

Republican Party of India update : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आनंद व्यक्त केला. विजयाचा जल्लोष करताना “आम्ही ज्यांच्या सोबत असतो, सत्ता त्यांचीच असते,” असे सांगायलाही ते विसरले नाहीत. पण महायुतीच्या या विजयात घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे किती उमेदवार निवडून आले? या प्रश्नाचे उत्तर खुद्द आठवलेंनाही देता येणार नाही.
महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर रामदास आठवले यांनी निवडून आलेल्या आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अभिनंदन करणाऱ्या दोन पोस्ट सोशल मीडियात केल्या आहेत. या पोस्टनुसार, पुण्यात सहा आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचे दोन उमेदवार निवडून आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पुण्यातून अश्विनी राहुल भंडारे, निशा सचिन मानवतकर, परशुराम वाडेकर, निलेश आल्हाट, हिमाली नवनाथ कांबळे, मृणाल बाप्पू कांबळे हे पुण्यातील तर कुणाल भाऊ वैजनाथ वाव्हळकर आणि धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे हे दोन उमेदवार पिंपरी चिंचवडमधून विजयी झाले आहेत. हे आरपीआयचे असल्याचा दावा आठवलेंनी केला असला तरी सर्वजण भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडून आले आहेत.
आठवलेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, पक्षाची ताकद आणि जनतेचा पाठिंबा या उमेदवारांनी सिद्ध केला आहे. खरंतर पक्षाच्या नावावर, चिन्हावर या उमेदवारांनी विजय मिळविला असतात तर आंबेडकरवादी, दलित चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा ऊर भरून आला असता, अशी भावना पक्षातील कार्यकर्त्यांकडूनच व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाटाघाटीत आठवले जिंकले पण पक्ष पराभूत झाला, असाच त्यातून अर्थ काढावा लागेल.
महायुतीने आपला विश्वासघात केल्याचे खुद्द आठवले म्हणाले होते. केवळ मुंबईच नव्हे तर राज्यभरात कुठेही जागावाटपात त्यांना सामावून घेण्यात आले नाही, असा त्यांचा आरोप होता. पुण्यात तर भाजपच्या कार्यालयासमोर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी आंदोलन केले होते.
मुंबई-ठाण्यातील जागांसाठी आठवले यांनी अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. पण त्यानंतर त्यांची डाळ शिजली नाही. अखेर मुंबईसह अन्य काही ठिकाणी स्वबळावर पक्षाचे उमेदवार लढले. तिथे एकही उमेदवार निवडून आला नाही.
मागील काही दशकांपासून आठवले हे कधी आघाडी तर कधी युतीच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय आहे. राज्यसभेत खासदारकी, केंद्रात मंत्रिपद मिळवत आहेत. पण विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश आलेले नाही. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये निवडून आलेले उमेदवार कमळ चिन्हावर निवडून आलेत. त्यामुळे दोन्ही महापालिकेत पक्षाचे अस्तित्व मिटले आहे. कागदोपत्री आरपीआय महापालिकांमधून हद्दपार झाला आहे.
दुसरीकडे मागील काही वर्षांतच असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने महाराष्ट्रात जोरदार मुसंडी घेतली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचे १२५ उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे ते कोणत्याही आघाडी किंवा युतीशिवाय. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही काही ठिकाणी काँग्रेस काही ठिकाणी एकला चलोची भूमिका घेत आपल्या पक्षाच्या ताकदीवर उमेदवार निवडून आणले आहेत. त्यांना मिळालेले यश मर्यादित असले तरी आंबेडकरांकडून प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी कृतीशाल प्रयत्न केले जात आहेत, त्याला प्रतिसादही मिळताना दिसत आहे.
आठवले इथेच कमी पडताना दिसत आहे. युती किंवा आघाडीच्या जोरावर पक्षसंघटन बळकट होणार नाही, उलट ते खिळखिळे होत गेले. पक्षातील ताकदीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अन्य पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवून विजयासाठी झगडावे लागत आहे. मित्रपक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागत आहे. नेत्यांकडे आम्हाला स्वीकृत नगरसेवक, महामंडळात अध्यक्ष, संचालक अशी पदे मिळवीत, यासाठी पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. अशी नामुष्की केंद्रात मंत्री असलेल्या नेत्याच्या पक्षावर ओढवत असेल तर त्याला जबाबदार कोण?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.