक्षीय बलाबलात भाजप पुढे असली तरी नगराध्यक्षपद शिवसेनेकडे होते. येथे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे निवडून आले आहेत. येथे सत्तेसाठी दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस तयारीत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात आठ नगर परिषदा आहेत. त्यामध्ये धाराशिव, कळंब, भूम, परंडा, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, मुरूम या नगरपरिषदांचा समावेश आहे. धाराशिव नगरपालिकेत थेट जनतेतून शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला होता. सध्या यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले सर्व नगरसेवक भाजपमध्ये आहेत. पाच वर्षे सत्ता शिवसेनेच्या ताब्यात होती तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकाची निवड झाली होती. याठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील या नेत्यांचा प्रभाव आहे. शहराच्या प्रश्नांमध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, कचराडेपोच्या स्थलांतरणाचा प्रश्न पेटलेला आहे.
लातूर महापालिकेवर गेल्या अडीच तीन वर्षापासून प्रशासकराज आहे. या ७० सदस्य असलेल्या महापालिकेवर सातत्याने काँग्रेसचे नेते माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांचेच वर्चस्व राहिले आहे. २०१७ ला मात्र भाजपला काठावर बहुमत मिळाले होते. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर मात्र काँग्रेसने भाजपचे दोन सदस्य फोडले होते. त्यामुळे काँग्रेसचा महापौर होवू शकला होता. ही महापालिका पहिल्यापासूनच आर्थिक अडचणीत आहे.
काँग्रेस असो किंवा भाजप असो महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. तर दुसरीकडे पाण्याचा प्रश्न लातूरच्या पाचवीलाच पुजलेला आहे. मांजरा धरण भरले तरी आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे सत्ताधाऱ्यांचे व नंतर प्रशासकांचेही दुर्लक्ष झाले आहे. आता पुन्हा हे दोन्ही पक्ष जनतेच्या समोर जाणार आहेत. औसा नगरपालिकेवर सध्या भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचे वर्चस्व आहे. इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे डॉ. अफसर शेख यांचाही प्रभाव आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी देखील तयारी सुरु केली आहे. निलंगा नगरपालिकेत माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा प्रभाव आहे. शहरांमध्ये एमआयडीसी त्याचबरोबर विस्तारीकरण, रोजगाराचा प्रश्न, वाढीव वसाहत असे प्रश्न आहेत. या पालिकेवर काँग्रेसची सत्ता बरेच वर्षे राहिली परंतु २९१६ पासून भाजपाची सत्ता होती. आता दोनही पक्ष तयारीला लागले आहेत.
अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल. उदगीर नगरपालिकेवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासक आहे. त्या पूर्वी या पालिकेवर भाजपची सत्ता होती. गेल्या काही वर्षापासून येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व महायुती निवडणूक लढवेल असे चित्र आहे.
(संकलन - माधव इतबारे, उमेश वाघमारे, दत्ता देशमुख, हरी तुगावकर, अविनाश पोफळे, रामेश्वर काकडे, राजेश दारव्हेकर, गणेश पांडे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.