Sanjay Raut: संजय राऊत-कैदी नंबर 8959; तुरुंगाच्या गजाआडची चित्तरकथा

MP Sanjay Raut Book Narkatla Swarg: संजय राऊत यांनी तुरुंगाबद्दल अर्थातच तिथल्या अंधाऱ्या गोष्टीबद्दल बरेच लिहिले आहे, त्यातली वेदना मनाला जाऊन भिडते, आणि त्या जगात भरडल्या जाणाऱ्या व्यक्तीबद्दल करुणा दाटून येते. पुस्तकात त्यांनी केलेले दावे भाजपला चांगलेत झोंबले आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Summary

  1. संजय राऊत यांचे तुरुंगातील 101 दिवसांचे अनुभव त्यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात लिहून तुरुंगव्यवस्थेतील ढिसाळपणा, अन्याय आणि मानसिक ताण स्पष्ट केले आहेत.

  2. राऊत यांनी आपल्याला खटल्यात कसे गोवले गेले, ईडीची भूमिका, तसेच तुरुंगातील सहकैद्यांचे अनुभव तपशीलवार मांडले आहेत.

  3. तुरुंग व्यवस्थेत सुधारणा, ब्रिटिशकालीन कायदे रद्द करणे आणि कैद्यांबद्दल मानवी दृष्टीकोन आवश्यक असल्याचा संदेश पुस्तकातून पुढे येतो.

राजकीय नेता म्हणून काम करताना एकाला विशिष्ट एका खटल्यात तुरुंगात पाठवले जाते, १०१ दिवस ही व्यक्ती तुरुंगात राहते. त्यानंतर तिचा जामिन अर्ज मंजूर होतो. मग ही व्यक्ती तुरुंगाच्या बाहेर येते. ही व्यक्ती साधीसुधी नाही, तर थेट राज्यसभा सदस्य आणि एका मोठ्या पक्षाचा नेता म्हणून वावरत असलेली. शिवसेनेचे नेते असलेल्या संजय राऊत यांनी एका विशेष कायद्याच्या खाली खटला सुरू असताना तुरुंगात घालविलेल्या १०१ दिवसांबद्दल लिहिले आहे

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत. मात्र त्यातल्या राजकीय भाष्याबाबत काही थेट मत मांडता येणार नाही कारण त्याचा प्रतिवाद केला जाऊ शकतो. त्यांच्या दाव्याला विरोध केला जाऊ शकतो. कारण या प्रकरणातले तथ्य अद्याप पूर्णपणे लोकांच्यासोर आलेले नाही. काही गोष्टी न्यायालयात पेंडिंग आहेत. मात्र तुरुंगव्यवस्थेबद्दल आणि त्या कालखंडातल्या त्यांच्या मनःस्थितीबद्दल त्यांनी या पुस्तकात तपशीलवार लेखन केलंय.

संजय राऊत यांनी आपल्याला खटल्यात कसं गोवले त्याचे तपशील दिले आहेत. त्यांनी आपल्याला जो तुरुंगवास झाला त्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना थेट जबाबदार धरलं आहे. हे का घडलं त्याबद्दल त्यांची जी बाजू आहे ती त्यांनी अत्यंत मुद्देसूदपणे इथं मांडली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थातच ईडी या आर्थिक गुन्हे विषयक तपास करणाऱ्या केंद्रीय विभागाच्या वतीने त्यांना अटक झाली होती.

Sanjay Raut
MLA Shankar Jagtap: अष्टपैलू खेळाडू ते चिंचवडचे आमदार

त्या काळात म्हणजे ते जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांच्याबरोबर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांचे अन्य दोन सहकारी, तसेच काही मोठे व्यावसायिक आणि एक उद्योगपती तुरुंगात होते. राऊत यांनी ते सर्वजण का तुरुंगात आले, याची त्यांना कळलेली बाजू इथे दिली आहे. या पुस्तकात राऊत यांनी, त्यांच्या स्वतःवर व मंडळींवर झालेला अन्याय तसेच त्यांना तुरुंगात भेटलेल्या अन्य काही व्यक्तींवर कसा अन्याय झाला ते पुरेशा स्पष्टपणे मांडले आहे.

मात्र हे सगळं वाचत असताना एकदम त्याच्यावर विश्‍वास ठेवता येत नाही, कारण याला दुसरी बाजूही असणार असे वाटत राहते. मात्र ईडीचे एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप करून त्यांनी जितू नवलानी या माणसाबद्दल लिहिले आहे ते त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊनही सांगितले होते. त्याबद्दल वाचकांच्या मनात नक्कीच प्रश्‍नचिन्ह उमटते. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे वाटते.

Sanjay Raut
Rahul Patil: मी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत जातोय, पण आमदार नरके आमचे विरोधकच; राहुल पाटलांनी केली घोषणा

राऊत यांनी या पुस्तकात त्यांच्याबद्दल लिहिताना तुरुंगाबद्दल अर्थातच तिथल्या अंधाऱ्या गोष्टीबद्दल बरेच लिहिले आहे, त्यातली वेदना मनाला जाऊन भिडते, आणि त्या जगात भरडल्या जाणाऱ्या व्यक्तीबद्दल करुणा दाटून येते. तुरुंग ही व्यवस्था गुन्हेगारांना त्या जगापासून दूर जाण्यासाठी, त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी तयार केलेली यंत्रणा आहे, पण ब्रिटिशकालीन या व्यवस्थेत इतका जुनेपण आलेला आहे की जग आज इंटरनेटच्या विश्‍वात दौडत असताना ही व्यवस्था अजूनही बाबा आदमच्या जमान्यात असल्याचे जाणवते. कैद्याबद्दल एखादा आदेश तुरुंगाबाहेरच्या पेटीत टाकला जातो, तो उशीरा बघितला गेला तर त्या कैद्याची सुटका पुन्हा लांबणीवर पडते.

कुठले कायदे आणि कुठले ‘जेल मॅन्यूअल’ जे ब्रिटिशांच्या काळात तयार केले गेले, ते आपण अजूनही का वापरत आहोत आता त्यात कालानुरुप बदल होणे गरजेचे असताना, का वापरत आहोत अशा प्रश्‍न पडावा असे हे वर्णन आहे. माणसाबद्दल कुठलीही आस्था न दाखवणारी ही व्यवस्था बदलणे गरजेचे आहे हे या पुस्तकावरून लक्षात येते. राऊत यांचे याआधीचे आयुष्य अत्यंत वलयांकित असे गेलेले असताना त्यांना साध्‍या साध्या बाबींसाठी किती आणि कसा संघर्ष करावा लागत होता ते या पुस्तकावरून कळते. नियतीचा खेळ किती विचित्र असतो ते राऊत यांच्या आयुष्यातल्या दोन गोष्टीवरून कळते.

राज्यसभेच्या खासदारकीच्या काळात तुरुंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या एका समितीमार्फत त्यांनी काही तुरुंगांना भेटी दिल्या होत्या, पण काही वर्षानंतर त्यांना अशाच एका तुरुंगात कैदी म्हणून यावे लागले हे वाचताना अंगावर काटा येतो. तसेच त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पत्रव्यवहार वाचताना एका कुटुंबवत्सल माणसाचा जीव कसा घुसमटला जातो ते लक्षात येते.

राऊत यांच्याआधी अशाप्रकारे रवींद्रनाथ पाटील या माजी ‘आयपीएस’ अधिकारी असलेल्या व्यक्तीने ‘तुरूंगरंग’ या पुस्तकातून तसेच दुसऱ्या एका लेखकाने त्याला नक्षलवादी म्हणून तुरुंगवास पत्करावा लागल्यावर पुस्तक लिहिले आहे. या सगळ्या पुस्तकांतून तुरुंगाच्या गजाआडचे जग आणि तिथला अंधार किती भीषण असतो आणि एखादी संवेदनशील व्यक्ती तिथे गेली तर त्याचा मानसिक तोल कसा ढळू शकतो हे लक्षात येते.

या पुस्तकातून व्यक्त झालेल्या भावना आणि राऊत यांची मते याबद्दल चर्चा होऊच शकते आणि तशी चर्चा होतच राहील पण त्यांनी न्यायालयीन कामकाज, तपासाच्या पद्धती आणि विशेषतः तुरुंगरचनेच्या तिथल्या व्यवस्थेबाबत जे काही लिहिले आहे त्याचा आढावा घेऊन त्यात बदल होणे गरजेचे आहे असे वाटते. या पुस्तकाचे प्रकाशक शरद तांदळे स्वतः सिद्धहस्त आणि लोकप्रिय लेखक आहेत. वेगळ्या वाटेची आणि वेगळ्या वळणाची पुस्तके प्रकाशित करण्याचे धाडस त्यांनी नेहमीच दाखवले आहे. हे पुस्तक प्रसिद्ध करताना त्यांनी धाडस केले आहे.

मात्र त्यांची या पुस्तकाकडे बघण्याची वृत्ती केवळ एक मसाला पुस्तक आणि धंदा करणारे हे पुस्तक असे बघण्याची वृत्ती नसल्याचे जाणवते. केवळ सनसनाटी माजवण्यापेक्षा लेखकाच्या वेदनादायी कालखंडाची नोंद संवेदनशील वाचकांपर्यत पोहचवावी हा त्यांचा हेतू लक्षात येतो. राऊत यांनी यात राजकीय स्टेटमेट केली असली तरी पुस्तकात संजय राऊत यांच्यामधला कुटुंबवत्सल गृहस्थ ठसला पाहिजे असाच हेतू दिसतो आणि तो साध्यही होतो. राऊत यांनी यात जी राजकीय स्टेटमेंट आणि विविध दावे केले आहेत त्याला उत्तर देणारे पुस्तक काही दिवसात बाजारात आले तर आश्‍चर्य वाटणार नाही. कारण विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे अशीच महाराष्ट्राची परंपरा आहे.

पुस्तक - नरकातला स्वर्ग

लेखक - संजय राऊत

प्रकाशक - न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे

किंमत - ३५० रुपये

पृष्ठे - २४०

❓ FAQs

Q1: ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
➡️ शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी.

Q2: पुस्तकात कोणता कालखंड वर्णन केला आहे?
➡️ तुरुंगातील त्यांच्या 101 दिवसांचा अनुभव.

Q3: या पुस्तकाचा मुख्य संदेश काय आहे?
➡️ भारतीय तुरुंगव्यवस्थेत सुधारणा करण्याची तातडीची गरज.

Q4: हे पुस्तक कोठे प्रकाशित झाले आहे?
➡️ न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com