Nana Patole News : देर आये, दुरुस्त आये.... आक्रमक झालेले नाना पटोले सरकारला घाम फोडताहेत!

Nana Patole On Mahayuti Government : उशिरा का होईना राज्यातील काँग्रसेचे नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या दोन दिवसांत केलेली वक्तव्ये सरकारला घाम फोडणारी आहेत.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole News : 'देवेंद्र फडणवीस हरिश्चंद्र आहेत का, 2014 मध्ये खोटा नॅरेटिव्ह कुणी सेट केला? मुख्यमंत्री सिरियस माणूस नाही..., जीव घ्या आणि आरामात फाइव्ह स्टार व्यवस्थेत राहा...; होय, ही आक्रमक विधाने आहेत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची! लोकसभेच्या निवडणुकीनंतर नानाभाऊ आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सत्ताधाऱ्यांवर सातत्याने हल्ले करत असतात. त्यात आता नानाभाऊंची भर पडली आहे. त्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. काँग्रेसला एक-दोन तरी जागा मिळतील की नाही, असे चित्र सत्ताधाऱ्यांकडून निर्माण करण्यात आले होते. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. काही नेते मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत गेले. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसची साथ सोडली होती. त्यामुळे काँग्रेसचे काही खरे नाही, असे वाटत होते.

मात्र, किरकोळ वाद वगळता महाविकास आघाडी भक्कम राहिली. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या तरुण फळीने बाजी उलटवून दाखवली. महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 31 जागा जिंकल्या, त्यात काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आले. अपक्ष म्हणून लढलेले सांगलीचे विशाल पाटील अखेर काँग्रेससोबत आले. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांची संख्या 14 वर गेली आहे.

नाना पटोले यांचा स्वभावच मुळातच आक्रमक आहे. भाजपमधून ते आक्रमकपणा दाखवूनच बाहेर पडले होते. नानाभाऊंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेतल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीचे सरकार पडले, त्याला नाना पटोले कारणीभूत असल्याची टीकाही झाली होती. पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अध्यक्षपद रिक्तच राहिले.

एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत गेले, त्यावेळी नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष राहिले असते तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती, अशी टीका त्यांच्यावर काँग्रेसमधूनही झाली होती. पटोले यांच्यामुळे काँग्रेसचे नेते पक्ष सोडत आहेत, अशा तक्रारी दिल्लीपर्यंत गेल्या होत्या. मात्र हायकमांडने आतापर्यंत तरी पटोले यांच्यावरच विश्वास दाखवला आहे.

या सर्व परिस्थितीवर मात करून पटोले मैदानात टिकून राहिले, विदर्भ हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला आहे, हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. त्यांना सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजित पाटील, अमित देशमुख या तरुण नेत्यांची साथ मिळाली आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरला. त्यानंतर नाना पटोले यांचा आत्मविश्वास दुणावला. ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.

काही वर्षांपूर्वीच ते असे आक्रमक झाले असते तर लोकांनी काँग्रेसच्या झोळीत मतांचे आणखी भरभरून दान टाकले असते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह तयार करून लोकसभा निवडणूक जिंकली, अशी टीका शिंदे आणि फडणवीसांकडून सातत्याने केली जात आहे. त्याला पटोले यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Nana Patole
Sharad Pawar News : ...म्हणून CM शिंदेंनी आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला जाता आलं नाही! शरद पवारांचा खुलासा

मराठा, धनगर आणि इतर समाजांना आरक्षण देतो, असे सांगून 2014 मध्ये सत्तेवर कोण आले होते, त्यावेळी खोटे नॅरेटिव्ह त्यावेळी कुणी तयार केले होते? देवेंद्र फडणवीस हे स्वतः हरिश्चंद्र आहेत का, सत्य हा त्यांचा पिंड आहे का? असा पलटवार पटोले यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे. वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी तीन दिवस फरारी होता. त्यावरून पटोले यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. जीव घ्या आणि आरामात फाइव्ह स्टार व्यवस्थेत राहा, अशी टीका करत त्यांनी कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

या प्रकरणारूनच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाही लक्ष्य केले. मुख्यमंत्री सिरियस माणूस नाही, राज्यात काही घडले तर त्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नसते. असा सिरियस नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे दुर्दैव आहे, अशी बोचरी टीका पटोले यांना एकनाथ शिंदे यांच्यावर केली. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांना घेरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Nana Patole
Maharashtra Budget : विधानसभेसाठी सत्ताधाऱ्यांची 'मत पेरणी'; तब्बल 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

गेली अडीच वर्षे पक्ष फुटले, काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये गेले. काँग्रेसमध्ये मरगळ आली होती. नेते आक्रमक होत नव्हते. त्यामुळे काही नेत्यांनी पक्षांतर केले, असे सांगितले जाऊ लागले होते. लोकांच्या अनेक समस्या आहेत. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. याच्याविरोधात काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले नाहीत. त्यामुळे विरोधकांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला होता.

जनतेनेच लोकसभा निवडणुकीत राज्यातील विरोधी पक्षांना साथ दिली. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेले काँग्रेसचे नेते आता आक्रमक झाले आहेत. ठाकरे गट आधीपासूनच सरकारविरोधात आक्रमक आहे. शरद पवारांनी आपल्या डावपेचांनी वेळोवेळी सरकारला घायाळ केले आहे. आता काँग्रेस नेतेही आक्रमक झाल्यामुळे महायुती सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Nana Patole
Video Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी केलं अंबानी कुटुंबीयांच कौतुक, म्हणाले आमचा त्यांना विरोध नाहीच !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com